प्रायश्चित्त : ‘यथाऽपराधदण्डानाम् ।’ (रघुवंश, सर्ग १, श्लोक ६) म्हणजे ‘जसा अपराध, तशी शिक्षा असावी.’ माणसाच्या हातून अपराध, पातके घडणारच. अपराधी, पापी लोकांना ‘आपण अपराधरहित, पापरहित व्हावे’ असे वाटत असते; म्हणूनच आपल्या शास्त्रकारांनी प्रायश्चित्ताचे विधान केले आहे.
अपराध : अपराध शारीरिक, मानसिक इत्यादी अनेक प्रकारचे असतात. ‘अपराध, गुन्हा केलेला मनुष्य समाजाच्या दृष्टीने कायमचा त्याज्य आहे’, अशी भारतियांची धारणा नाही. ‘प्रत्येकाला सुधारण्याची संधी दिली पाहिजे’, अशी भारतीय शास्त्रकारांची धारणा होती; कारण ‘कोणतीही व्यक्ती जन्मजात अपराधी, गुन्हेगार नसते’, असे ते मानीत; म्हणूनच आजचे Science of Criminology हे प्राचीन काळीच भारतात प्रगत झालेले होते. ‘ही काही पाश्चात्त्यांची देणगी नाही’, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. आपले शास्त्र सांगते,
गुरु आत्मवतां शास्ता शास्ता राजा दुरात्मनाम् ।
तथा प्रच्छन्नपापानां शास्ता वैवस्वतो यमः ।। – महाभारत, उद्योगपर्व, अध्याय ३५, श्लोक ६१
अर्थ : आत्मवान् (स्वतःच्या अपराधाची जाणीव होणार्या) लोकांना गुरु शासन करतात, दुष्टांना राजा शासन करतो; मात्र गुप्तपणे पापाचरण करणार्यांना स्वतः वैवस्वत यम शासन करतो.
अप्रत्यक्ष पातके करणार्यांना यमाच्या दरबारात शासन होणारच; परंतु समाजात राहून प्रत्यक्ष अपराध, समाज विघातक कृत्ये करणार्यांना राजा शासन करीत असे. दृष्कृत्य करणार्याच्या दुष्कृत्याचे स्वरूप पाहून त्याला दण्ड किंवा शिक्षा केली जाई. राजाने स्वतः अपराध केला तरी, तो स्वतःला दण्ड करून घेई. त्यास आत्मशासन म्हणतात.’
(साभार : ग्रंथ ‘भारतीयांचे सांस्कृतिक आदर्श जीवन’ – प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांची प्रवचने)