पू. (श्रीमती) राधा प्रभु (वय ८६ वर्षे) यांनी श्रीकृष्ण आणि श्रीराम यांना केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण प्रार्थना !

१. गोवंशियांचे रक्षण करण्यासाठी सर्वज्ञ अशा श्रीकृष्णाला केलेल्या प्रार्थना

पू. (श्रीमती) राधा प्रभुआजी

१ अ. हे श्रीकृष्णा, गोमाता साहाय्यासाठी तुझ्या आगमनाची वाट पहात आहे ! : ‘हे श्रीकृष्णा, तू द्वापरयुगात जन्म घेऊन अनेक लीला बालपणीच करून दाखवल्या आहेत. क्रूर औरंगजेबाने तुझ्या मथुरेला मशीद करून टाकले आहे. या घोर अपमानाचा प्रतिकार करण्यासाठी प्रकट हो ! तुझे आवडते बालगोपाल गायींना चरायला नेण्यासाठी तुझी आतुरतेने वाट पहात आहेत. अनंत कोटी सूर्यासम तेज असलेल्या हे श्रीकृष्णा, तू तुझे स्वरूप आम्हा सर्वांना दाखव. गोमातेच्या उदरात ३३ कोटी देवतांची तत्त्वे आहेत. त्यात तुझेही तत्त्व आहे; परंतु गोमाता आज तिच्यावर दुष्टांकडून होत असलेली हिंसा सहन न झाल्याने साहाय्यासाठी तुझ्या आगमनाची वाट पहात आहे. भूलोकातील सर्व जीव-जंतू, झाडे, नद्या, वनस्पती, पर्वत या सर्वांची उत्पत्ती आणि लय करणारा तूच आहेस. प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार मनातील चांगल्या आणि वाईट विचारांचे फळ देणारा तूच आहेस. सात्त्विक प्रकृतीच्या गायींचा (दूध, दही इत्यादी स्वरूपात) संपूर्ण लाभ घेऊन अन् त्यांना त्रास देऊन आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी त्यांचा वध करणार्‍या मनुष्याला कृतघ्नच म्हटले पाहिजे ना ? त्यांना ही पापे भोगून संपवण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतील. हे श्रीकृष्णा यांच्याकडून हे असेच पुढे चालू राहिले, तर गोवंशियांचा नाश होईल.

१ आ. हे श्रीकृष्णा, गोवध करणार्‍यांच्या मनात गायींविषयी प्रेम निर्माण कर ! : हे श्रीकृष्णा, तू ‘भगवद्गीते’त अर्जुनाला कर्मयोगाच्या माध्यमातून सविस्तर बोध केला आहेस. ‘मानवाने ज्ञान आणि उत्तम पद मिळवण्यासाठी काय करायला हवे ? पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, शरीर, मन, बुद्धी आणि षड्‌रिपु यांना नियंत्रणात कसे ठेवायचे ?’, हेसुद्धा तू सांगितले आहेस.  हे सर्वज्ञ असलेल्या श्रीकृष्णा, जिभेच्या चोचल्यांसाठी आणि पोट भरण्यासाठी गायींची हत्या करणार्‍या व्यक्तींना सुबुद्धी देऊन गोवंशियांचे रक्षण कर. अशा लोकांनी साधना केल्यावर त्यांनाही गायींविषयी प्रेम निर्माण होऊन त्यांच्यावर उत्तम संस्कार होतील. त्यांच्यामध्ये गायींविषयी श्रद्धा आणि प्रीती निर्माण होऊन गायींची सेवा करण्याचा त्यांच्यावर संस्कार निर्माण होऊ दे.’

२. प्रभु श्रीरामचंद्रांना केलेल्या प्रार्थना

२ अ. हे श्रीरामा, हिंदु राष्ट्र शीघ्रतेने येऊ दे ! : ‘हे श्रीरामा, पाचशे वर्षांचे प्रयत्न, श्रद्धा, बलीदान, तसेच साधू संतांचे आशीर्वाद, सहकार्य आणि तुझे कृपाशीर्वाद यामुळे तुझे जन्मस्थळ अयोध्या येथे राममंदिर निर्माण होऊन तुझ्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. ही प्रक्रिया म्हणजे ‘विश्वातील समस्त हिंदूंचे परमभाग्य’ म्हणावे लागेल. भारतात आणि विदेशात रहात असलेल्या सर्व हिंदूंना सनातन धर्मशिक्षण मिळाले, तर शीघ्रतेने भारत ‘हिंदु राष्ट्र’ होईल. प्रत्येक हिंदु साधना करू लागला तर, राष्ट्राला आणखीन पुष्टी मिळेल. प्रत्येकाचा निर्दोष स्वभाव, निरहंकार, प्रीती, त्याग यांमुळेच रामराज्य येण्यास साहाय्य होईल. संपूर्ण जनतेला प्राचीन गुरुकुल पद्धतीचे शिक्षण मिळाल्यास शीघ्रतेने रामराज्य येईल, यात संदेह नाही.

२ आ. हे श्रीरामचंद्रा, द्वेषमूलकतेने इतरांचा नाश करणार्‍या व्यक्तींचे प्रयत्न विफल होऊ देत ! : भारतात राजर्षि विश्वामित्रासारख्या श्रेष्ठ व्यक्ती अधिकारस्थानी असल्या, तरी त्यांच्यावर केवळ द्वेषाचे फुत्कार टाकून व्यक्तींचे अस्तित्वच नव्हे, तर त्यांचा नाश करण्याचा प्रयत्न येथे होतो. त्यांचे प्रयत्न विफल कर, भगवंता !

२ इ.  हे श्रीरामचंद्रा, भारतियांना प्राचीन गुरुकुल पद्धतीचे शिक्षण मिळून भारत पुन्हा विश्वगुरुपदावर आरूढ होऊ दे ! : भारतातील पुढच्या पिढीला प्राचीन गुरुकुल पद्धतीचे शिक्षण मिळाले, तर आपला देश पुन्हा विश्वगुरु होईल. भारताला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल. सनातन संस्थेचे ३ गुरु, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यासारखे उच्च स्तरावरील गुरु सर्वांना प्राप्त होऊ देत. त्यांच्याकडून विद्या शिकून भारतात प्रत्येक गावात आद्य शंकराचार्य, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, रमण महर्षी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, पुरंदरदास (कर्नाटकातील संत) आणि कनकदास (कर्नाटकातील संत) यांच्यासारखे ज्ञानी निर्माण होऊ देत.

२ ई. हे श्रीरामचंद्रा, सहस्रो वर्षे तुम्ही राज्य केलेल्या या भरतवर्षाचे गतवैभव आम्हाला अनुभवता येऊ दे.

२ उ. हे श्रीरामचंद्रा, हनुमंतासारखा अनुग्रह आणि भाग्य आम्हाला लाभू दे ! : सदैव तुमच्या आज्ञापालनाची वाट पहाणारा वीर मारुति तुमच्या चरणीच रहात असे. कितीही कठीण सेवा असली, तरी ती तत्परतेने करणारा चिरंजीवी हनुमंत तुमची सेवा करण्यातच आनंद मानत असे. तुमच्यासारखे देवदेवता असलेल्या या देशात आमचा जन्म होणे, हे आमचे परम भाग्य आहे. ज्या प्रकारे हनुमंताने स्वतःची छाती फाडल्यावर तिथे तुमचे आणि सीतामातेचे शाश्वत स्थान असल्याचे आढळले, तसाच अनुग्रह अन् भाग्य आम्हाला लाभू दे.

हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवा, आपल्यामध्ये श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचा अंश आहे. (सप्तर्षींनी हे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सांगितले आहे.) तुमच्या कृपेने अज्ञानी अशा माझ्याकडून तुम्ही हे लिहून घेतल्याबद्दल तुमच्या श्रीचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– (पू.) श्रीमती राधा प्रभु (सनातनच्या ४४ व्या समष्टी संत, वय ८६ वर्षे), मंगळुरू, दक्षिण कन्नड. (१७.४.२०२४, रामनवमी)