Non Stick Utensils : नॉन-स्टिक भांड्यांमध्ये अन्न शिजवणे आरोग्यासाठी धोकादायक !

‘इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च’ आणि ‘नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ न्युट्रिशन’ या संस्थांचा सल्ला

नवी देहली – इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आय.सी.एम्.आर्.) आणि नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ न्युट्रिशन (एन्.आय.एन्.) या संस्थांनी भारतियांसाठी सुधारित आहार मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित केली आहेत. याद्वारे त्यांनी स्वयंपाकासाठी ‘नॉन-स्टिक पॅन’चा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे. यासह पर्यावरणपूरक भांडी वापरण्याचे आवाहन केले आहे.

नॉन-स्टिक भांडी गरम झाल्यावर विषारी धूर सोडतात !

नॉन-स्टिक भांड्यांसाठी ‘पेरफ्लुरूक्टेनोइक अ‍ॅसिड’ आणि ‘पेरफ्लुरूक्टेनसल्फोनिक अ‍ॅसिड’ या रसायनांचा वापर केला जातो. जेव्हा नॉन स्टिक भांडी उच्च तापमानामध्ये गरम केली जातात, तेव्हा या भांड्यांमधून विषारी धूर बाहेर फेकला जाऊ शकतो. या धुराच्या संपर्कामध्ये येणार्‍या लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. या धुरामुळे श्‍वसनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. यात श्‍वासोच्छवासाशी संबंधित समस्या, थायरॉइड आणि काही प्रकारच्या कर्करोगांचाही समावेश आहे.

सातत्याने होणार्‍या वापरामुळे नॉन स्टिक भांड्यांवरचे रासायनिक थर (कोटिंग) खराब होऊ शकतो. विशेषतः उच्च तापमानामध्ये स्वयंपाक केल्याने ही समस्या निर्माण होते. जसजसे कोटिंग खराब होत जाते, तसतसे नॉन स्टिक भांड्यांमधील रसायने स्वयंपाकामध्ये मिसळ्याचा धोका असतो. आम्लयुक्त खाद्यपदार्थ शिजवतांना किंवा धातुच्या भांड्यांचा वापर करतांना निर्माण होणारी ही समस्या अतिशय चिंतेची गोष्ट आहे.