ध्येय घेऊन प्रयत्न करतांना ते सात्त्विक असले, तरी तो विचार, म्हणजे स्वेच्छा असल्याने, ते पूर्ण न झाल्यास ‘मी कुठे न्यून पडलो ?’, हे शोधून ईश्वरेच्छेने वागावे !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे साधनेसंदर्भातील अमूल्य मार्गदर्शन

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

साधक : वयोमानानुसार मला शारीरिक त्रास आहेत. मी प्रसाराला जातो, तेव्हा आज अर्पणासाठीचे एक पावतीपुस्तक पूर्ण करायचे, असे ठरवतो. मला ध्येय पूर्ण करता आले नाही, तर मी निराश होतो.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ : ‘ध्येय ठेवणे चांगले आहे. एखाद्या ठिकाणी अधिक वेळ द्यावा लागतो. त्यामुळे मी ठरवलेल्या १५ संपर्कांपैकी आज १२ च पूर्ण करू शकलो, तर ती ईश्वरेच्छा झाली. माझे ध्येय सात्त्विक असले, तरी तो विचार, म्हणजे माझी स्वेच्छा आहे. मी कुठे वेळ वाया घालवला नाही ना ? मी कुठे कमी पडलो; म्हणून माझे ३ संपर्क कमी झाले ?’, असा आपण अभ्यास करायला हवा. निराशा म्हणजे अपेक्षा, म्हणजेच स्वेच्छा आहे. ध्येय ठेवून सेवा करण्याची तळमळ असणे छान आहे; पण ध्येय पूर्ण झाले नाही; म्हणून निराशेकडे जायला नको. ज्या विचाराने उत्साह आणि सकारात्मकता निर्माण होते, तो योग्य साधनेचा विचार आहे.’

(२९.९.२०२३)