पिण्याच्या पाण्याचा वापर करणार्या ४ प्रकल्पांना २० सहस्र रुपयांचा दंड !
पुणे – शहराला पाणीपुरवठा करणार्या धरणांमधील पाणीसाठा न्यून असल्याने महापालिकेने बांधकामांसाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणे सक्तीचे केले आहे; मात्र शहरातील केवळ आठच मोठ्या प्रकल्पांसाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. महापालिकेने पिण्याच्या पाण्याचा वापर करणार्या २८ ठिकाणचे नळजोड तोडले असून, ४ प्रकल्पांना २० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे.
पाणीपुरवठा विभागप्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले की, पालिकेच्या वतीने परिमंडळनिहाय मोठ्या प्रकल्पांची पहाणी करण्यात आली. याविषयीचा अहवाल आयुक्तांकडे दिला जाईल. यामध्ये शहरातील ७२७ प्रकल्पांपैकी केवळ ८ ठिकाणीच प्रक्रिया केलेले पाणी वापरले जात असल्याचे समोर आले आहे. उर्वरित बांधकामांपैकी ३८२ ठिकाणी टँकर आणि बोअरवेलचे (विंधन विहिरी) पाणी वापरले जात असल्याचे आढळले आहे. १८ ठिकाणी विहिरीचे अथवा झर्याचे पाणी वापरले जात आहे.