महाविद्यालयांमध्ये या धोरणांविषयी संभ्रम !
पुणे – नवीन ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा’त (एन्.ई.पी.) ‘भारतीय ज्ञानप्रणाली’चा (आय.के.एस्.) समावेश करण्यात आला आहे. देशातील समृद्ध ज्ञान परंपरांतील मूल्यांचे शिक्षण, संशोधन आणि विकास व्हावा, हा यामागील हेतू होता; मात्र महाविद्यालयांमध्ये ‘आय.के.एस्.’ हे सांस्कृतिक उदात्तीकरण असल्याचा अपप्रचार (गैरसमज) झाल्याचे निरीक्षण शिक्षणतज्ञांनी नोंदवलेले आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून राज्यातील महाविद्यालयांमध्ये ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा’ची कार्यवाही होणार आहे. त्या दृष्टीने आढावा घेतल्यानंतर हे लक्षात आले आहे. हा अपप्रचार थांबवण्यासाठी राज्याच्या ‘सुकाणू समिती’च्या वतीने काही मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित करण्यात येणार आहेत. प्राध्यापकांनी ‘आय.के.एस्.’कडे संकुचित नव्हे, तर सर्वसमावेशक दृष्टिकोन अवलंबावा, असा सल्लाही शिक्षणतज्ञांनी दिला आहे.
‘सुकाणू समिती’चे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर म्हणाले की, भारतीय ज्ञान परंपरांविषयी महाविद्यालयांमध्ये गोंधळ दिसत आहे. परंपरांचे उदात्तीकरण नव्हे, तर त्यातील ज्ञान, विज्ञान पुढे येणे आवश्यक आहे. ‘आय.के.एस्.’विषयी आम्ही लवकरच सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे सांगू.