रायपूर (छत्तीसगड) – राज्यातील विजापूरमध्ये झालेल्या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले आहेत. ही चकमक गंगनूर पोलीस ठाण्यांतर्गत पेडिया गावाजवळ झाली. नक्षलवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा सैनिकांचे पथक मोहीम राबवत होते. नक्षलवाद्यांनी जवळच्या जंगलातून गोळीबार चालू केला. पोलिसांनीही प्रत्युत्तर दिले. घटनास्थळावरून १२ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. या मोहिमेत २ सैनिकही घायाळ झाले आहेत. याआधी कांकेड येथे झालेल्या चकमकीत २९ नक्षलवादी मारले गेले होते. राज्यात सरकार पालटल्यानंतर नक्षलविरोधी कारवाई तीव्र झाली आहे.
ताज्या चकमकीविषयी बोलतांना राज्याचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई म्हणाले, ‘‘आमच्या सैनिकांना नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत मोठे यश मिळाले आहे. आम्ही सरकारमध्ये आल्यापासून नक्षलवादाच्या विरोधात जोरदार लढा देत आहोत. केंद्रशासनालाही छत्तीसगडमधून नक्षलवाद संपवायचा आहे.’’
छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा म्हणाले की, नक्षलवादाचा प्रश्न चर्चेने सोडवला पाहिजे. बस्तरमध्येही विकासात्मक कामे झाली पाहिजेत. नक्षलवाद्यांनी बस्तरच्या लोकांना ओलीस ठेवू नये. बंदुकीच्या जोरावर शाळा आणि रुग्णालये बांधू नयेत. नक्षलवाद्यांनी स्वत:हून पोलिसांना शरण गेले पाहिजे. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नवीन पुनर्वसन योजना बनवणार आहोत.