‘आध्यात्मिक मानवतावाद आणि आंतरधर्मीय सुसंवाद’ याचे प्रवर्तक स्वामी श्री. आनंद कृष्णा यांचे इंडोनेशिया या देशातील सात्त्विक आश्रम आणि त्यांचे साधक !

‘२८.११ ते ६.१२.२०२३ या कालावधीत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने आम्ही (मी, सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि श्री. श्रीराम लुकतुके) इंडोनेशिया येथील जकार्ता आणि बाली येथे गेलो होतो. तेथे स्वामी श्री. आनंद कृष्णा यांनी आमची निवासव्यवस्था आणि प्रमुख स्थळांना भेट देण्याची व्यवस्था केली. आम्ही त्यांच्या इंडोनेशिया येथील बोगोर, जकार्ता येथील ‘वन अर्थ योगा मेडिटेशन सेंटर’ आणि उबूद बाली येथील ‘आनंद आश्रम’ येथे रहात असतांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

स्वामी श्री. आनंद कृष्णा यांचा जकार्ता येथील आनंद आश्रम

स्वामी श्री. आनंद कृष्णा यांचा परिचय

स्वामी श्री. आनंद कृष्णा

स्वामी श्री. आनंद कृष्णा सिंधी वंशाचे असून इंडोनेशिया हे त्यांचे जन्मस्थान आहे. ते इंडोनेशिया येथील ‘आध्यात्मिक मानवतावाद, तसेच आंतरधर्मीय सुसंवाद’ याचे प्रवर्तक आहेत. त्यांनी विपुल लेखनकार्यही केले आहे. श्री. आनंद कृष्णा यांनी आम्हाला जकार्ता येथील आश्रम दाखवला. ते अल्पाहार आणि भोजन घेण्याच्या वेळी आमच्या समवेत बसून आमच्याशी प्रेमाने संवाद साधत असत.    

१. स्वामी श्री. आनंद कृष्णा यांचे साधक श्री. जोहानास यांनी जकार्ता विमानतळावर उत्साहाने आणि नम्रतेने स्वागत करणे

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

‘स्वामी श्री. आनंद कृष्णा यांचे साधक श्री. जोहानास हे जकार्ताहून अडीच घंटे प्रवास करून आम्हाला घ्यायला आले होते. श्री. जोहानास २० वर्षांपासून श्री. आनंद कृष्णा यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. ते गृहस्थी जीवन जगत असतांनाही आश्रम जीवनाशी जोडले आहेत. आमची तपासणी होऊन आम्हाला बाहेर यायला उशीर झाल्यामुळे त्यांना दोन घंटे वाट पहावी लागली. आम्ही त्यांना भेटल्यावर त्यांनी हात जोडून नम्रतेने आमचे स्वागत केले. त्यांच्या चेहेर्‍यावर थकवा जाणवत नव्हता किंवा ‘इतका वेळ थांबावे लागले’, याविषयी जराही उद्विग्नता नव्हती. त्यांच्यात उत्तम सेवाभाव जाणवला. विमानतळावरून स्वामी श्री. आनंद कृष्णा यांच्या आश्रमात पोचण्यासाठी आम्हाला अडीच घंटे प्रवास करायचा होता. ‘आम्हाला असलेला थकवा दूर व्हावा’, यासाठी श्री. जोहानास यांनी आम्हाला वाटेत एके ठिकाणी कॉफी पिण्यासाठी नेले.

२. स्वामी श्री. आनंद कृष्णा यांचा जकार्ता येथील आदर्श आश्रम

सद्गुरु नीलेश सिंगबाळ

श्री. जोहानास यांनी आम्हाला रात्री १२ वाजता जकार्ता येथील श्री. आनंद कृष्णा यांच्या आश्रमात पोचवले. तेथे आमचे रहाणे आणि जेवण इत्यादींची उत्तम व्यवस्था होती. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले साधक आणि संत यांची विदेशातही सर्वाेतोपरी काळजी घेतात’, याची आम्हाला अनुभूती आली.

२ अ. आश्रमातील साधकांमध्ये ‘सतर्कता, नम्रता, आज्ञापालन, प्रेमभाव, सेवाभाव, गुरूंप्रती भाव’ हे गुण जाणवणे : ‘श्री. आनंद कृष्णा यांच्या आश्रमातील सर्व साधकांमध्ये चांगले साधकत्व आहे’, असे मला जाणवले. तेथील साधकांमध्ये ‘सतर्कता, नम्रता, आज्ञापालन, प्रेमभाव, सेवाभाव आणि गुरूंप्रती भाव’ असे अनेक गुण आहेत. आम्ही त्यांच्या गुरूंच्या आश्रमात आलो आहोत, तर ‘आम्हाला काही अल्प पडू नये आणि गुरूंना अपेक्षित अशी सेवा व्हावी’, यासाठी ते प्रयत्न करत होते.

एकदा पाऊस पडत होता आणि आम्ही खोलीत होतो. आम्ही ‘बाहेर कसे पडायचे ?’, या विचारात असतांना एका साधकाने खोलीच्या बाहेर आमच्यासाठी छत्र्या आणून ठेवल्या. आमच्याशी समन्वय करणारा त्यांचा साधक श्री. श्रीराम लुकतुके यांना भ्रमणभाषवर प्रत्येक वेळी संदेश पाठवून सत्संग, जेवण इत्यादींची माहिती कळवत असे.

२ आ. आश्रमातील साधकांच्या वागण्यात ‘शिस्त आणि प्रेमभाव’ यांचा चांगला संगम असणे : साधकांच्या वागण्यात ‘शिस्त आणि प्रेमभाव’ या दोन्हींचा चांगला संगम आहे. तेथील साधक आश्रमात स्वच्छता आणि नीटनेटकेपणा रहाण्यासाठी प्रयत्न करतात. ते अग्निहोत्र करण्याच्या वेळा पाळतात. ते ‘आश्रमातील वातावरण सात्त्विक रहावे’, यासाठी ‘चांगले आचरण करणे, नम्रपणे बोलणे आणि भाव ठेवणे’, असे प्रयत्न करत आहेत’, असे मला जाणवले. तेथे आमच्यासाठी विशेष शाकाहारी भोजन बनवले जायचे. ‘आम्हाला नेटवर्क चांगले उपलब्ध होईल’, अशा प्रकारे आमची निवासव्यवस्था केली होती.

२ इ. आश्रमातील साधक आश्रमाच्या बाहेर असतांनाही त्यांच्या वागण्यात साधकत्व जाणवणे : आम्ही त्यांच्या वाहनाने बाहेर जात असू. त्यांचे साधक आमच्या समवेत असत. साधकांनी आम्हाला तेथील काही प्रमुख प्रेक्षणीय स्थळे दाखवली. साधक आश्रमाबाहेर असतांनाही त्यांच्यातील साधकत्व जाणवत होते, उदा. वेळ वाया न घालवणे, आमच्या संदर्भातील सेवा लक्षपूर्वक आणि परिपूर्ण करणे, ‘आम्हाला सर्व ठाऊक आहे’, असे गृहीत न धरता ‘आम्हाला कसे सोयीचे होईल ?’, हे नम्रपणे जाणून घेऊन त्यानुसार कृती करणे, वाहनामध्ये आमच्यासाठी पाण्याच्या बाटल्या ठेवणे इत्यादी.

३. स्वामी श्री. आनंद कृष्णा यांच्या बाली येथील आश्रमातील साधकांनी भावपूर्ण स्वागत करणे

त्यानंतर आम्ही इंडोनेशियातील बाली येथे गेलो. स्वामी श्री. आनंद कृष्णा यांचे साधक २ घंटे प्रवास करून आम्हाला घ्यायला आले होते. श्री. आनंद कृष्णा यांनी आमची रहाण्याची सोय त्यांच्या बाली येथील आश्रमातच केली. आम्ही आश्रमात रात्री उशिरा पोचलो, तरीही तेथील साधकांनी आमचे औक्षण करून स्वागत केले. त्यांनी आमची निवास आणि भोजन व्यवस्था उत्तम प्रकारे केली. बाली येथील आश्रमात केवळ ३ पूर्णवेळ साधक रहातात. त्यांच्यातील आश्रमाविषयीच्या भावामुळे ते आश्रम व्यवस्थापन पहाणे, तसेच आश्रमात येणार्‍या लोकांना हवे-नको ते पहाणे, या सेवा भावपूर्ण करतात.

४. स्वामी श्री. आनंद कृष्णा यांचे कुटा बाली येथील ‘वन अर्थ स्कूल’ विद्यालय

बाली येथे ३ दिवस राहून आम्ही श्री. आनंद कृष्णा यांच्या कुटा बाली येथे ‘वन अर्थ स्कूल’ या विद्यालयात गेलो. हे विद्यालय बाली येथील आश्रमापासून चारचाकीने प्रवास करतांना अनुमाने २ घंटे अंतरावर आहे.

४ अ. विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करणे : आम्ही विद्यालयात गेल्यावर विद्यार्थ्यांनी आमचे औक्षण करून स्वागत केले. विद्यालयातील वातावरण चांगले आणि उत्साही आहे. तेथे विद्यार्थ्यांना ‘शालेय शिक्षणासह स्वसंरक्षण, नैतिक मूल्य संवर्धन, गुणवृद्धी, निसर्गाविषयी प्रेम जोपासणे, स्वावलंबन आणि नम्रता हे गुण अंगी बाणवणे’, याविषयी शिकवले जाते.

४ आ. तेथील सर्व शिक्षकांमध्ये नम्रता, प्रेमभाव, दायित्वाची जाणीव आणि गुरूंप्रती भाव जाणवला. शिक्षकांमध्ये ‘आपण गुरूंचे कार्य करत आहोत’, हा भाव जाणवला.

४ इ. या विद्यालयाजवळच त्यांचे एक मंदिर आहे. तेथील उत्तरदायी साधिकेने आम्हाला मंदिराचे भावपूर्ण दर्शन घडवले.

५. इंडोनेशियातील वातावरण गोवा येथील वातावरणाप्रमाणे असणे, ‘श्री. आनंद कृष्णा यांच्या आश्रमातील साधक आपल्याच साधक परिवारातील आहेत’, असे जाणवणे

इंडोनेशिया येथील निसर्ग गोवा येथील निसर्गाप्रमाणेच आहे.  ‘तेथील आंबा, काजू, फणस, बिंबल यांसारखी फळे, तसेच शेती, डोंगर, समुद्र आणि अधूनमधून पडणारा पाऊस पाहिल्यावर आम्ही गोव्यातच आहोत’, असे आम्हाला वाटत होते. आम्हाला रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाची आठवण येत होती. ‘श्री. आनंद कृष्णा यांच्या आश्रमातील साधक आपलेच आहेत आणि हा आपलाच साधक परिवार आहे’, असे वाटत होते. आम्हाला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या शिकवणीमुळे आणि त्यांच्या कृपेने समष्टीतील व्यापकत्व निर्माण झाल्याचा आनंद अन् कृतज्ञता वाटत होती.

– (सद्गुरु) नीलेश सिंगबाळ आणि (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे (३०.१२.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक