प्रोत्साहन मिळण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजकांना विविध पुरस्कार देण्यात येणार ! – फेडरेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू सावंत

रत्नागिरी – ‘फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ या संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील उद्योजकांना विविध पुरस्कार देण्यात येणार आहेत, अशी माहिती फेडरेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू सावंत यांनी दिली. जिल्ह्यातील उद्योजकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी हे पुरस्कार दिले जाणार आहेत. उद्योजकांनी केलेल्या श्रमाचा उद्योजकीय कौशल्याचा गौरव करणे, त्यांचे अभिनंदन करणे, जिल्ह्याची अधिकाधिक औद्योगिक प्रगती व्हावी; म्हणून हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

यामध्ये रत्नागिरी जिल्हा उद्योजकता पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट स्टार्ट पुरस्कार, सामाजिक जबाबदारी पुरस्कार, जागतिक उद्योजक पुरस्कार आणि विशेष उद्योजकीय पुरस्कार असे विविध पुरस्कार देण्यात येणार आहेत. हे पुरस्कार जिल्ह्यात न्यूनतम ५ वर्षे यशस्वीपणे औद्योगिक उत्पादन करून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात भर घालणार्‍या उद्योजकास देण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील उद्योजक ज्याने २५ वर्षे रत्नागिरी जिल्ह्यात उद्योग केला आहे, नावीन्यपूर्ण कल्पनेच्या माध्यमातून उद्योग यशस्वी केला आहे आणि सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतून विविध उपक्रमांत सहभाग घेतला आहे, अशा उद्योजकास जीवनगौरव पुरस्कार देण्यात येईल.

सर्वोत्कृष्ट स्टार्टअप पुरस्कार अपवादात्मक नवकल्पना, वाढीची क्षमता, उद्योजक वृत्ती, नावीन्यपूर्ण मानके स्थापित करणे, सकारात्मक पालट घडवणे, जिल्हा प्रभावित करणे, अशा स्टार्टअपला दिला जाणार आहे.

ज्यांनी स्वत:च्या उद्योजकीय प्रवासाचा प्रारंभ रत्नागिरी जिल्ह्यातून केला आहे आणि राज्य, देश आणि जागतिक पातळीवर यश मिळवले आहे, अशा उद्योजकाला जागतिक उद्योजकता पुरस्कार देण्यात येणार आहे. विशेष उद्योजकीय पुरस्कार एखाद्या होतकरू उद्योजकाने त्याच्या नावीन्यपूर्ण कल्पनेने उद्योगाच्या माध्यमातून उद्योग, व्यापार किंवा शेती या कोणत्याही क्षेत्रात ठसा उमटवला आहे, कुशल – अकुशल स्थानिक कामगारांना, बचत गटांना रोजगार आणि बाजारपेठ मिळवून दिली आहे, अशा उद्योजकाला किंवा उद्योग समूहाला देण्यात येईल.

या पुरस्कारासाठी उद्योजकाला स्वतः किंवा त्याच्या वतीने इतर कोणताही उद्योजक किंवा संघटनेला अर्ज करता येईल. निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने केली जाईल. पुरस्कार वितरण समारंभात त्यांनी स्वतः उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारणे अपेक्षित आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजकांनी ३१ मे २०२४ पूर्वी आपले अर्ज https://frdcci.org.in/award-form/ या लिंक वर किंवा फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्र्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, द्वारा गणेश मेटल वर्क्स, डी 19, मिरजोळे एम्.आय.डी.सी., रत्नागिरी ४१५६३९ या पत्त्यावर पाठवावे.