संपादकीय : ब्रिटन जिहाद्यांची रणभूमी होणार ?

ब्रिटनमध्ये काही दिवसांपूर्वी नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्या. ब्रिटनमध्ये काही महिन्यांनी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर या स्थानिक निवडणुकांना महत्त्व प्राप्त झाले होते. यात पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सत्ताधारी ‘कंझर्व्हेटिव्ह पक्षा’ला दणका बसला आहे. निवडणुकांचे निकाल पहाता ब्रिटनमध्ये सत्तांतर अटळ असून ‘सुनक सत्ताच्युत होणार’, असे भाकीत वर्तवले जात आहे. सध्या ब्रिटनमध्ये सुनक यांच्या विरोधात वातावरण तापले आहे. त्यामुळे नगर परिषदांच्या निवडणुकीचा जो निकाल पहायला मिळाला, त्यात आश्चर्य वाटण्यासारखे विशेष काही नाही. या निवडणुकीतील महत्त्वाचा पैलू म्हणजे निवडून आलेल्या गाझाप्रेमी नगरसेवकांची लक्षणीय संख्या होय ! या निवडणुकीत ४० गाझाप्रेमी उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. गाझाप्रेमींनी मोठ्या प्रमाणात निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ आहे. बर्‍याच जणांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. ब्रिटनच्या वायव्येकडील भागांत मुसलमानांची संख्या लक्षणीय आहे. ओल्डहॅमसारख्या शहरात नगर परिषदेच्या २१ जागांवर ८ अपक्ष निवडून आले. हे सर्वजण कट्टर गाझाप्रेमी आहेत. ‘ग्रीन पार्टी’चे मोतिन अली यांनी निवडून आल्यानंतर ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा दिल्या. याचा अर्थ तेथील मुसलमान राजकारण्यांसाठी ही केवळ निवडणूक नव्हती, तर सत्तेत येऊन जिहाद पुकारण्याचे त्यांचे षड्यंत्र आहे. जगभरातील जिहाद्यांना राजकीय पाठिंबा कसा मिळेल ? यासाठी तेथील धर्मांधांचे प्रयत्न आहेत आणि निवडणुकीचा निकाल पहाता ते बर्‍यापैकी यशस्वीही झाले आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे माजी मंत्री जेकब रीस मोग यांचे वक्तव्य बोलके आहे. ते म्हणतात, ‘परराष्ट्र व्यवहार हा ब्रिटीश संसदेचा विषय आहे, स्थानिक परिषदांचा नाही; मात्र समाज संघटित करण्याऐवजी मुसलमानांना घेऊन समाजात दुफळी माजवण्याचा साम्यवाद्यांनी खेळलेल्या खेळीचा हा परिणाम होय. देशासाठी हे धोकादायक आहे.’ मोग यांचे वक्तव्य हे ब्रिटनची सद्यःस्थिती दर्शवते. ब्रिटनमधील गाझाप्रेमींना देशाच्या भवितव्याची चिंता नाही. त्यांना गाझामध्ये काय चालले आहे यात रस आहे आणि तेथे कथित शांती नांदण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. ‘गाझाप्रेमी हे छुपे हमासप्रेमी असतात’, हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे असे लोकप्रतिनिधी ज्या देशात असतील, त्या देशाचे भवितव्य काय असेल ? याचा ब्रिटीश नागरिकांनी विचार करण्याची वेळ आता आली आहे.

राजकारण्यांवर दबाव !

ब्रिटीश जनता काय किंवा ब्रिटनमधील राजकारणी काय ? त्यांच्या मानगुटीवर अभिव्यक्तीस्वातंत्र्य, तसेच मानवतावाद यांचे भूत बसलेले आहे. त्यातही ब्रिटनमधील मुसलमानांच्या वाढत्या संख्येमुळे तेथील राजकारणी त्यांच्या एकगठ्ठा मतांसाठी प्रयत्नशील असतात. या मतांसाठी हे राजकारणी त्यांची ध्येयधोरणेही पालटायला सिद्ध आहेत. सध्या ब्रिटनमधील ‘मजूर पक्षा’चे कीट स्टार्मर हे चर्चेत असलेले राजकारणी. स्टार्मर पुढील निवडणूक जिंकून देशाचे पंतप्रधान होऊ शकतात, असा कयास बांधला जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचा पक्ष निवडणुकीत कशी चमक दाखवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध पेटल्यावर स्टार्मर यांनी पॅलेस्टाईनच्या बाजूने भूमिका घेतली नाही. स्टार्मर हे इस्रायलप्रेमी आहेत. ‘इस्रायल-हमास युद्धाच्या वेळी इस्रायलला शस्त्रे पुरवणे आवश्यक आहे’, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांना देशातील मुसलमान समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. या भूमिकेमुळे संतापून त्यांच्या पक्षातील अनेक नेत्यांनी पक्षाचे त्यागपत्र दिले. स्थानिक निवडणुकांमध्ये अपक्ष म्हणून उभे राहिलेले अनेक उमेदवार हे मजूर पक्षातून फुटून बाहेर पडलेले नेते आहेत. त्यांना स्टार्मर यांची पॅलेस्टाईनच्या बाजूने उभे न रहाण्याची कृती ही इस्लामविरोधी वाटते. स्टार्मर यांना भविष्यात संसदेची निवडणूक जिंकून पंतप्रधान व्हायचे असेल, तर त्यांना मुसलमानांच्या एकगठ्ठा मतांवर अवलंबून रहावे लागेल. या निवडणुकीत लोकांचा कल पहाता स्टार्मर मुसलमानांच्या बाजूने झुकू शकतात. यासाठी त्यांना पक्षांतर्गत दबावालाही सामोरे जावे लागू शकते. ‘या निवडणुकीमुळे आपल्याला हाच संदेश मिळाला आहे की, गाझाच्या संदर्भात लोकांची मते ऐकली पाहिजेत आणि त्यानुसार कृती केली पाहिजे’, असे मजूर पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे मत आहे. स्टार्मर या दबावासमोर झुकून भूमिका पालटतात कि स्वतःच्या भूमिकेवर ठाम रहातात ? हे येणार्‍या काळात पहावे लागेल.

ब्रिटनमध्ये गाझाप्रेमींचे साम्राज्य येणार ?

सध्या जगभर गाझाप्रेमींकडून आंदोलने केली जात आहेत. ब्रिटनमधील विद्यापिठांमध्येही ती चालू आहेत. इस्रायलला पाठिंबा देणार्‍यांना झुकवून त्यांना पॅलेस्टाईनच्या बाजूने वळवण्यासाठी जगभर रचलेले हे षड्यंत्र आहे. ब्रिटनमध्ये गाझाप्रेमींनी घोषणापत्र बनवले आहे. त्यानुसार ‘देशातील मुसलमानांची मते हवे असतील, तर ब्रिटनने इस्रायलशी असलेले सामरिक संबंध तोडावेत, तसेच पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी’, असे त्यात नमूद आहे. स्थानिक निवडणुकीत मुसलमानांनी जे एकगठ्ठा मतदान केले, ते पाहून संसदीय निवडणुकीत जिंकून येण्यासाठी त्यांची मते महत्त्वाची ठरणार आहेत. गाझाप्रेमी ज्या नगर परिषदेत निवडून आले, तेथील नगर परिषदेचे सभागृह भविष्यात जिहादची रणभूमी झाली, तर आश्चर्य वाटणार नाही.

मुसलमानांनी युरोपमधील विविध देशांमध्ये आश्रय घेतला. ज्या देशांनी त्यांना आश्रय दिला, त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी त्यांनी तेथील कायदे हातात घेण्याचा प्रयत्न केला. फ्रान्स, ब्रिटन, नेदरलँड्स, जर्मनी आदी देशांमध्ये तेथील शरणार्थी मुसलमानांचा उद्दामपणा विविध घटनांतून दिसून आला. हे सर्व होत असतांनाही या देशांतील काही कथित पुरो(अधो)गामी, साम्यवादी आणि मानवाधिकारवाले यांचा गट मात्र तेथील उद्दाम मुसलमानांच्या कृत्यांवर पांघरूण घालतांना दिसत आहे. त्याची फळे या देशांना भोगावी लागत आहेत. असे असूनही ही मंडळी शहाणी झालेली नाहीत, हा भाग वेगळा. ब्रिटनमध्ये मागील काही वर्षांपासून जिहादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. तेथील अन्य इस्लामी देशांतून आलेल्या मुसलमानांनी अनेक तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त केले असून त्यामुळे तेथे ही भेडसावणारी मोठी समस्या आहे. असे असतांनाही या देशांतील राजकारणी किंवा सामाजिक धुरिणी स्वतःच्या धोरणांमध्ये पालट करतांना दिसत नाहीत, उलट त्यांना चुचकारण्यासाठी या राजकारण्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत केवळ ब्रिटनच काय पूर्ण युरोपचे इस्लामीकरण झाल्यास आश्चर्य वाटणार नाही !