रत्नागिरी – साहित्याचे नोबेल पुरस्कार गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांना वर्ष १९३१ मध्ये मिळाले. निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षण देणारी शांतीनिकेतनची स्थापना त्यांनी केली. ‘एकला चलो रे’ हे टागोर यांचे गीत सार्या बंगालचे गीत आहे. टागोर बहुआयामी व्यक्तीमत्त्व होते, असे प्रतिपादन प्रधान जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांनी केले. गुरुवर्य टागोर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा न्यायालयात आयोजित कार्यक्रमात श्री. गोसावी बोलत होते.
श्री. गोसावी पुढे म्हणाले, ‘‘जीवनातला निखळ आनंद हरवून टाकणार्या शाळांना टागोर यांची संमती नव्हती. रवींद्रनाथ यांनी निसर्ग, भाषा आणि संगीत यावर प्रेम करायला शिकवले. जगातल्या ज्येष्ठ कवीमध्ये रवींद्रनाथ यांची गणना होते. रवींद्रनाथ कवी, गीतकार, नाटककार, कलाकार, संगीतकार आणि चित्रकार होते. गुरुवर्य टागोर यांचे मोठे बंधू जिल्हा न्यायाधीश होते. ते रत्नागिरीमध्ये असतांना वर्ष १८८६/८७ च्या दरम्यान गुरुवर्य टागोर रत्नागिरी जिल्हा न्यायाधिशांच्या निवासात काही काळ मुक्कामाला होते. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी गुरुवर्यांचे देखणे ‘म्युरल’ रत्नागिरी जिल्हा न्यायालयाच्या आवारात उभारण्यात आले आहे.’’
रत्नागिरी बारचे अध्यक्ष अधिवक्ता विलास पाटणे म्हणाले की, आपले ‘जन गण मन’ आणि बांगलादेशाचे ‘आमार शोनार बांगला’ या राष्ट्रगीतांची रचना टागोर यांची आहे. श्रीलंकेच्या राष्ट्रगीताची रचना त्यांच्या साहित्याच्या प्रेरणेतून झाली आहे. गुरुवर्य टागोर आणि महाराष्ट्राचे नात अनोखे आहे. संत तुकाराम यांच्या अभंगाचा अनुवाद, तसेच छत्रपती शिवाजी महाराजावरील खंडकाव्य त्यांनी रचले होते.
याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश श्री. अंबळकर, जिल्हा सरकारी अधिवक्ता अनिरुद्ध फणसेकर उपस्थित होते. विधी सेवा प्राधिकरणाचे एन्.जे. गोसावी यांनी प्रास्ताविक केले. महिला उपाध्यक्ष अधिवक्ता शाल्मली आंबुलकर यांनी स्वागत आणि सूत्रसंचालन अधिवक्ता मीरा देसाई यांनी केले. आभार अधिवक्ता पराग शिंदे यांनी मानले.