दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : दिवा आणि मुंब्रा येथील काही भागांत ८ घंटे पाणी बंद रहाणार; इ.व्ही.एम्. जिथे ठेवली आहेत, तिथे कडक पहारा !…

दिवा आणि मुंब्रा येथील काही भागांत ८ घंटे पाणी बंद रहाणार

(प्रतिकात्मक चित्र)

ठाणे – दिवा येथील शीळ, खर्डी आणि भोलेनाथनगर, तसेच मुंब्रा येथील वाय जंक्शनपासून मुंब्रा अग्नीशमन केंद्रापर्यंतच्या भागात ९ मे सकाळपासून १० मे सायंकाळपर्यंत ८ घंटे पाणीपुरवठा बंद रहाणार आहे. या काळात अनधिकृत नळजोडणी खंडित करणे आणि व्हॉल्व्ह दुरुस्ती यांची कामे होणार आहेत.


इ.व्ही.एम्. जिथे ठेवली आहेत, तिथे कडक पहारा !

इ.व्ही.एम्

रायगड – जिल्ह्यात ‘स्ट्राँग रूम’मध्ये त्रिस्तरीय सुरक्षेत इ.व्ही.एम्. ठेवलेले आहेत. येथे २६ दिवस खडा पहारा असणार आहे, तसेच सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची दृष्टीही असेल.  ‘स्ट्राँग रूम’मध्ये  जाण्यासाठी तीन स्तर पार करावे लागणार आहेत. जिल्ह्यात ७ मे या दिवशी मतदान पार पडले आहे.


गोराई गावाचा पाण्याचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयात !

मुंबई उच्च न्यायालय

मुंबई – गोराई येथील जवळपास अडीच सहस्र कुटुंबांना पुरेसे पाणी मिळत नसल्याचे गार्‍हाणे, वर्ष अखेरपर्यंत सक्शन टँक आणि पंप यांचे काम पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती मुंबई महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयात दिली. तोपर्यंत प्रतिदिन १० टँकरनी पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्याचे निर्देश महापालिकेने उच्च न्यायालयाला दिले आहेत.


अवेळी पावसाने २६०० मेट्रिक टन युरीया खत पाण्यात !

चंद्रपूर – ७ मे या दिवशी दुपारी अचानक आलेल्या पावसाने खरीप हंगामासाठी आणलेले २६०० मेट्रिक टन युरीया खत पाण्यात गेले आहे. शासकीय खताची एक ४६ डब्यांची रॅक चंद्रपूर मालधक्यावर खाली करण्यात आली होती. त्या वेळी अचानक पाऊस आल्याने संपूर्ण खत उघड्यावर असल्याने भिजले त्यामुळे हे सर्व खत वाया जाण्याची शक्यता आहे.