ओपा (खांडेपार, गोवा) येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती कालिंदी गावकर (वय ८५ वर्षे) यांची त्यांच्या सुनेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

श्रीमती कालिंदी गावकर

१. आई-वडिलांनी ‘तुला चांगले सासू-सासरे मिळाले’, असे सांगणे

‘माझे माहेर शहरात आणि सासर ग्रामीण भागात आहे. त्यामुळे माझ्या विवाहाच्या वेळी माझ्या आई-वडिलांना वाटत होते, ‘हिला गावी कसे देणार ?’ माझे आई-वडील एकदा माझ्या सासरी जाऊन आल्यावर माझ्या सासरची माणसे चांगली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. माझे आई-वडील मला नेहमी सांगतात, ‘‘तुझ्या सासरची माणसे पुष्कळ चांगली आहेत. तुला चांगले सासू-सासरे मिळाले.’’

२. सुनेला सर्व शिकवणे

सौ. मेघना गावकर

माझा विवाह लहान वयात झाला असल्याने मी माहेरी जेवढा काळ राहिले, त्याहून अधिक काळ सासरी राहिले आहे. त्यामुळे मला आई-वडिलांपेक्षाही आईंचा (सासूबाईंचा) सहवास अधिक मिळाला आहे. आईंनीच मला सर्व शिकवले आहे.

३. शांत स्वभाव

‘त्यांची चिडचिड झाली’, असे मी कधीच पाहिले नाही. त्यांची कोणाविषयीही वाईट भावना नसते.

४. घरी आलेल्या व्यक्तींचे प्रेमाने आदरातिथ्य करणे

‘घरी कोणी अकस्मात् आले, तर एवढ्या व्यक्तींचा स्वयंपाक आणि पाहुणचार कसा करायचा ?’, असे एखाद्याला वाटू शकते पण आईंना तसे वाटत नाही. त्या घरी येणार्‍या व्यक्तींचा पाहुणचार स्थिर राहून आणि प्रेमाने करतात.

५. देवाप्रती श्रद्धा

त्यांची प्रत्येक प्रसंगात देवावर श्रद्धा असते आणि आम्हालाही त्या देवावर श्रद्धा ठेवायला सांगतात. त्या नेहमी सांगतात, ‘‘देवावर श्रद्धा ठेवली की, देवच मार्ग दाखवतो.’’

६. पडद्यासमोर आम्ही करतांना दिसतो; मात्र त्या पडद्यामागे राहून आम्हाला शक्ती देतात. त्यांनी केलेले सत्कर्म आणि पुण्याई यांचा आता आम्हाला लाभ होत आहे.

७. श्रीमती कालिंदी गावकर यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

मला एखाद्या गोष्टीचा ताण आला किंवा काही झाल्यास मी त्याविषयी आईंशी मनमोकळेपणाने बोलल्यावर मला हलकेपणा जाणवतो. माझी चिडचिड होत असल्यास मी त्यांना त्याविषयी सांगितल्यावर त्या मला प्रेमाने शांत करतात.’

– सौ. मेघना गावकर (श्रीमती गावकर यांची सून), ओपा (खांडेपार, गोवा) (१.५.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक