श्री. सुदीश पुथलत यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

६ मे या दिवशी या लेखातील काही सूत्रे आपण पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहूया.

या लेखाच्या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/790973.html 

४. परात्पर गुरुदेव यांच्यामधील प्रेमभाव

४ अ. आम्ही मुंबई सेवाकेंद्रातून घरी जाण्यासाठी निघतांना कधी कधी प.पू. गुरुदेव आम्हाला काहीना काही खाऊ बांधून देत असत. ते आम्हाला काय देतात, हे कधी महत्त्वाचे नसायचे; पण त्यातून त्यांचे जे प्रेम व्यक्त व्हायचे, ते माझ्या मनाला पुष्कळ भावत होते.

४ आ. प.पू. भक्तराज महाराज एका भक्ताच्या घरी आले असता महाप्रसादाच्या वेळी त्या घरातील मोलकरणीला परात्पर गुरुदेवांनी ‘सर्व जण एक समान आहेत’, असे सांगून संकोच न करता सर्वांसमवेत महाप्रसाद घेण्यास सांगणे : एकदा मुंबईमध्ये प.पू. भक्तराज महाराज त्यांच्या एका भक्ताच्या घरी आले होते. तेथे आलेल्या सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे नियोजन केले होते. त्या वेळी त्या घरातील गृहकृत्य साहाय्यक (मोलकरीण) स्वयंपाकघरात महाप्रसाद घेण्यासाठी उभी होती; परंतु ‘तेथे असलेली गर्दी आणि थोरामोठ्या लोकांमध्ये मी कशी जाऊन बसू ?’, असे विचार तिच्या मनात असल्यामुळे तिच्या मनाची चलबिचल होत होती. तिची अवस्था पाहून तिला प.पू. गुरुदेव अत्यंत प्रेमाने म्हणाले, ‘‘येथे कुणीही लहान मोठे नाही. सर्व जण समान आहेत. तुम्ही पंक्तीमध्ये बसून सर्वांसह महाप्रसाद घ्यावा.’’ या एका लहानशा प्रसंगावरून ‘प.पू. गुरुदेवांमध्ये किती अधिक प्रेमभाव होता !’, हे मला समजले. त्या प्रसंगात ‘त्यांनी किती सहजतेने एका गृहकृत्य साहाय्य करणार्‍या महिलेच्या मनाची स्थिती समजून घेऊन तिला कसे सांभाळून घेतले !’, हे माझ्या लक्षात आले.

श्री. सुदीश पुथलत

५. एका बुद्धीजीवी व्यक्तीचा प.पू. गुरुदेवांच्या संदर्भात अभिप्राय आणि अनुभव

५ अ. ‘प.पू. गुरुदेव जगातील एकमेव व्यक्ती आहेत, ज्यांच्याकडे तुमच्या सर्व शंकांची उत्तरे मिळतात’, असे श्री. रसेल यांनी सांगणे : बर्‍याच वेळा प.पू. गुरुदेवांना भेटण्यासाठी सेवाकेंद्रात रसेल नावाची एक व्यक्ती येत होती. ती व्यक्ती जगातील पुष्कळ देशांमध्ये फिरून आलेली होती. प.पू. गुरुदेवांच्या विषयी बोलतांना त्या व्यक्तीने एकदा म्हटले, ‘‘प.पू. गुरुदेव ही जगातील अशी एकमेव व्यक्ती आहेत, ज्यांच्याकडे तुमच्या सर्व शंकांची उत्तरे मिळतात.’’ (He is the only person in the world, who has answers to all your queries.)

५ आ. परात्पर गुरुदेवांनी इंदूरला न जाण्याविषयी सांगूनही मुंबईहून इंदूरला जाण्यासाठी निघतांना त्यात बुद्धीअगम्य अडचणी येणे : एकदा त्या व्यक्तीने प.पू. भक्तराज महाराज यांना इंदूर येथे जाऊन भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्या वेळी प.पू. गुरुदेवांनी त्यांना ‘‘इंदूरला जाऊ नका’’, असे सांगितले होते; परंतु प.पू. गुरुदेवांनी सांगितलेली ही गोष्ट त्या व्यक्तीला स्वीकारता आली नाही. ती व्यक्ती मुंबईहून इंदूरला जाण्यासाठी निघाली. प्रवासात ती व्यक्ती ज्या बसमध्ये किंवा रेल्वेत बसायची ती प्रत्येक बस आणि प्रत्येक रेल्वे चुकीच्या ठिकाणी जाणारी असायची. जगभर फिरून आलेल्या व्यक्तीला प्रवासाविषयी सर्व ज्ञात असूनही इंदूरला पोचण्यात अडचणीच अडचणी येत होत्या. जेव्हा असे पुनःपुन्हा होऊ लागले, तेव्हा तिच्या असे लक्षात आले की, ‘प.पू. गुरुदेवांनी मला ‘इंदूरला जाऊ नका’, असे सांगितले होते. त्यामुळे तिला कोणतेही योग्य वाहनच मिळत नव्हते.’ शेवटी तिने इंदूरला जाण्याचा प्रयत्न सोडून दिला. यातून ‘मला प.पू. डॉक्टरांचे कुठलेही म्हणणे १०० टक्के ऐकणे किती महत्त्वपूर्ण आहे’, हे लक्षात आले.

६. प.पू. गुरुदेवांची सूक्ष्मातील जाणण्याची अफाट क्षमता

६ अ. प.पू. गुरुदेवांनी प.पू. भक्तराज महाराज यांच्याविषयी बोलतांना म्हटले, ‘‘मला प.पू. बाबांचे अस्तित्व ५०० कि.मी. दूर अंतरावरूनच जाणवते.’’ यावरून माझ्या हे लक्षात आले की, ‘प.पू. गुरुदेवांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता किती आहे ?’, याचे आपण अनुमानही लावू शकत नाही.’

६ आ. एक व्यक्ती सूक्ष्मातील ज्ञानासंदर्भात साधकांशी बोलत असणे, त्या वेळी परात्पर गुरुदेवांनी ‘ती व्यक्ती अनिष्ट शक्तींचा उपयोग करून सांगत असल्याचे आणि अशा व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या अनिष्ट शक्ती तिला त्रास देणार असल्याने अशा व्यक्तीच्या संपर्कात राहू नये’, असे सांगणे : एकदा सेवाकेंद्रात एक व्यक्ती आली होती. तिच्या बोलण्यावरून असे वाटत होते की, तिला सूक्ष्मातील पुष्कळ ज्ञान आहे. तेथे उपस्थित साधकांना ती व्यक्ती सर्व सूक्ष्मातील गोष्टी सांगत होती आणि साधकही त्यामुळे प्रभावित होऊन ऐकत होते. त्या व्यक्तीचे बोलणे ऐकणार्‍या साधकांपैकी एका साधकाच्या लक्षात आले की, ‘प.पू. गुरुदेव त्या व्यक्तीच्या अगदी जवळून पुढे निघून गेले; परंतु ते त्या व्यक्तीशी एक शब्दही बोलले नाहीत.’ वास्तविक प.पू. गुरुदेव असे कुणालाही दुर्लक्षित करत नाहीत. ते सर्वांची नोंद घेतात आणि सेवाकेंद्रात आलेल्या प्रत्येकाचे चांगल्या प्रकारे आदरातिथ्यही करतात. त्यामुळे त्याने प.पू. गुरुदेवांना याविषयी विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘ती व्यक्ती साधकांशी स्वतःच्या सूक्ष्मातील ज्ञानासंदर्भात अनिष्ट शक्तींचा उपयोग करून बोलत आहे. जेव्हा त्या व्यक्तीचा मृत्यू होईल, तेव्हा त्या अनिष्ट शक्ती त्या व्यक्तीला स्वतःच्या नियंत्रणात घेऊन पुष्कळ पिडा देतील. त्यामुळे आपण अशा लोकांजवळ जाऊ नये.’’ यातून त्या साधकाच्या प.पू. डॉक्टरांचा प्रत्येक कृतीमागील कार्यकारणभाव आणि त्यांची सूक्ष्मातून जाणण्याची अफाट क्षमता लक्षात आली.

७. इंदूरमध्ये प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सवासाठीच्या कार्यक्रमात एका वापरलेल्या अल्प गुणवत्तेच्या लाकडाचे २० फूट उंचीचे खंजिरीस्वरूप प्रवेशद्वार करणे आणि कार्यक्रमानंतर ती खंजिरी सोडवतांना खंजिरी तुटून खाली कोसळणे

वर्ष १९९५ मध्ये प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सवासाठी इंदूरमध्ये होणार्‍या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या अंतर्गत खंजिरीच्या आकाराचे प्रवेशद्वार बनवायचे होते. ‘प.पू. भक्तराज महाराज भजन गातांना नेहमी खंजिरी वाजवत होते’, त्याचेच हे निर्देशक होते. या खंजिरीची उंची साधारणतः २० फूट होती आणि ती लाकडाची होती. ही खंजिरी बनवण्यासाठी जे लाकूड खरेदी करण्यात आले होते, ते अत्यल्प किमतीचे होते. ते लाकूड थोड्या हलक्या गुणवत्तेचे असूनही ‘अशा लाकडापासून एवढी मोठी खंजिरी कशी बनवली ?’, ही एक अद्भुत घटना होती. कार्यक्रमानंतर साधक खंजिरी खाली उतरवण्यासाठी जोडणी काढत होते. तेव्हा ती खंजिरी अक्षरशः तुटून खाली कोसळली. केवळ प.पू. गुरुदेवांच्या संकल्प शक्तीमुळे त्या खंजिरीला कार्यक्रम संपेपर्यंत काही झाले नाही. त्या वेळी संस्थेच्या क्षमतेनुसार आपण ‘एकदाच वापरता येईल’, असे लाकूड वापरले होते; परंतु त्यानंतर कुठल्याही आश्रमासाठी एखादी गोष्ट खरेदी करतांना माझ्यावर उत्तम प्रतीची आणि दीर्घ काळ टिकेल, अशी वस्तू खरेदी करण्याचा संस्कार झाला.

८. प.पू. भक्तराज महाराज यांच्याविषयी बोलतांना एकदा प.पू. गुरुदेव म्हणाले होते, ‘‘ते ईश्वर आहेत.’’ त्यांच्या या बोलण्याविषयी आणि एकंदर प.पू. गुरुदेवांना काही काळ अनुभवल्यानंतर एकदा माझ्या मनात अकस्मात् एक विचार आला, ‘प.पू. भक्तराज महाराज पहिले ईश्वर आहेत, तर प.पू. गुरुदेव दुसरे ईश्वर आहेत.’

(समाप्त)

– श्री. सुदीश पुथलत (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ६४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.२.२०२४)

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक