१. बालपणी घरी धार्मिक वातावरण असणे आणि विवाहानंतरही संस्कारांचा ठेवा जपणे :
‘माझी आई श्रीमती कालिंदी गावकर हिचा जन्म गोव्यातील खांडोळा येथील तामसुली गावातील सावईकर घराण्यात झाला. मुळातच धार्मिक असलेल्या या घराण्यात नामसंकीर्तन, ओव्या, श्लोक इत्यादींनी दिवसाचा आरंभ होत असे. संपूर्ण घरच संस्कारमय होते. पुढे लग्न झाल्यानंतर आतापर्यंत आई संस्काराचा हा ठेवा जपत आली आहे. ती आताही कुलाचारांचे काटेकोरपणे पालन करते.
२. समाजसेवा आणि देशप्रेम यांचे बाळकडू मिळणे :
समाजसेवेचे व्रत घेतलेले त्या वेळचे प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य दादा वैद्य हे आईचे आजोबा होते. त्यांच्याविषयीच्या कथा ऐकतच ती मोठी झाली. त्यामुळे समाजसेवेचे महत्त्व नकळत तिच्या मनावर बिंबले. त्या काळी गोव्यात पोर्तुगिजांची राजवट होती. त्यांचे अन्याय असह्य झाल्याने गोव्यात स्वातंत्र्यलढ्याचे वारे वाहू लागले. त्या लढ्यात सहभागी झाल्याच्या आरोपाखाली आईच्या वडिलांना कारावासही भोगावा लागला. घरचे कर्ते पुरुष कारागृहात असल्याने सर्व कुटुंबाने एकजुटीने या संकटाचा सामना केला. पेशाने आधुनिक वैद्य असलेले आईचे वडील बंधू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी असल्याने आणीबाणीच्या काळात त्यांनीही कारावास भोगला. या सर्व गोष्टींमुळे आईच्या मनावर देशप्रेमाचे संस्कार रुजले.
३. काटकसर करून कौटुंबिक दायित्व पार पाडणे :
त्या काळी आर्थिक स्थिती बेताचीच असायची आणि कुटुंबात १० – १२ माणसे एकत्र रहायची. त्यामुळे काटकसरीने संसार करावा लागे. आई-वडिलांनी हौस-मौज करण्यापेक्षा कौटुंबिक दायित्व सांभाळायला अधिक महत्त्व दिले. त्यासाठी बाबांनी बर्याच वेळा सरकारी नोकरीतील पदोन्नती नाकारली आणि आईनेही त्यांना साथ दिली.
४. परेच्छेने वागणे :
लग्नानंतर सासरीही एकत्र कुटुंबपद्धत असल्याने तिने सासू-सासरे, दीर-जाऊ, नणंदा, सर्वांची मुले अशा नानाविध प्रकृतींशी जुळवून घेतले. ती आयुष्यभर परेच्छेने वागली. आमची आजी विद्यमान (हयात) असतांना ‘स्वयंपाकात कोणते पदार्थ बनवायचे ?’, हे आजीच ठरवायची आणि आई शांतपणे आजीच्या इच्छेप्रमाणे जेवण बनवायची. ‘स्वतःसाठी वेगळा पदार्थ हवा किंवा आज अमुकच भाजी करायला हवी’, असे तिने कधीच म्हटले नाही.
५. लेखनकौशल्य :
आईला पूर्वीपासूनच वाचनाची आवड आहे; परंतु व्यस्त दिनक्रमातून तिला वाचनासाठी वेळ मिळत नसे. आई त्या काळी दूरच्या सर्वांशी पत्ररूपाने संवाद साधायची. तिची पत्रे सुंदर आणि वाचनीय असल्याचे नातेवाईक सांगतात.
६. सातत्य आणि चिकाटी :
ती प्रतिदिन पहाटे ५ वाजता उठून कामाला लागते. स्वतःचे वैयक्तिक आवरून झाल्यावर ती नामजप आणि व्यायाम करते. त्यानंतर ‘देवघरातील लादी पुसणे, देवाजवळ दिवा लावणे, घराची स्वच्छता करणे, सर्वांसाठी चहा-अल्पाहार आणि दोन्ही वेळचे जेवण बनवणे’ इत्यादी कामे करते. त्यात एक दिवसही खंड पडला नाही. ‘सायंकाळी सांजवात लावणे आणि ‘शुभं करोती’ म्हणणे ती आताही नेमाने करते. अशा अनेक गोष्टी नेमाने करतांना तिचा तक्रारीचा सूर कधीच नसतो. एखादी गोष्ट करायला घेतली आणि त्यात अडचणी आल्या, तरी आई चिकाटीने ती गोष्ट पूर्ण करते.
७. नम्रता :
आजपर्यंत मी तिला कधी मोठ्या आवाजात बोलल्याचे किंवा कधी कुणाला उलट उत्तर दिल्याचे पाहिले नाही.
८. व्यवस्थितपणा
अ. गेल्या कित्येक वर्षांपासून ती घरातील सर्व वस्तू टापटिपीने ठेवत आहे.
आ. तूप डब्यात ठेवल्यावर ती लेखणीने त्या डब्यावर दिनांक लिहून ठेवते, जेणेकरून ‘कोणते तूप आधी वापरायचे आहे ?’, हे इतरांना समजावे.
९. स्वावलंबन :
आता या वयातही ती ‘स्वतःचे कपडे वाळत घालणे, कपड्यांना इस्त्री करणे आणि त्यांच्या घड्या घालणे’, या गोष्टी स्वतःच करते.
१०. सतत कार्यरत असणे :
ती जीवनातील सर्व कर्तव्ये निष्ठेने पार पाडते; मग ते घरकाम असो, कौटुंबिक समारंभ असो वा धार्मिक कार्यक्रम ! कामचुकारपणा आणि आळस तिच्या शब्दकोशातच नाही. असतो तो निरंतर सेवाभाव ! कधी आम्ही तिला भेटायला गेलो, तर केवळ गप्पाटप्पा करण्यात वेळ वाया न घालवता ती आपली पूर्वनियोजित कामे करण्यास प्राधान्य देते.
११. प्रेमभाव आणि परोपकारी वृत्ती यांमुळे सर्वांना आधार वाटणे :
आपल्या प्रेमळ स्वभावामुळे तिने सासू-सासरे, दीर, नणंदा, या सर्वांना आपलेसे केले. तिने सुनेलाही मुलीप्रमाणे वागवले. नातेवाइकांपैकी कोणी आजारी असल्यास त्यांना भेटायला जातांना किंवा अन्य प्रसंगी ती नाचणीचे सत्त्व, घरगुती तुपाचे लाडू, पेढे इत्यादी सात्त्विक पदार्थ बनवून नेते. जवळपासच्या वाड्यावरील लोकांनी अडी-अडचणीला काही मागितले, तर आई त्या त्या वस्तू तत्परतेने उपलब्ध करून देते. त्यामुळे सर्वांनाच तिचा आधार वाटतो.
१२. सकारात्मकता :
ती कधीच कुणाविषयीही नकारात्मक बोलत नाही. आम्ही चुकून काही बोललो, तर ‘आपण चांगले तेवढे घ्यावे आणि वाईट ते सोडून द्यावे’, असे ती सांगते. तिच्या सहवासात राहिल्याने आमच्यात सकारात्मकता येते.
१३. सहनशीलता :
जीवनात घडलेल्या अनेक प्रसंगांतून तिच्यात पराकोटीची सहनशीलता असल्याचे लक्षात आले. दोन वेळा तिच्या समवेत रुग्णालयात रहाण्याचा प्रसंग आला. तेव्हाही तिचा हा गुण प्रकर्षाने जाणवला. बाबांचे निधन झाल्यावर तिने मोठ्या धैर्याने त्या प्रसंगाला तोंड दिले. या सर्व कठीण प्रसंगांत तिची देवावरील श्रद्धा कधीच डळमळीत झाली नाही.
१४. नमते घेणे :
वादविवादाचा प्रसंग आलाच, तर स्वतःचे म्हणणे खरे करण्याचा आग्रह न धरता घरातील शांती टिकवण्यासाठी ती नेहमीच नमते घेते.
१५. ती दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचते.
तिला दैनिक आणि सनातनचे तिन्ही गुरु (टीप) यांच्याविषयी आदर आहे.
टीप – सनातनचे तीन गुरु : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
१६. तिने आमच्या साधनेला कधीच विरोध केला नाही.
क्वचित्प्रसंगी सेवेला प्राधान्य दिल्यामुळे आम्ही माहेरी एखाद्या कार्यक्रमाला जाऊ शकलो नाही, तर ती आम्हाला समजून घेते.
१७. जाणवलेले पालट
अ. आई आता पूर्वीपेक्षा स्थिर आणि शांत वाटते.
आ. तिचे बोलणे एका लयीत असते.
इ. ‘आता तिची कुणाकडून कसलीही अपेक्षा नाही’, असे जाणवते.
ई. एखाद्या प्रसंगात तिच्या काळजीपोटी आम्ही काही विचारले, तर ‘देव आहे ना !’, असे म्हणत ती आम्हाला आश्वस्त करते.
उ. ‘तिची आध्यात्मिक उन्नती चांगल्या प्रकारे होत आहे’, असे वाटते.
तिच्यात उपजतच असलेले हे गुण आणि कालांतराने तिच्यात झालेले पालट पाहून आम्हाला थक्क व्हायला होते आणि म्हणावेसे वाटते, ‘तेथे कर माझे जुळती ।’
‘ज्या आईने आम्हाला घडवले, सुसंस्कारित केले, जीवनात काही उणे पडू दिले नाही, त्या आईचे उमजलेले काही गुण ईश्वरचरणी अर्पण करता आले’, त्याबद्दल ती. आई आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी वंदन !’
– सौ. ज्योती सुदिन ढवळीकर (वय ६२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), बांदोडा, गोवा आणि सौ. श्रुति नितीन सहकारी (वय ५८ वर्षे), फोंडा, गोवा. (श्रीमती कालिंदी गावकर यांच्या मुली) (८.३.२०२४) ०