५० रुग्णालयांची मालकी हस्तांतरित
पुणे – ‘महाराष्ट्र नर्सिंग होम’ कायद्यातील किचकट गोष्टी, कठोर नियम यांचा त्रास लहान रुग्णालयांना बसत आहे. गेल्या ३ वर्षांमध्ये शहरातील ३५ हून अधिक रुग्णालये बंद करण्यात आली असून ५० रुग्णालयांनी मालकी हस्तांतरित केली आहे. कायद्यातील नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात अडचणी निर्माण होत असल्याचा दावा ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ आणि ‘हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया’ने केला आहे.
‘महाराष्ट्र नर्सिंग होम’ नोंदणी कायदा १९४९ आणि विनियम २०२१ अंतर्गत पुणे महापालिकेकडे ८९९ रुग्णालयांची नोंदणी आहे. यांपैकी ४०० हून अधिक रुग्णालये लहान आणि मध्यम आकाराची आहेत.
संघटनांच्या म्हणण्यानुसार, अग्नीशमन विभागाचे किचकट नियम, २-३ दशके जुन्या रुग्णालयांना पालट करण्याचे आदेश, विविध अनुमती घेणे, जैव-वैद्यकीय कचर्याचे वाढते शुल्क आणि ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’ची संमती आणि अधिकृतता यांसाठी लाखो रुपयांचा दंड आकारला जातो. त्यामुळे रुग्णालयांवर आर्थिक भार पडत आहे.
‘हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया’च्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील म्हणाले, ‘‘लहान रुग्णालये रुग्णांना सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा देतात. त्यामुळे नियम शिथिल होणे आवश्यक आहे. कठोर नियम आणि आर्थिक हानी यांमुळे शहरांमध्ये प्रतिमहिना १ ते २ रुग्णालये बंद होत आहेत.’’ (एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णालये बंद होत असूनही नियमांचा अभ्यास आतापर्यंत का केला गेला नाही ? – संपादक)
संपादकीय भूमिका :नियम जनतेच्या सोयीसाठी कि गैरसोयीसाठी ? असा प्रश्न निर्माण करणारी घटना ! असे नियम कुणी बनवले हे पहाणे आवश्यक ! |