मुंबई – आचारसंहिता लागल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे ब्रिटनकडून भारतात येण्यास विलंब होत आहे, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २ मे या दिवशी येथे एका वृत्तवाहिनीशी बोलतांना दिली.
मंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की,
१. वाघनखे आणण्याविषयी आम्ही ४ मे हा दिनांक निश्चित केला होता. त्या दृष्टीने सर्व पत्रव्यवहार झाला. ४ मे या दिवशी येण्याविषयी लिखित मान्यता देण्यात आली; पण जेव्हा आचारसंहिता लागली, तेव्हा त्यांनी आमच्याशी चर्चा केली. आचारसंहितेमध्ये वाघनखे आणण्यामध्ये आमच्याही अडचणी होत्या. निवडणूक आयोगाकडे काँग्रेस किंवा इतर पक्ष यांनी तक्रारी केल्या असत्या. ‘निवडणुका बघून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मतदारांना भावनिक आव्हान केले जात आहे’, असा आरोप केला गेला असता; पण छत्रपती छत्रपती आहेत.
२. आता १० जून हा दिनांक आम्ही निश्चित केला आहे; पण त्यांनी आम्हाला सांगितले की, ‘१० जून आधी आचारसंहिता संपेल’, असे पत्र तुमच्याकडे पाहिजे. या संदर्भात मी निवडणूक आयुक्तांसमवेत चर्चा केली. त्यांचे पत्र आम्हाला ब्रिटनच्या म्युझियमसाठी पाहिजे.
३. वाघनखे ठेवण्यासाठी जी सुरक्षा पाहिजे, त्या व्यवस्था आम्ही पूर्ण केल्या आहेत. सातारा आणि नागपूर या दोन्ही ठिकाणांची व्यवस्था आम्ही केली. पैसे मान्य करून निविदाही पूर्ण झाली आहे. सुरक्षेसाठी कोणतीही अडचण नाही.