अमरावती येथील ३ उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांसह ९ जणांना अटक !

सूत्रधार जावेद शेख !

बनावट कागदपत्रांद्वारे ट्रकची विक्री करण्याचे प्रकरण !

अमरावती – बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी करून वाहनांची विक्री केल्याप्रकरणी अमरावती येथील उपप्रादेशिक परिवहन विभागातील ३ अधिकार्‍यांना पोलिसांनी अटक केली आहे. नवी मुंबई येथील पोलिसांच्या गुन्हे शाखेने २ मासांच्या सखोल अन्वेषणात हे जाळे उघड करून एकूण ९ जणांना अटक केली आहे. साहाय्यक परिवहन अधिकारी भाग्यश्री पाटील (वय ४३ वर्षे), मोटार निरीक्षक गणेश वरूठे (वय ३५ वर्षे) आणि साहाय्यक मीटर निरीक्षक सिद्धार्थ ठोके (वय ३५ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. ही माहिती साहाय्यक आयुक्त अजयकुमार लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

टोळीचा सूत्रधार जावेद शेख हा वापराच्या बहाण्याने कह्यात घेतलेल्या ट्रकची अमरावती, नागपूर आणि इतर ठिकाणी नोंदणी करून त्यांची विक्री वाहतूक करणार्‍या व्यावसायिकांना करत असे. नोंदणीसाठी आलेल्या वाहनांची प्रत्यक्ष नोंदणी न करता केवळ कागदी घोडे नाचवून चोरीच्या वाहनांची नोंदी उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी केल्या आहेत.

नवी मुंबई गुन्हे शाखेच्या मोटार वाहन विभागाचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या पथकाने ‘ए.पी.एम्.सी.’मधून चोरीचे २ ट्रक पकडले होते. त्यांचे चेसी क्रमांक खोटे असून या ट्रकची बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी झाल्याचे समोर आले होते.

त्यानुसार पोलिसांनी सूत्रधार जावेश शेख आणि त्याचे ५ साथीदार अन् त्यांना साहाय्य करणारे अमरावती येथील ३ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना अटक केली. सूत्रधार जावेद याच्यावर महाराष्ट्रात १०, तर हरियाणात ९ गुन्हे नोंद आहेत. महंमद अस्लम शेख (वय ४९ वर्षे), शिवाजी गिरी (वय ४८ वर्षे), अमित सिंग (वय ३३ वर्षे), शेख रफिक शेख दिलावर मन्सुरी (वय ४० वर्षे)अशी जावेद याच्या सहकार्‍यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ५ कोटी ५० लाख रुपयांचे ट्रक जप्त करण्यात आले आहेत.

संपादकीय भूमिका

उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी चोरीचे कृत्य करणे, हे लज्जास्पद आहे. अशा अधिकार्‍यांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे !