‘इन्स्टाग्राम’वर प्रसारित होणार्या ‘व्हिडिओ’मध्ये एका महाविद्यालयातील शिक्षिका तिच्या वर्गातील विद्यार्थ्यांसमवेत ‘कजरा रे’ या ‘आयटम साँग’ (अश्लील गाण्या) वर नृत्य करतांना दिसत आहे. या वेळी वर्गातील एक विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनीनेही तिच्यासोबत ठेका धरला. शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी गुरुस्थानी असतात. युवा पिढी त्यांचे अनुकरण करते, त्यांना आदरस्थानी मानते अन् त्यांच्याप्रमाणे कृती करायला जाते. खरे पहाता विद्यार्थ्यांमध्ये सद्गुणांची वृद्धी करून त्यांची जोपासना करणे, हा शिक्षकाचा धर्म आहे. हा धर्म विसरून शिक्षकच जर बेताल वागत असतील, तर मुलांनी आदर्श कुणाचा घ्यायचा ? शिक्षक म्हणजे समाजाचा योग्य दिशानिर्देशक. कोणत्याही देशाचे भविष्य घडवण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. शिक्षक पिढी घडवतात, तीच पिढी राष्ट्राचा कारभार चालवते. पर्यायाने राष्ट्राच्या उभारणीचा मुख्य पायाच शिक्षक आहे. सध्या आपल्या राष्ट्राची नवीन पिढी नीतीमत्ताहीन झाली आहे. मुलांचे वर्तन अयोग्य होत आहे. मुले भ्रमणभाष, ‘इंटरनेट’मुळे विकृत कार्यक्रमांच्या आहारी जात आहेत. मुलांमध्ये स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठा राहिलेली नाही. समाजातील एकच घटक, म्हणजे शिक्षक ही सर्व स्थिती पालटू शकतो. असे असतांना शिक्षकच जर असे बेताल वागत असतील, तर ते पुढची पिढी कशी घडवणार ? शिक्षक हा चारित्र्यसंपन्न, शीलवान आणि आदर्शाचे पालन करणारा असावा, अशी रास्त अपेक्षा असते. भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शिक्षणतज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या मते ‘एक खरा शिक्षक तो आहे, जो आपल्या शिष्यांना उद्याच्या आव्हानांसाठी सिद्ध करतो.’
प्रारंभीच्या काळात शाळेत शिकवणार्या शिक्षकांच्या साध्या रहाणीमानाचा आणि उच्च विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर होता. त्यांचे सात्त्विक आचार, विचार विद्यार्थ्यांना अनुकरणीय होते. त्यामुळे शाळेत गेल्यावर आपल्या मुलांवर चांगले संस्कार होतील, याची शाश्वती पालकांना होती. एकेकाळी आर्य चाणक्यासारखे बुद्धीमान अध्यापक याच भारतात कसोशीने आपली भूमिका बजावत होते; पण सद्यःस्थिती बिकट आहे. आज शिक्षण हा उद्योग, तर विद्यापीठ हा राजकारणाचा अड्डा झाला आहे. हिंदु संस्कृतीमध्ये शिक्षकांना अत्यंत मानाचे स्थान आहे. भारतीय संस्कृतीत गुरूंना जी प्रतिष्ठा, मानसन्मान होता, तो अशा शिक्षकांच्या वागण्याने हरवत आहे. याचे भान शिक्षकांनी स्वतःच ठेवत स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. शिक्षकांच्या अशा वागण्याचा मुलांच्या संस्कारक्षम मनावर सखोल दुष्परिणाम होतो. शिक्षकीपेशा हे एक सतीचे वाण आहे. शिक्षकांनी या दृष्टीने याकडे पहायला हवे !
– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.