१. पू. भार्गवराम यांना रामनाथी आश्रमात जाण्याची लागलेली ओढ
सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम यांच्या शाळेला २ दिवसांची सुटी असली, तरीही ते विचारतात, ‘‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जायचे का ?’’ ते प्रत्येक सुटीत रामनाथी आश्रमात जातात.
२. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाण्याविषयी ठरले असतांना
अ. रामनाथी आश्रमात जाण्यासाठी १ मास आधी माहिती पाठवण्याविषयी मी भ्रमणभाषवर एका साधिकेशी बोलत होते. तेव्हा पू. भार्गवराम यांनी माझे बोलणे ऐकले आणि नंतर माझ्याकडून रामनाथी आश्रमात जाण्याविषयी निश्चिती करून घेतली.
आ. नंतर ते साधकांना आनंदाने सांगत होते, ‘‘मी (पू. भार्गवराम) काही दिवसांनी रामनाथी आश्रमात जाणार आहे.’’
इ. पू. भार्गवराम यांनी त्यांना प्रतिदिन लागणारे साहित्य एका ‘बॅगेत’ एक मास आधीच भरून ठेवले होते.
ई. त्यांना प्रतिदिन त्या ‘बॅग’मधील जे साहित्य लागायचे, ते काढून नंतर ते साहित्य पुन्हा ‘बॅगे’तच ठेवत होते.
उ. त्यांनी मला सतत सांगून माझीही ‘बॅग’ भरायला लावली.
ऊ. ते साधकांना ‘आम्ही वैकुंठात जात आहोत. तेथे आम्हाला अनेक साधक आणि संत भेटतील. तेथे पुष्कळ चैतन्य आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तेथे कोण रहाते ?’, असे प्रश्न विचारत होते. ते साधकांना सांगत होते, ‘‘तेथे साक्षात् श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आहेत. देवीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आहेत.’’
ए. प्रतिदिन सकाळी जाग आल्यावर डोळे उघडताच ते विचारत असत, ‘‘रामनाथी आश्रमात जाण्यासाठी किती दिवस शेष आहेत ?’’
३. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी पू. भार्गवराम यांच्याविषयी काढलेले कौतुकोद्गार !
पू. भार्गवराम यांची रामनाथी आश्रमात येण्याची ओढ पाहून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितले, ‘‘पू. भार्गवराम १ मास अखंड अनुसंधानात राहिले. हे शिकण्यासारखे सूत्र आहे. संतांचे असेच अनुसंधान असते.’’
४. पू. भार्गवराम यांचा रामनाथी आश्रमाप्रती भाव
४ अ. रामनाथी आश्रम, म्हणजे देवलोक ! : एकदा एका बालसाधकाने विचारले, ‘‘स्वर्ग कसा असेल ? देवलोक कसा असेल ?’’ तेव्हा पू. भार्गवराम यांनी सांगितले, ‘‘देवलोक, म्हणजे रामनाथी आश्रम आहे. तेथे सर्व देवतांचा वास आहे.’’
४ आ. रामनाथी आश्रम, म्हणजे वैकुंठ आणि ‘या आश्रमात पू. राधा प्रभु राहिल्यास त्यांची प्रकृती लवकर ठीक होईल’, असा पू. भार्गवराम यांचा भाव असणे : त्या वेळी आम्ही थोडेच दिवस रामनाथी आश्रमात थांबणार होतो. हे पू. भार्गवराम यांना समजल्यावर त्यांनी विचारले, ‘‘आपण एवढ्या अल्प दिवसांसाठी का जात आहोत ?’’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘पू. आजींची (सनातनच्या ४४ व्या संत पू. राधा प्रभु यांची) प्रकृती बरी नाही ना ! त्यांना काही त्रास व्हायला नको. यासाठी असा विचार केला आहे.’’
त्या वेळी पू. भार्गवराम त्वरित म्हणाले, ‘‘तुला रामनाथी आश्रमाविषयी ठाऊक नाही का ? रामनाथी आश्रम वैकुंठ आहे. तेथे गुरुदेव रहातात. पू. आजी तेथे राहिल्या, तर लवकर बर्या होतील.’’ (आणि तसेच घडले पू. आजी पूर्णतः बर्या झाल्या.)
४ इ. ‘रामनाथी आश्रमात बसून नामजप करत आहे’, असा भावजागृतीचा प्रयोग करणे : पू. भार्गवराम अनेक वेळा ‘रामनाथी आश्रमात बसून नामजप करत आहे. ते रामनाथी आश्रमात गुरुदेवांच्या समोर बसले आहेत’, असा भावजागृतीचा प्रयोग करतात आणि त्यातून ते पुष्कळ आनंद घेतात. ते सांगतात, ‘‘साधकांनी रामनाथी आश्रमाचे स्मरण केले, तरीही सेवाकेंद्रातही चैतन्य येईल.’’ त्यांचे बोलणे ऐकून इतरांचीही भावजागृती होते.
‘पू. भार्गवराम यांच्यामध्ये असलेला निरागस भाव माझ्यामध्येही यावा’, अशी मी गुरुचरणी प्रार्थना करते.’
– सौ. भवानी प्रभु (पू. भार्गवराम यांच्या आई), मंगळुरू, कर्नाटक. (७.१२.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |