पिंपरी (पुणे) येथे व्याख्यान !
पिंपरी (जिल्हा पुणे) – चंद्र, सूर्य यांचा अभ्यास करून विज्ञान आणि गणित यांची सांगड घालून प्राचीन मंदिरे बांधण्यात आली असून त्यांच्यामुळेच देशाचा इतिहास अन् संस्कृतीचे आकलन होते, असे मत व्याख्याते इंद्रनील बंकापुरे यांनी व्यक्त केले. खजुराहो मंदिर, राणी की बाव, वेरूळ लेणी, ओडिशामधील परशुरामेश्वर मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर अशा अनेक मंदिरांचा इतिहास, तसेच हिंदु धर्मातील १८ पुराणे, १०८ संख्या आणि प्रत्येक ठिकाणच्या शिल्पांचे महत्त्व यासंदर्भातही बंकापुरे यांनी विस्तृत माहिती दिली.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या महिला विभागा’च्या वतीने आयोजित चैत्रगौरी कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘मंदिरांच्या देशा’ या विषयावरील व्याख्यानात बंकापुरे हे बोलत होते. मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथन नायर, शीतल गोखले, प्रदीप पाटील आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
बंकापुरे पुढे म्हणाले की, स्थापत्य आणि पौराणिकत्व यांतून मंदिरे साकारली जातात. मंदिरे बांधण्यात स्थपतींचे (स्थापत्य करणारे) स्थान महत्त्वाचे आहे. ‘स्थपतेः कर्म स्थापत्यम्’ असे म्हटले जाते. शास्त्र, कर्म, प्राज्ञ, शील हे गुण स्थपतींमध्ये असतील; तर ते आपल्या बुद्धीच्या जोरावर अद्भुत मंदिरांची रचना करू शकतात. मंदिरे स्वतःला स्वतःची ओळख करून देतात, तसेच त्यांच्यामध्ये ब्रह्मांडाचे रूप दिसते.