सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार वेगवेगळ्या आश्रमांत राहूनही आनंदाने पूर्णवेळ साधना करणारे गोडसे कुटुंबीय !

‘वर्ष २०१८ पासून मी (श्री. दीपक), माझे आई-वडील (सौ. अनिता रमेश गोडसे (वय ४२ वर्षे) आणि श्री. रमेश गोडसे, (वय ५९ वर्षे)) वर्ष २०२१ पासून देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करत आहोत. माझा भाऊ (श्री. रामदास) रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करत आहे. आम्ही सर्व कुटुंबीय गुरुकृपेने पूर्णवेळ साधना करत आहोत. मला माझ्या कुटुंबियांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सनातन आश्रम देवद,पनवेल

१. श्री. रमेश गोडसे (वडील)

श्री. रमेश गोडसे

१ अ. वर्तमानकाळात रहाणे : बाबा आम्हाला सांगायचे, ‘‘आजच्या पुरते पैसे आणि अन्न आहे ना ! मग उद्याचा विचार करायला नको. तुम्ही सतत वर्तमान स्थितीत रहा.’’ बाबा आवश्यक तेवढेच कपडे विकत घेतात आणि तसे आम्हालाही सांगतात.

१ आ. मुलांवर चांगले संस्कार करणे : आम्ही घरी असतांना बाबांनी आम्हाला शेतातील कामे आणि पोहायला शिकवले. तसेच त्यांनी आम्हाला आमचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी साहाय्य केले. बाबांनी आमच्यासाठी ‘बेकरी’तील पदार्थ कधीच आणले नाहीत किंवा आम्हालाही आणू दिले नाहीत. ते आईला सांगून आम्हाला घरी लाडू आणि भडंग खाऊ घालत असत. आम्ही कधीही अल्पाहार न घेता सकाळी ९ वाजता भाजी-भाकरी खात होतो.

१ इ. चिकाटीने आणि तळमळीने साधना चालू ठेवणे : माझे वडील मागील २४ वर्षांपासून सनातनच्या मार्गदर्शनाखाली सेवा आणि साधना करत आहेत. आरंभी ‘सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना जमेल कि नाही ?’, असे त्यांना वाटायचे; परंतु त्यांनी चिकाटीने आणि तळमळीने साधना चालू ठेवली आहे.

१ ई. दिवसभर काम करून संध्याकाळी सेवा करणे : आमच्या घरची परिस्थिती थोडी हालाखाची होती. बाबा ‘फॅब्रिकेशन’चे (लोखंडी वस्तू बनवण्याचे) काम दिवसभर करायचे आणि सायंकाळी सेवा करायचे. बाबा सनातनचे ग्रंथ वितरण करणे, सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन लावणे, ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वितरण करणे, अशा सेवा करत होते.

१ उ. मुलांना साधना करण्यासाठी साहाय्य करणे : बाबांची एकच इच्छा होती की, ‘मुलांना गुरूंच्या चरणी अर्पण करायचे.’ त्यामुळे मी आणि माझा भाऊ (रामदास) गुरुकृपेने पूर्णवेळ साधना करत आहोत. आम्ही बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यावर पूर्णवेळ साधना करू लागलो. तेव्हा आमच्या घरची आर्थिक स्थिती चांगली नव्हती; पण बाबांनी कशाचाही विचार न करता आम्हा दोघांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी साहाय्य केले.

१ ऊ. आनंदी रहाणे : बाबांना कोणत्याही गोष्टीची चिंता किंवा काळजी नसते. त्यांना कुणाचाही भ्रमणभाष आला, तरी बाबांचे पहिले वाक्य असते, ‘मी आनंदी आहे.’ मीही पूर्णवेळ साधना करू लागल्यावर मध्ये मध्ये बाबांना भ्रमणभाष करायचो. तेव्हा ते मला सांगायचे, ‘‘कशाचाही अधिक विचार करायचा नाही आणि ताण घ्यायचा नाही. नेहमी आनंदी रहायचे.’’

१ ए. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ यांच्याप्रतीचा भाव : बाबांची सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांवर दृढ श्रद्धा असल्याने ते सतत सकारात्मक राहून सेवा करायचे. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ म्हणजे आमचे प्राण’, असा त्यांचा भाव असायचा. एक दिवस जरी दैनिक मिळाले नाही, तरी त्यांना काहीतरी चुकल्यासारखे वाटायचे.

१ ऐ. विविध प्रसारसेवांच्या माध्यमातून केलेली सेवा : दैनिक वितरण करतांना समाजातील व्यक्तींना उत्पादन, ग्रंथ, पंचांग यांचेही मोठ्या प्रमाणात प्रसार करून वितरण करायचे. महाशिवरात्री, गणेश जयंती, अशा विविध सणांच्या वेळी सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचा कक्ष (स्टॉल) लावायचे. त्यातूनही मोठ्या प्रमाणात प्रसार होत असे. कक्षाला भेट देण्यासाठी आलेल्या व्यक्तींना सनातन संस्थेविषयी माहिती सांगून दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार होण्यासाठीही प्रयत्न करायचे.

२. सौ. अनिता रमेश गोडसे (आई)

सौ. अनिता रमेश गोडसे

२ अ. समाधानी वृत्ती : आईला कोणत्याच गोष्टीची आसक्ती नसते. ती जे आहे, त्यात समाधानी असते.

२ आ. स्वीकारार्हता : पूर्णवेळ साधना करतांना आईच्या मनाचा थोडा संघर्ष झाला; पण तिने हळूहळू परिस्थिती स्वीकारली आणि ती आश्रम जीवनाशी एकरूप होत आहे. पूर्णवेळ साधना करू लागल्यापासून तिला आनंद वाटतो.

२ इ. नातेवाइकांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता पूर्णवेळ साधना करून आनंद घेणे : ‘मी आणि माझा भाऊ यांनी शिक्षण घेऊन नोकरी करायला हवी’, असे नातेवाइकांना वाटत होते; परंतु आम्ही दोघेही पूर्णवेळ साधना करण्यासाठी सनातनच्या आश्रमात गेलो. त्यामुळे नातेवाइकांच्या बोलण्यामुळे आईच्या मनाचा थोडा संघर्ष झाला; पण आता कुणी काही बोलले, तरी त्याचे तिला काही वाटत नाही; कारण आता तिने जीवनात पूर्णवेळ साधना करण्यातील आनंद प्रत्यक्ष अनुभवला आहे. ‘गुरुकृपाच श्रेष्ठ आहे’, हे अनुभवल्यामुळे आई आता स्थिर राहून साधनेतील आनंद अनुभवत आहे.’

३. श्री. रामदास रमेश गोडसे (मोठा भाऊ) 

श्री. रामदास रमेश गोडसे
श्री. दीपक गोडसे

३ अ. काटकसरी : मी रामदासदादाला नवीन कपडे विकत घेण्यासाठी विचारल्यावर ‘माझ्याकडे कपडे आहेत’, असे तो मला सांगत असतो. मी नवीन भ्रमणभाष विकत घेतल्यावर माझ्याकडील जुना भ्रमणभाष रामदासला दिला. त्या वेळी त्याने काहीही न बोलता जुना भ्रमणभाष स्वीकारला.

३ आ. गुरुदेवांच्या कृपेने पूर्णवेळ साधना करण्याचा स्वतःहून निर्णय घेणे : आरंभी रामदासदादा १० दिवसांसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेला होता. तो १० दिवसांनंतर लगेच घरी परत येणार होता. ‘तो पूर्णवेळ साधना करील’, असे कुणाला वाटले नव्हते; परंतु त्याने स्वतःहून पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला. केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळे तो पूर्णवेळ साधना करत आहे.

३ इ. मायेपासून अलिप्त : रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना चालू केल्यावर त्याने त्याच्या मित्रांशी संपर्क ठेवला नाही. तो स्वतःहून कुणालाच भ्रमणभाष करत नाही किंवा लघुसंदेश पाठवत नाही. तो आई-बाबांना कधीतरी १० – १५ दिवसांतून एकदा भ्रमणभाष करतो.’

– श्री. दीपक रमेश गोडसे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.३.२०२४)

४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने जीवनातील संकटे दूर झाल्याच्या आणि गुरुकृपेच्या अनुभूती घेता येणे

१. ‘आमच्यावर कितीही संकटे आणि अडचणी आल्या, तरी गुरुदेवांच्या कृपेने त्या दूर होत गेल्या.

२. देवाच्या कृपेने मुले छान आहेत. ‘मुलांनी एखादा खाऊ किंवा वस्तू पाहिजे’, असा कधीही हट्ट केला नाही. माझी दोन्ही मुले गुरुदेवांच्या कृपेने पूर्णवेळ साधना करत आहेत.

३. मी एकदा दुचाकीवरून पडले. कच्चा रस्ता होता, तरीसुद्धा मला दुखापत झाली नाही. मी स्थिर होते.’

– सौ. अनिता रमेश गोडसे (वय ४२ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.३.२०२४)