अहिल्यानगर येथील हरिश्चंद्र गडावरील शिवपिंडीला तडे; पुरातत्व विभागाचे संवर्धनाकडे दुर्लक्ष !

शिवभक्तांमध्ये संताप, पर्यटकांतही अप्रसन्नता !

हिल्यानगरमधील अकोले येथील हरिश्चंद्रगड या धार्मिक स्थळावरील हेमाडपंथी शिवमंदिरातील ५ फुटांच्या शिवपिंडीला तडे गेले.

छत्रपती संभाजीनगर – अहिल्यानगरमधील अकोले येथील हरिश्चंद्रगड या धार्मिक स्थळावरील हेमाडपंथी शिवमंदिरातील ५ फुटांच्या शिवपिंडीला तडे गेल्याचे समोर आले आहे. असे असतांना याकडे पुरातत्व विभागाचे संवर्धनाकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे शिवभक्तांनी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली आहे. (पिंडीला तडे जाऊनही पुरातत्व विभाग मंदिराकडे का दुर्लक्ष करत आहे ? पुरातत्व विभागाचे नेमके काय काम ? – संपादक)

कोकणकडा पहाण्यासमवेतच येथील हेमाडपंती शिवमंदिर पर्यटकांना आकर्षित करते. साधारणत: १० व्या आणि ११ व्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे एक मंदिर आहे. ऐतिहासिक आणि पौराणिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या हरिश्चंद्रगडाचा परिसर पुरातत्व विभागाकडे आहे; मात्र विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे भक्तांचे म्हणणे आहे. ५ फूट रुंद आणि ५ फूट लांबीच्या शिवपिंडीचे जतन अन् संवर्धन व्हावे, अशी मागणी पाचनईचे सरपंच भास्कर बादड अन् ग्रामस्थ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

प्रतिष्ठानकडून मंदिरांमध्ये वज्रलेपन !

‘श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठान’ने स्वखर्चातून जेजुरी येथील रमाई माता, बानुआईचे मंदिर आणि मूर्तींना वज्रलेप, निमगाव धावडीतील स्वयंभू पंचलिंगेश्वर मंदिर, छत्रपती संभाजीनगर येथील खंडोबा मूर्तींना वज्रलेप, सोलापूर येथील शिवलिंग गणपति मंदिर, हनुमान मंदिर, नंदी यांचे, तर नेवासामधील म्हाळसा आईच्या गावातील खंडोबा मंदिरात मूर्ती, येडेश्वरी येरमाळातील सीतामाईची पावले, कर्नाटकातील यादगिरी मैलापूर खंडोबा येथे तुपासिंह खंडोबा, वीरभद्रेश्वर हेगडे प्रधान मंदिरात वज्रलेपन केले आहे.

मूर्ती-मंदिराची विटंबना थांबवावी, वज्रलेपन करू !

‘श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठान’चे अध्यक्ष डॉ. गौरव घोडे म्हणाले की, हरिश्चंद्रगडावरील महादेवाची पिंड जीर्ण झाली आहे. पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. आम्ही निधीतून वज्रलेपन केले. या ठिकाणीही प्रतिष्ठान काम करील. याविषयी पत्रही दिले आहे.