‘कुलिंग चार्जेस’च्या नावाखाली ग्राहकांची लूट !
(कुलिंग चार्जेस म्हणजे शीतपेय किंवा पाणी थंड करण्यासाठी आकारली जाणारी रक्कम)
सातारा, १ मे (वार्ता.) – गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कहर वाढल्यामुळे नागरिकांच्या जिवाची लाही-लाही होत आहे. त्यामुळे शीतपेये पिण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. सातारा शहर आणि परिसरातील विक्रेत्यांनी ही गोष्ट लक्षात घेऊन विविध प्रकारची शीतपेये आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटलीची अधिकच्या दराने विक्री चालू केली आहे. या प्रकारामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे.
घाऊक विक्रेत्यांकडून किरकोळ विक्रेत्याला छापील मूल्याहून अल्प दराने शीतपेयांचा पुरवठा करण्यात येतो. या शीतपेयांना छापील मूल्यात विकले, तरीही किरकोळ विक्रेत्यांना त्यांचा नफा मिळू शकतो; मात्र ‘कुलिंग चार्जेस’च्या नावाखाली हे विक्रेते ग्राहकांकडून अधिक रकमेची लूट करत आहेत. बाजारात मागणी असलेल्या विविध आस्थापनांची शीतपेये छापील मूल्याऐवजी अधिकच्या दराने विकली जात आहेत. अनेक विक्रेत्यांकडून पाण्याच्या एका बाटलीमागे ५ रुपये ‘कुलिंग चार्जेस’च्या नावाखाली उकळले जात आहेत. त्यामुळे अनेक वेळा दुकानदार आणि ग्राहक यांच्यामध्ये वादावादीचे प्रसंग घडतात. शीतपेय विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार शीतपेयांना थंड करण्यासाठी लागणारी साधने, वीजदेयक यांचा विचार करता शीतपेय हे मूळ मूल्यात विकणे परवडत नाही. त्यामुळे अधिकचे मूल्य आकारावे लागत आहे. ग्राहकांची होणारी लूट थांबवण्यासाठी ग्राहक संरक्षण विभागाने, तसेच अन्न आणि औषध प्रशासन विभागाने ग्राहकांची ही लूट करणार्यांवर प्रतिबंध घालावा, अशी मागणी होत आहे.