१. उच्च शिक्षणासाठी १२ लाख भारतीय विद्यार्थी विदेशात स्थायिक !
‘उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्ताने ११ ते १२ लाख भारतीय विद्यार्थी सध्या विदेशात स्थायिक आहेत. त्यात बहुतांशी विद्यार्थ्यांचा ओढा हा अमेरिकेतील विद्यापिठांकडे आहे. अमेरिकेने साधारणत: सव्वा लाख भारतीय विद्यार्थ्यांना ‘व्हिसा’ दिला आहे. ‘अमेरिकेत रहाणे, हे प्रतिष्ठेचे समजले जाते. चांगले शिक्षण मिळते, शिक्षण संपताच त्यांना तेथेच ‘करिअर’ करता येते, चांगली नोकरी मिळते’, अशा सर्व गोष्टींचा विचार करून भारतीय विद्यार्थी विदेशात शिकायला जातात. पालकही त्यांना पदरमोड करून किंवा विविध बँका आणि आर्थिक संस्था यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन मुलांना अमेरिकेत किंवा अन्य देशांमध्ये पाठवतात. सध्या अमेरिकेत जगभरातून जितके विद्यार्थी शिक्षणासाठी गेले, त्यांतील २५ टक्के विद्यार्थी भारतीय आहेत. तेथे भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी साधारणत: ३ लाखांपासून ४ लाख रुपयांपर्यंत वार्षिक शुल्क भरावे लागते. त्यामुळे शुल्क म्हणून भारत ‘९ बिलियन डॉलर’ (७५ सहस्र १०१ कोटी रुपयांहून अधिक) इतका पैसा अमेरिकेला देतो.
२. वर्ष २०२४ मध्ये अमेरिकेत ११ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू
चालू वर्ष २०२४ मध्ये विदेशात अनेक भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटना घडल्या. त्या घटना संशय निर्माण होईल, अशा आहेत. त्यांतील विद्यार्थ्यांचे अनेक दिवस अपहरण करण्यात आले होते. त्यांचा मृतदेह जंगलाच्या बाजूला किंवा अपघात झाला, असे दाखवण्यात आले. गेल्या ४ मासांत अशा ११ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यांत २५ वर्षीय लक्ष्मी थलंका ही बोस्टन विद्यापिठात शिकणारी मुलगी होती. तिचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर १६.१.२०२४ या दिवशी पश्चिम जॉर्जिया विद्यापिठातील विवेक सैनी या विद्यार्थ्यावर जुलियन फॉल्कनर या विद्यार्थ्याने आक्रमण केले. त्यात सैनी याचा मृत्यू झाला. २८.१.२०२४ या दिवशी नील आचार्य हा २२ वर्षीय मुलगा मृतावस्थेत आढळला. त्यानंतर दोनच दिवसांनी अंकुल दिवाण नावाचा विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. श्रेयस रेड्डी हा १९ वर्षीय विद्यार्थी त्यानंतर १० दिवसांतच मृत्यूमुखी पडला. ४.२.२०२४ या दिवशी सईद मजहर अली याचा मृत्यू झाला. त्याच्या दुसर्या दिवशी समीर कामत हा मृत्यूमुखी पडला.
३. भारतीय मुलांच्या हत्यांमागे हिंदु आणि भारतीय द्वेष
‘फाऊंडेशन फॉर इंडिया अँड इंडिया डिग्सपोरा स्टडीज’ या संघटनेच्या पदाधिकार्यांनी सांगितले, ‘भारतीय मुलांच्या हत्यांमागे हिंदु आणि भारतीय द्वेष ही प्रमुख कारणे आहेत, हे अमेरिकेतील अन्वेषण यंत्रणा स्वीकारण्यास सिद्ध नाहीत.’ ‘हिंदु अमेरिकन फाऊंडेशन’चे सुहाग शुक्ला यांनी सांगितले, ‘भारतीय विद्यार्थ्यांना निवडून निवडून त्यांच्यावर आक्रमणे केली जात आहेत किंवा त्यांचे संशयास्पद मृत्यू होत आहेत. क्वचित् प्रसंगी त्यांना अमली पदार्थ देऊनही मारले जाते.’ अमेरिकेतील श्री. तेजल शहा यांनी सांगितले, ‘‘अमेरिकेत हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे वाढलेली आहेत. अमेरिकेत रहाणार्या भारतीय विद्यार्थ्यांना व्यसनाधीन करणे, हाही एक षड्यंत्राचा भाग आहे. अमेरिकी अन्वेषण यंत्रणा हे सर्व नाकारतात. उमा सत्यसाई गुड्डे, महंमद अली अराफत आणि इतर विद्यार्थी यांचे या ३ मासांतील मृत्यू संशयास्पद अन् लक्षणीय आहेत.’’ भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी सांगितले की, यावर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत, म्हणजे सव्वा ३ मासांत ११ विद्यार्थ्यांचे संशयास्पद मृत्यू झाले. याच काळात कॅनडात चिराग नावाच्या विद्यार्थ्यावर आक्रमण झाले. त्यात त्याचा मृत्यू झाला.
४. विदेशातील भारतीय विद्यार्थ्यांवरील आक्रमणे थांबवण्यासाठी देशातील विद्यापिठांचा स्तर उंचावणे आवश्यक !
एकंदर हा विषय विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्यासाठी चिंताजनक आहे. भारतीय हिंदूंना अलीकडे १ किंवा क्वचित् प्रसंगी २ मुले असतात. अशी ही प्राणप्रिय मुले विदेशात शिक्षणासाठी ऐपत नसतांनाही पाठवली जातात. त्यामुळे त्यांचा अंत अशा पद्धतीने व्हावा, हे गंभीर आहे. अर्थात् भारत सरकारने हा विषय त्यांच्या स्तरावर हाताळला आहेच, यात शंका नाही; मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर भारतीय विद्यार्थ्यांच्या हत्या होणे, हे गंभीर आहे. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी बाहेरच्या देशांमध्ये उच्च शिक्षणासाठी जातात. त्यात त्यांचा मोठ्या प्रमाणात पैसा व्यय होतो. हे टाळण्यासाठी भारतीय विद्यापिठे, महाविद्यालये आणि शाळा यांचा शैक्षणिक स्तर उंचावणे आवश्यक आहे. ‘मेक इन इंडिया’ हा एक महत्त्वाचा विषय आहे. त्या अंतर्गत या गोष्टींकडेही सरकारने लक्ष द्यावे, असे सर्वसामान्यांना वाटते.
पूर्वी भारत देश अनेक शतके विश्वगुरु होता. देशात नालंदा, तक्षशिला, काशी अशी अनेक जगप्रसिद्ध विद्यापिठे होती. तेथे विदेशातील मुले शिक्षणासाठी येत असत. यासमवेतच येथील गुरुकुलपद्धतही अतिशय लोकप्रिय होती. त्यामुळे आताच्या आणि आता निवडणुकांच्या नंतर येणार्या केंद्र सरकारने भारतीय महाविद्यालये आणि विद्यापिठे यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सर्वसामान्यांना वाटते. त्यामुळे भारतातील विद्यार्थी देशातच शिक्षण घेतील, देशाचा पैसा देशातच राहील आणि त्यांच्यावर आक्रमणे होऊन जीवितहानी होण्याचा प्रश्न उपस्थित होणार नाही.’
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (२६.४.२०२४)
वर्ष २०१९ ते २०२१ या काळात भारतात ३५ सहस्र ५०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या !
‘भारतातही उच्च शिक्षण घेण्यासाठी राजस्थानातील कोटासह अन्य शहरांमध्ये विद्यार्थी निवासी रहात असतात. तेथे त्यांची दिनचर्या महाविद्यालय आणि अभ्यास एके अभ्यास एवढीच असते. त्यांना कोवळ्या वयात कुटुंबियांपासून वेगळे रहावे लागते. एक मोठे ध्येय त्यांनी उराशी बाळगलेले असते, तसेच त्यांच्या पालकांनाही त्यांचा मुलगा मोठा अभियंता किंवा आधुनिक वैद्य (डॉक्टर) व्हावा, असे वाटत असते. अशा परिस्थितीत अभ्यासाचा ताण सहन करता न आल्याने अनेक विद्यार्थ्यांनी अलीकडच्या काळात आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. ‘वर्ष २०१९ ते २०२१ या ३ वर्षांच्या कालावधीत ३५ सहस्र ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत’, याविषयीची माहिती केंद्रीय मंत्री नारायण स्वामी यांनी फेब्रुवारी मासात लोकसभेत दिली.
‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागा’च्या अहवालानुसार साधारणत: वर्ष २०१९ मध्ये १० सहस्र विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. वर्ष २०२० मध्ये हे प्रमाण १२ सहस्रांहून अधिक झाले आणि वर्ष २०२१ मध्ये १३ सहस्र विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. केवळ आत्महत्या हाच विषय नाही, तर वसतीगृहाला आग लागण्यासारख्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे शिक्षणासाठी दाही दिशा भटकणार्या विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण होणे, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे केंद्रीय आणि राज्य पातळीवर सरकारने लक्ष घालून ही समस्या सोडवणे आवश्यक आहे.’
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी