Loksabha Eledctions 2024 : गोवा – टपालाद्वारे करण्यात येणार्‍या मतदानाच्या पहिल्या दिवशी ८५ वर्षांवरील १ सहस्र ५८४ मतदारांनी हक्क बजावला !

७६४ विकलांग मतदारांनीही केले मतदान

पणजी : घरबसल्या टपालाद्वारे करण्यात येणार्‍या (‘पोस्टल बॅलट’) मतदानाच्या २९ एप्रिल या पहिल्याच दिवशी ८५ वर्षांवरील १ सहस्र ५८४, तर विकलांग ७६४ मतदार यांचा समावेश आहे. टपालाद्वारे करण्यात येणारी मतदान प्रक्रिया ३ मेपर्यंत चालणार आहे. विशेष सेवेसाठी नेमण्यात आलेल्या ८ सहस्र ९४३ मतदारांपैकी २ सहस्र २४१ मतदार ३ ते ५ मे या कालावधीत त्यांना नेमून दिलेल्या केंद्रांमधून टपालाद्वारे मतदान करणार आहेत.

शांतीनगर, वास्को येथील १०१ वर्षांच्या बागाव्वा कोलकर या महिलेने ३० मे या दिवशी वास्को येथे मतदानाचा हक्क बजावला.

गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी ७ मे या दिवशी मतदान होत असले, तरी ८५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांच्यासाठी घरबसल्या मतदानाची विशेष व्यवस्था निवडणूक आयोगाने केली आहे. आयोगाने नेमलेले पथक मतदारांच्या घरी त्यांनी दिलेल्या पत्त्यावर भेट देतात आणि मतदानपत्रिकेवर संबंधित मतदाराच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण करून घेतात. २९ एप्रिल या दिवशी सकाळपासून ही प्रक्रिया चालू झाली. अधिकृत माहितीनुसार ८५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे एकूण ११ सहस्र ५०२ मतदार (उत्तर गोव्यात ६ सहस्र २८६, तर दक्षिण गोव्यात ५ सहस्र २१६ मतदार) राज्यात आहेत, तर एकूण ९ सहस्र ४२३ मतदार विकलांग आहेत. त्यापैकी उत्तर गोव्यात ४ सहस्र ९७७, तर दक्षिण गोव्यात ४ सहस्र ४४६ विकलांग मतदार आहेत.