पुणे येथील इंद्रायणी नदीपात्रात जलपर्णीची बेसुमार वाढ झाल्याने जलचरांचे अस्तित्व धोक्यात !

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकार्‍यांचे दुर्लक्ष !

इंद्रायणी नदीपात्र

पुणे – इंद्रायणी नदीपात्रात वाढत्या जलप्रदूषणामुळे जलपर्णीची बेसुमार वाढ झाली असून जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नदीवरील नागरी पाणी योजनांवरही याचे परिणाम दिसू लागले आहेत. इंद्रायणी काठच्या बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांकडे जलप्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अथवा जलपर्णी काढणारी यंत्रणा अद्यापही नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने, इंद्रायणीच्या पाण्याची अशुद्धता प्रमाणाबाहेर गेली आहे. त्यामुळे आता इंद्रायणी नदीच्या पाणलोट क्षेत्रातील औद्योगिक आस्थापनांचा सामाजिक उत्तरदायित्व (सी.एस्.आर्.) निधी जलप्रदूषण आणि जलपर्णी रोखण्यासाठी वापरणे सक्तीचे करावे, अशी पर्यावरणप्रेमींची मागणी आहे. प्रशासनाला इंद्रायणीचे जलप्रदूषण रोखण्यासाठी काही करता येत नाही, ही शोकांतिका आहे.

सांडपाणी विनाप्रक्रिया इंद्रायणीत !

यशवंतनगरमधील सांडपाणी वाहिनी याच उपसा प्रकल्पाच्या अगोदर इंद्रायणीच्या नदीपात्रात जाऊन मिळते. अगदी काही मीटरच्या अंतरावर नगर परिषदेच्या पंपहाऊसमधून उचललेले हे पाणी पुन्हा यशवंतनगरसह इतर उपनगरांमधील नागरिकांकडे जाते. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम प्रलंबित आहे. नगर परिषदेच्या कातवी उपसा प्रकल्पातील पंपाच्या ठिकाणी जलपर्णी अडकल्याने बिघाड होऊन अनेकदा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. नगर परिषदेचे हे जलप्रदूषणपूरक धोरण पाणीपुरवठा विभागासह नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरते आहे. गटारीचे पाणी विनाप्रक्रिया नागरिक वर्षानुवर्षे नाईलाजाने वापरत आहेत. तळेगाव नगर परिषदेने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करून, जलप्रदूषण रोखावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

यावर तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे बांधकाम विभागाचे अभियंता मल्लिकार्जुन बनसोडे यांनी सांगितले की, यशवंतनगरमधील २.४५ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर असून सध्या त्याचे काम चालू आहे. प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी आणखी तीन-चार महिने लागण्याची शक्यता आहे.

संपादकीय भूमिका 

तीर्थस्वरूप नदीची दु:स्थिती पालटण्यासाठी प्रशासनाने या प्रकरणी लक्ष घालून प्रदूषण करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, ही जनतेची अपेक्षा आहे.