इस्रायल आणि हमास यांच्यात चालू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पॅलेस्टाईनचे समर्थन करण्याचे प्रकार अमेरिकेत वाढीस लागले आहेत. पॅलेस्टाईनला निर्दाेष दाखवण्याचे कथानक रचले गेले आहे. अमेरिकेने गेल्या एका महिन्यात विविध विद्यापिठांत आंदोलन करणार्या ९०० हून अधिक अमेरिकी विद्यार्थ्यांना अटक केली आहे. यामध्ये भारतीय वंशाची विद्यार्थिनी अचिंत्य शिवलिंगम् सहभागी झाल्याने तिलाही अटक करण्यात आली होती. गेल्या काही महिन्यांमध्ये इस्रायलने पॅलेस्टाईनचे कंबरडे मोडून काढल्याने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ या विद्यार्थ्यांनी आवाज उठवला आहे. आजपर्यंत अमेरिकेने जगाच्या विविध भागांवर तिची टाच रहावी; म्हणून जिथे तिला सोयीचे आहे, तिथे युद्ध आणि नरसंहार यांच्या आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. स्टारबक्स आणि मॅकडोनाल्ड यांसारख्या अमेरिकी आस्थापनांनी इस्रायलला पैसा पुरवण्याची माहिती पुढे येताच तिथे नियमितपणे जाणार्या विद्यार्थ्यांनी या आस्थापनांवर बहिष्कार घातला आहे. ‘आम्ही सरकार निवडून दिले, तरी या सरकारमधील नेते एका विशिष्ट समुदायाविषयी द्वेष पसरवत असतील, तर आम्ही गप्प बसणार नाही’, असे सांगणारे फलक विद्यार्थ्यांनी आंदोलन करतांना हाती घेतले होते. ‘आमची विद्यापिठे खासगी आस्थापनांप्रमाणे गुंतवणूक करतात. या गुंतवणुकींमधून गाझामध्ये नृशंस हिंसा करण्यासाठी इस्रायलला पैसा मिळतो. आमच्या शुल्काचे पैसे हे तुमच्या युद्धाचे भांडवल नाही. तुमच्या गुंतवणुकींची माहिती सार्वजनिक करा आणि इस्रायलकडे जाणारा पैसा तातडीने थांबवा’, अशी या पॅलेस्टाईन समर्थक विद्यार्थ्यांची फुकाची मागणी आहे.
अमेरिकेसमोरील आव्हान !
आतापर्यंत हमास-इस्रायल युद्धात अमेरिकेने इस्रायलची बाजू उचलून धरली आहे. त्यामुळे इस्रायलने पॅलेस्टाईनविषयी केलेल्या कारवाईला अमेरिकेचा पाठिंबाच आहे. तसे अमेरिकेने वेळोवेळी घोषित केले आहे. हमासच्या आतंकवाद्यांनी पॅलेस्टाईन लोकांच्या साहाय्याने इस्रायलमधील १ सहस्र ३०० लोकांचा नरसंहार केला. यामध्ये सर्वांना हालहाल करून मारले. त्यानंतर इस्रायलने पॅलेस्टाईनला हुसकावून लावत हमासच्या आतंकवाद्यांचा बीमोड केला. या युद्धात गाझा पट्टीतील ३५ सहस्र नागरिक मारले गेले. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील पॅलेस्टाईनप्रेमी चवताळले आहेत. इतरांना नेहमी शहाणपणाचे समुपदेश देणारी अमेरिका पॅलेस्टाईन समर्थक विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे हादरली आहे. खरेतर इस्रायलला नष्ट करण्याची स्वप्ने पहाणार्या पॅलेस्टाईन समर्थकांना अमेरिकेने त्याच्या देशातून वेळीच हाकलून लावले असते, तर आज अमेरिकेवर ही वेळ आली नसती. तथापि ‘करावे तसे भरावे’, याप्रमाणे अमेरिकेला तिच्या कर्माची फळे आता भोगावी लागत आहेत. इस्रायलची बाजू घेणारी अमेरिका पॅलेस्टाईन समर्थकांवर कशी कारवाई करते ? हे पहाणे महत्त्वाचे आहे. जर्मनी, जपान, इंग्लड, फ्रान्स असे अनेक देश दुसर्या युद्धात होरपळून गेले होते. त्यामुळे दुसर्या महायुद्धानंतर अमेरिका जगातील मोठा श्रीमंत देश बनला. आजपर्यंत इतिहास पाहिला असता अमेरिकेने स्वतःच्या स्वार्थासाठी आणि इतर देशांचे मानसिक खच्चीकरण करून दोन्ही देशांमध्ये द्वंव्दयुद्ध कसे छेडेल, यासाठी प्रयत्न केले आहेत. अमेरिकेत विद्यार्थ्यांची आंदोलने उग्र रूप धारण करत असतांना अमेरिकेच्या नेतृत्वाचा खर्या अर्थाने कस लागणार आहे.
उपदेशाचे डोस देणारी अमेरिका !
अमेरिकेने मानवाधिकारांच्या संदर्भात प्रसारित केलेला ८० पानी अहवाल भारताने नुकताच फेटाळला आहे. या अहवालात मणीपूरमधील हिंसाचाराचा उल्लेख करून तेथे मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे म्हटले आहे. ‘मणीपूरमधील मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये जातीय हिंसाचार पसरल्यानंतर तेथे मानवी हक्कांचे उल्लंघन झाले आहे’, असे अहवालात म्हटले आहे. अमेरिकेचे भारतविरोधी अहवाल रद्दित विकण्यासारखे असतात. अमेरिकेचे भारताच्या संदर्भात दुटप्पी धोरण असल्याचे गेल्या काही वर्षांत दिसून येत आहे. त्यामुळे अमेरिका भारताचा कधीही खरा मित्र होऊ शकत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.
अमेरिकामधील ओहायो राज्यात फ्रँक टायसन नावाच्या एका कृष्णवर्णीय व्यक्तीची अमेरिकेच्या पोलिसांनी हत्या केल्याचे १८ एप्रिल या दिवशी समोर आले आहे. पोलिसांच्या ‘बॉडीकॅम’वरून (शरिरावर लावण्यात आलेल्या कॅमेर्यावरून) चित्रित झालेला व्हिडिओ समोर आला आहे. टायसनच्या हत्येनंतर पोलिसांवर जोरदार टीका होत आहे. या घटनेमुळे वर्ष २०२० मध्ये पोलिसांनी मारलेल्या कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईडच्या घटनेचा उल्लेख केला जात आहे. त्याची मानही पोलिसांनी भररस्त्यात अशाच प्रकारे गुडघ्याने दाबून धरली होती. त्यामुळे त्याचाही श्वास गुदमरून मृत्यू झाला होता. अमेरिकेला जगभरातील मानवाधिकारांची चिंता असते. ‘जगभरातील मानवाधिकारांचे जतन केवळ स्वतःमुळेच होऊ शकते’, अशा भ्रमात ती वावरते. याच अमेरिकेत कृष्णवर्णियांच्या मानवाधिकारांच्या चिंधड्या उडत असतांना अमेरिका गप्प बसते. त्यामुळे अमेरिकेने मानवाधिकारावर बोलणे, हाच मुळात विनोद आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅलेस्टाईनप्रेमी विद्यार्थ्यांचे आंदोलन चिघळू नये, यासाठी अमेरिकेतील विविध राज्यांमध्ये या विद्यार्थ्यांना पोलिसांनी चोपले. पॅलेस्टाईनप्रेमी विद्यार्थ्यांविषयी कुणाला कळवळा असण्याचे कारण नाही; कारण या विद्यार्थ्यांचे आंदोलन हे आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना विद्यापिठाच्या परिसरातून हुसकावून लावले, हे योग्यच केले; मात्र भारतात ज्या वेळी एखादे राष्ट्रघातक आंदोलन चिरडण्यासाठी यंत्रणा कामाला लागते, त्या वेळी अमेरिकेचे पित्त का खवळते ? थोडक्यात ‘माझ्या देशात मी राष्ट्रविघातक आंदोलन बळाने चिरडले, तर ते राष्ट्रहित आणि अन्य देशांनी तसे केले, तर ते मानवाधिकारांचे हनन’, हे कसे ? अमेरिकेच्या उक्ती आणि कृती यांमध्ये किती भेद आहे, हे लक्षात येते. अमेरिकेने तेथील खलिस्तानी आतंकवाद्यांना ज्या प्रकारे चुचकारून भारताला हिणवण्याचा प्रयत्न केला, ते भारत विसरला नाही.
अमेरिकेने स्वतःच्या स्वार्थासाठी जे पाप केले आहे, ते तिला आता भोगावे लागत आहे. यातून ती शहाणी झाली, तर ठीक अन्यथा तिला आरसा दाखवण्यासाठी भारताने सर्वच स्तरांवर प्रयत्न करणे आवश्यक !
अमेरिकेत मानवाधिकारांचे हनन होत असतांना निष्क्रीय रहाणार्या अमेरिकेने अन्य देशांतील मानवाधिकारांविषयी बोलणे, हा विनोद ! |