मुंबई – मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे आम्हाला किंवा कुठल्याही सरकारला देशाचे हित साध्य करायचे असेल, तर महाराष्ट्राला आणखी बळकट करून पुढे जावे लागेल, असे विधान पंदप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘लोकमत नेटवर्क १८’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले.
या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘‘बंगाल उद्ध्वस्त होत आहे. एकेकाळी देशाच्या अर्थव्यवस्थेचे मुख्य केंद्र असलेले कोलकाता शहराचाही र्हास होत आहे. बिहार आणि उत्तरप्रदेश ही राज्ये तेथील घाणेरड्या राजकारणामुळे, अस्थिरतेमुळे रसातळाला गेली होती. आम्हाला महाराष्ट्राला तशा स्थितीत जाऊ द्यायचे नव्हते. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकूनही आम्ही मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला आहे. सत्ता मिळाल्यावर आम्ही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करू शकलो असतो; परंतु आम्ही तसे केले नाही. आम्हाला मुख्यमंत्रीपदापेक्षा राज्याचे भले अधिक महत्त्वाचे आहे. ‘आम्ही महाराष्ट्रासाठी जगतो’, हा संदेश आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोचवायचा होता.’’