दत्तक प्रक्रिया पूर्ण झाल्याने मी कायदेशीर वारसदार ! – छत्रपती शाहू महाराज

छत्रपती शाहू महाराज

कोल्हापूर – हिंदु कायद्यानुसार दत्तक प्रक्रिया पूर्ण झाल्याने मी राजर्षी शाहू महाराज यांचा कायदेशीर वारसदार आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या रक्ताचा वारस म्हणून छत्रपती शहाजी महाराज यांनी मला दत्तक घेतले. त्यामुळे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा मी कायदेशीर वारसदार आहे. तत्कालीन महाराष्ट्र सरकारच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने याला मान्यता दिली आहे. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि केंद्रीय गृहमंत्री लालबहाद्दूर शास्त्री यांनी वर्ष १९५६ च्या हिंदु कायद्यानुसार याला मान्यता देत शिक्कामोर्तब केले, असे पत्रक छत्रपती शाहू महाराज यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

या पत्रकात पुढे म्हटले आहे की, मी राजर्षी शाहूंच्या रक्ताचा, कायद्यानुसार, तसेच विचारांचा वारस आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या कन्या राधाबाईसाहेब तथा आक्कासाहेब महाराज यांचे चिरंजीव विक्रमसिंह पवार अर्थात् छत्रपती शहाजी महाराज यांच्या कन्या शालिनीराजे यांचा मी पुत्र आहे. म्हणजे मी राजर्षी शाहू महाराज यांचा खापरपणतू असल्याने थेट रक्ताचा वारसदार आहे.