‘ऑनलाईन’ साधना सत्संग चालू झाल्यानंतर सत्संग उपक्रमाचे दायित्व असलेले श्री. चैतन्य तागडे (वय ३७ वर्षे) आणि सौ. अर्पिता पाठक (वय ३५ वर्षे) यांच्याशी माझा सेवेच्या निमित्ताने संपर्क आला. नेतृत्व आदर्श असल्यास सेवेची फलनिष्पत्ती वाढते; म्हणूनच त्यांच्या व्यक्तीमत्त्वातील आदर्श दायित्वाच्या दृष्टीने जे अनेक पैलू लक्षात आले, त्यांपैकी काही कृतज्ञताभावाने मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
१. श्री. चैतन्य तागडे यांचे आदर्श पैलू
१ अ. ‘अभ्यासवर्गात जिज्ञासूंचे प्रश्न कसे हाताळायचे ?’, याचे समाधानकारक दिशादर्शन होणे : ‘श्री. चैतन्यदादा जेव्हा सत्संगात एखाद्या सूत्राविषयी सांगतात, तेव्हा त्यांच्या ‘भावमय वाणीतून बाहेर पडणारे शब्द ऐकत रहावेत’, असे वाटते. ‘सत्संग सेवा करतांना भावाच्या स्तरावर कसे रहायचे ?’, हे मला त्यांच्याकडून शिकता येते. ‘त्यांच्या ओघवत्या वाणीतून येणारे मार्गदर्शन ते करत नसून गुरुतत्त्व करत आहे’, याची प्रचीती येते. ‘अभ्यासवर्गात जिज्ञासूंचे प्रश्न कसे हाताळायचे ?’, याचे समाधानकारक दिशादर्शन होते.
१ आ. साधकांना सेवेसाठी प्रोत्साहन देणे : सत्संग सेवेतील सर्वच साधकांकडे एकापेक्षा अनेक दायित्वे आहेत. जेव्हा ‘सेवांची व्याप्ती वाढणार आहे’, असे लक्षात येते, तेव्हा दादा साधकांचा उत्साह वाढवण्यासाठी नवीन सेवांप्रतीचा दृष्टीकोन कसा असायला हवा ? अतिरिक्त सेवांचा कुणाला ताण नाही ना ? आपण करूया ना ?’, असे विचारून सर्वांना चिंतन करायला उद्युक्त करतात आणि मग काही दिवसांनी नवीन सेवा कोणत्या करायच्या आहेत, ते सांगतात. त्यामुळे ‘साधकांना ताण न येता सेवांची गती वाढून नवीन सेवेचे दायित्व घेण्याच्या दृष्टीने चिंतन करायला पुरेसा वेळ मिळतो आणि ‘हे आपण करू शकतो’, असा आत्मविश्वास वाटतो. सेवेतील साधकांच्या प्रगतीसाठी सद्गुरुकृपेचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येक नियोजन विचारून करतात.
१ इ. संहितालेखन सेवेविषयी साधकांचे कौतुक करून त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवणे : चैतन्यदादांनी संहितालेखन करणार्या साधकांना वेळोवेळी प्रोत्साहन देऊन सेवेतील आत्मविश्वास वाढवला आहे. ते प्रत्येक वेळी ‘गुरुकृपेने संहिता छान झाली आहे’, असे म्हणतात. त्या वेळी सेवेतील उत्साह वाढायचा. ही सेवा आमच्यासाठी नवीन होती. काही संहितांचे विषय असे असायचे की, त्यासाठी पुरेशी माहिती उपलब्ध नसायची. आजवरच्या साधनेतून जे शिकलो, त्याचा आधार घेऊन लिहिणे असायचे. त्या वेळी थोडा ताण असायचा. ‘मला समजलेले एखादे सूत्र असेच आहे ना ?’, हे एकदा पडताळून घेऊया मगच संहितेत घेऊया’, असा विचार असायचा. त्या वेळी ते सूत्र चैतन्यदादांना तपासायला पाठवून एकदा निश्चिती झाल्यावर मगच संहितेत घेतले जायचे. दादासुद्धा तितक्याच तळमळीने त्यात लक्ष घालत असत. त्यामुळे संहिता चांगल्या होणे हा संहितालेखन साधकांमधील संघभावाचा परिणाम आहे.
१ ई. साधकांना दायित्व साधकाप्रती प्रेम आणि विश्वास निर्माण होणे आवश्यक असते. ते कौशल्य चैतन्यदादांमध्ये आहे.
२. सौ. अर्पिता पाठक यांचे आदर्श पैलू
२ अ. अल्प अहं असणे : अर्पिताताईचा ‘सेवेच्या अनुषंगाने कोणत्या अडचणी येऊ शकतात’, याचा पुष्कळ चांगला अभ्यास आहे. त्यामुळे एखादी अडचण सांगताक्षणीच त्यांना त्याचे पूर्ण आकलन होऊन त्या अडचणीवर उपाय सांगतात. ‘एका मर्यादेच्या पलीकडे मला तांत्रिक कौशल्य तितकेसे नसतांना मी कोणतीही अडचण सांगितली आणि ताईकडून ती तत्परतेने सोडवायची राहिली’, असे कधी होत नाही. तिच्याकडे अनेक नवीन येणार्या जिज्ञासूंचे संपर्क नियोजन असल्याने सत्संग उपक्रमाच्या अंतर्गत अनेक सेवा असूनही त्या सेवा ती तितक्याच क्षमतेने पूर्ण करते. ‘तिच्याशी जोडलेल्या साधकांना सेवेचा ताण येणार नाही’, याकडे ती लक्ष देते. तिच्या एवढ्या व्यस्ततेतही ती कधी कधी एखाद्या साधना संवाद सत्संगाचे दायित्व घेते.
२ आ. पुढाकार घेऊन सेवा करणे : सत्संग उपक्रमांतर्गत नियोजन करतांना कोणत्याही समस्येचे तिला लगेच आकलन होते. ताई अष्टपैलू आहे. काही सेवा तिच्या सेवेअंतर्गत येत नसतांनाही ते करण्याचे कौशल्य तिच्याकडे आहे . ते करण्यासाठी ती आवश्यकतेनुसार पुढाकारही घेते, उदा. सत्संग घेणे, संहिता लेखन.’
२ इ. सामायिक सूत्रे
२ इ १. सहजता, समजूतदारपणा आणि प्रेम : सौ. अर्पिता पाठक आणि श्री. चैतन्य तागडे यांच्या बोलण्यात सहजता, समजूतदारपणा आणि प्रेम जाणवते. ते दोघेही दायित्व साधकाचे वेगळेपण न जपता ‘गुरुसेवक’ या भावामध्ये असल्याचे जाणवते.
२ इ २. सेवेतील चुकांचा ताण न येणे : एखादी चूक तांत्रिक किंवा विषयाच्या अनुषंगाने असो, ती या दोन्ही दायित्व साधकांना सांगतांना कधीच ताण येत नाही, तर ‘चूक सांगून कधी एकदा मोकळे होतो’, असे वाटते आणि ‘पुढे तशी चूक न होण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करूया’, असा विचार प्रबळ असतो.
२ इ ३. ‘सकारात्मक राहून गुरुसेवेतील आनंद कसा घ्यायचा ?’, हे शिकायला मिळणे : श्री. चैतन्यदादा आणि सौ. अर्पिताताई या दोघांची त्यांच्या व्यावहारिक क्षेत्रातही पुष्कळ व्यस्तता आहे. अर्पिताताईला नोकरी, घर, लहान मुलगी आणि सेवा या सर्व स्तरांवर दायित्व सांभाळावे लागते, तर चैतन्यदादांच्या व्यवसायाची व्याप्ती प्रचंड आहे. ‘सेवेच्या अनुषंगाने बर्याचदा त्यांना भ्रमणभाष केल्यावर ते प्रवासात आहेत’, असेच लक्षात येते, तरीही ‘सर्व अडचणींवर मात करून सकारात्मक राहून गुरुसेवेतील आनंद कसा घ्यायचा ?’, हे त्यांच्याकडून शिकायला मिळते.
२ इ ४. सेवेची तळमळ : श्री. चैतन्यदादा आणि सौ. अर्पिताताई यांचा गुरूंना अपेक्षित अशी सेवा करण्यासाठी ध्यास असतो. त्यानुसार ते सेवेची घडी बसवण्यासाठी, सेवेची गती टिकून रहात आहे ना ? प्रत्येकाच्या सेवेची फलनिष्पत्ती किती आहे ?’, याचाही आढावा घेतात. ‘साधकाच्या सेवेच्या कौशल्यानुसार त्याची फलनिष्पत्ती वाढावी’, यासाठी दिशादर्शन करतात. संहितेसाठी कोणताही नवीन विषय निवडतांना सर्वांचे मत घेतले जाते. ‘कोणती सूत्रे असावीत ?’, याचे चिंतन सर्वांकडून एकत्रितरित्या केले जाते.
२ इ ५. अनौपचारिक बोलणे : चैतन्यदादा आणि अर्पिताताई सेवेसंदर्भात बोलतांना त्यांचा अनौपचारिक बोलण्याकडेही कल असतो. त्यांची सेवा आणि साधना या अडचणींसंदर्भातही ते कधी कधी ओघाने बोलतात. त्यामुळे आमच्या बोलण्यात अनौपचारिकता वाढली आणि तोच आमच्यातील संघभावाचा पाया बनला आहे.
३. दायित्व साधक सांगतील तसे करत गेल्याने त्यांच्यातील गुरुतत्त्वाची प्रचीती घेता येणे
अनेकदा एकामागून एक सेवा आल्या, तरी गुरुतत्त्वाकडून ही सेवा आली आहे, तर तेच ती पूर्ण करणार आहेत. आपण सेवेत मन आणि बुद्धी यांचा अडथळा येऊ द्यायचा नाही. ‘दायित्व साधक सांगतील, तसे करत जायचे’, असा विचार सदोदित ठेवल्यामुळे मला अनेकदा गुरुतत्त्वाची प्रचीती घेता आली. त्यांनी एखाद्या विषयावर चिंतन करायला सांगितले की, आपोआप सूत्रे सुचायला आरंभ होत असे आणि तो विषय गुरूंना अपेक्षित असा होत असे.
‘गुरुकृपेने अशा गुणी दायित्व साधकांच्या समवेत सेवा शिकण्याची संधी लाभली’, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते आणि ‘आम्हाला त्यांच्याप्रमाणे घडता येऊन गुरुसेवेत झोकून देता यावे’, यासाठी गुरुचरणी प्रार्थना करते.’
– सौ. ज्योत्स्ना रविकांत नारकर, जिल्हा सिंधुदुर्ग (२५.१.२०२४