Plea To Ban Modi Rejected:पंतप्रधान मोदी यांच्यावर ६ वर्षे निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळली

धर्माच्या आधारे मते मागितल्याचा केला होता आरोप !

नवी देहली – देहली उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ६ वर्षांसाठी निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप याचिकाकर्ते अधिवक्ता आनंद जोंधळे यांनी केला होता. याचिका फेटाळतांना न्यायालयाने ‘अनेक कारणांमुळे याचिका पूर्णपणे चुकीची आहे’, असे म्हटले.

१. न्यायालयाने म्हटले की, निवडणूक आयोगाला कोणत्याही तक्रारीवर विशेष विचार करण्याचे निर्देश देणे आमच्यासाठी योग्य नाही. जोंधळे यांच्या तक्रारीवर निवडणूक आयोग कायद्यानुसार कारवाई करेल. आम्ही ही याचिका फेटाळतो.

२. जोंधळे यांनी याचिकेत म्हटले होते की, पंतप्रधानांनी ९ एप्रिलला उत्तरप्रदेशाच्या  पिलीभीत येथे केलेल्या भाषणात हिंदूंच्या देवता, शीख देवता आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांच्या नावाने मते मागितली होती. मोदी यांनी ‘राममंदिर बांधले, करतारपूर साहिब कॉरिडॉर (सुसज्ज मार्ग) विकसित झाला. गुरुद्वारांमध्ये लंगरमध्ये (भंडार्‍यामध्ये) वापरल्या जाणार्‍या वस्तूंवरील वस्तू आणि सेवा कर काढून टाकला आहे, तसेच अफगाणिस्तानातून गुरु ग्रंथसाहिबच्या प्रती परत आणल्या, असे म्हटले होते. आचारसंहितेनुसार कोणताही पक्ष किंवा उमेदवार २ जाती किंवा समाज यांत तेढ निर्माण करणारी कोणतीही कृती करू शकत नाही.