नागपूर येथे ४६ टक्के लोकांनी मतदानाचे कर्तव्य न बजावल्याने जागृत मतदारांनी निषेधाचे फलक झळकवले

निषेधाचे फलक

नागपूर – लोकसभा निवडणुकीत नागपूर येथे केवळ ५४ टक्के मतदान झाले आहे. म्हणजेच ४६ टक्के नागपूरकरांनी स्वत:चे मतदानाचे कर्तव्य बजावले नाही. ‘ज्यांनी मतदान केंद्रापर्यंत जाण्याची तसदीही घेतली नाही, तसेच आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यात कसूर केला’, अशांच्या निषेधाचे फलक शहरात लागले आहेत. नागपूरच्या ट्राफिक पार्क चौक येथे लावलेल्या या फलकावर ‘शेम ऑन यू’ (तुमची लाज वाटते), असा उल्लेख करण्यात आला आहे. सध्या हे फलक सार्‍यांचे लक्ष वेधत असून चर्चेचे विषय ठरले आहेत.

नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण २२ लाख २३ सहस्र २८१ मतदारांपैकी १२ लाख ७ सहस्र ३४४ मतदारांनी मतदान केले. १० लाख १५ सहस्र ९३७ मतदारांनी मतदान केले नाही.