प्रतिज्ञापत्रांमध्ये गुन्ह्यांची नोंद नाही म्हणून आक्षेप
पुणे – शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रतिज्ञापत्रावर आक्षेप घेण्यात आला. डॉ. कोल्हे यांनी उमेदवारी अर्जासमवेत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये नोंद केलेल्या गुन्ह्यांची माहिती नोंदवलेली नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्याची मागणी ‘वंचित बहुजन आघाडी’ने केली होती; परंतु निवडणूक निर्णय अधिकार्यांनी तक्रार निकाली काढत त्यांचा अर्ज वैध ठरवला.
शिरूर लोकसभा मतदारसंघातून ४६ उमेदवारांनी अर्ज प्रविष्ट केले होते. त्यापैकी ११ अपक्ष उमेदवारांचे अर्ज तांत्रिक कारणास्तव अवैध ठरले. त्या मतदारसंघातून ३५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. पुणे लोकसभा मतदारसंघातून ४२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. केवळ मोनिका मुरलीधर मोहोळ यांचा एक अर्ज पक्षाचा ‘एबी’ अर्ज न जोडल्याने बाद करण्यात आला.
डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, ‘‘गुन्ह्यांची कोणतीही कल्पना नव्हती. पोलिसांकडून नोटीसही दिली नव्हती. चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देतांना पुणे पोलिसांनी गुन्ह्यांची माहिती दिली नाही. वर्ष २०१६ मध्ये पुणे येथे होणार्या असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेला विरोध केला म्हणून गुन्हा नोंद झाला होता.’’