चैत्र पौर्णिमेला शिवछत्रपतींना रायगडावर ‘दीपवंदने’द्वारे मानवंदना !

छत्रपती शिवाजी महाराजांची ३४४ वी पुण्यतिथी !

छत्रपती शिवाजी महाराज

पुणे – ‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ’ आणि ‘स्थानिक उत्सव समिती, महाड’ यांच्या वतीने ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज’ यांची ३४४ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. चैत्र पौर्णिमेच्या प्रसंगी ‘लोहगड विसापूर विकास मंचा’च्या वतीने ‘शिवसमाधी स्थान आणि जगदीश्वर मंदिर प्रांगणा’त दीपवंदनेद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.

जगदीश्वर मंदिरामध्ये हरि जागर आणि राजदरबारामध्ये इतिहास, अभ्यासकांच्या मुलाखती, सैन्यदलातील अधिकार्‍यांच्या मुलाखती, शाहिरांचे कार्यक्रम झाले. २३  एप्रिल या दिवशी हनुमान जयंतीनिमित्त कीर्तन आणि राजदरबारामध्ये ‘श्री शिवप्रतिमा पूजन’ करण्यात आले. या वेळी सैन्यदलातील अधिकारी आणि सरदार घराणे यांचा सन्मान करण्यात आला. ‘श्री शिवपुण्यस्मृती रायगड’ पुरस्कार ज्येष्ठ पुरातत्ववेत्ते आणि मूर्तीशास्त्र अभ्यासक डॉ. गो.बं. देगलूरकर यांना घोषित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जगद्गुरु संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज मोरे (देहूकर) उपस्थित होते.

राजदरबारातील कार्यक्रमानंतर श्री शिवप्रतिमा पालखी मिरवणूक पार पडली. शिवसमाधी स्थानावर श्री शिवछत्रपतींना सर्व शिवभक्त आणि रायगड जिल्हा पोलीस प्रशासनाकडून मानवंदना देण्यात आली. शिवसमाधी आणि जगदीश्वर मंदिरामध्ये ‘दीपवंदना’ ‘लोहगड विसापूर विकास मंचा’चे संस्थापक श्री. सचिन टेकवडे आणि अध्यक्ष श्री. विश्वास दौंडकर यांनी पार पाडली. ‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळा’चे कार्यवाह श्री. सुधीर थोरात, सरकार्यवाह श्री. पांडुरंग बलकवडे, अध्यक्ष श्री. रघुजीराजे आंग्रे, ‘स्थानिक उत्सव समिती, महाड’चे कार्यवाह श्री. संतोष कदम, अध्यक्ष श्री. त्रिंबक पुरोहित यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.