रत्नागिरीत महायुतीचे उमेदवार मंत्री नारायण राणे यांनी घेतली विविध संघटना, व्यावसायिक, उद्योजक यांची भेट

रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासासह महत्त्वाच्या विषयांवर केल्या चर्चा

नारायण राणे

रत्नागिरी – रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मंत्री नारायण राणे यांची रत्नागिरीतील विविध संघटना, जैन समाज, व्यापारी संघटना, व्यावसायिक, उद्योजक, प्रतिष्ठित नागरिक यांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली. यामध्ये ‘रत्नागिरीचा सर्वांगीण विकास आणि त्यामध्ये केंद्रशासनाचे असणारे योगदान’ या विषयावर चर्चा करण्यात आली.

या भेटींमध्ये औद्योगिक क्षेत्रातील गद्रे मरीनचे दीपक गद्रे, जागृत मोटर्सच्या रेश्मा जोशी, प्रसिद्ध अधिवक्ता प्रदीप नेने यांच्यासमवेत चर्चा करण्यात आली. या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते अधिवक्ता बाबासाहेब परुळेकर, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, अधिवक्ता दीपक पटवर्धन आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील आंबा बागायातदार संघटनेसोबतही ना. राणे यांची बैठक पार पडली. या वेळी हवामानात होणारे पालट, बागायतदार व्यावसायिक यांच्यासमोरील आव्हाने, अडचणी आणि आंबा निर्यात क्षेत्रातील नवीन संधी, केंद्रशासनाचे याविषयीचे धोरण या संदर्भात उपस्थितांशी चर्चा झाली. या वेळी प्रसन्न पेठे, प्रदीप सावंत आणि अन्य व्यापारीवर्ग उपस्थित होता.

रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी समाजाच्या प्रमुख पदाधिकारी, जैन समाज आणि रत्नागिरी व्यापारी संघटना यांच्याशीही मंत्री नारायण राणे यांनी भेट घेतली. या वेळी माजी आमदार बाळ माने, जैन समाजाचे अध्यक्ष भरत ओसवाल, रत्नागिरी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गणेश भिंगार्डे, जैन बंधू, नीलेश शहा आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.