साधना करतांना मनुष्याने मायेचा प्रभाव स्वतःवर होऊ न देता आत्मस्वरूपाकडे जाणे आवश्यक !

‘आरसा ही आपल्या दैनंदिन जीवनातील वापरात असणारी एक वस्तू आहे. तो आपण प्रतिदिन किमान एक वेळ तरी पहातो. आरशात पाहिल्यावर आपल्या मनात आनंदाची भावना निर्माण होते.

श्री शंकराचार्यांनी म्हटल्याप्रमाणे ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या ।’ म्हणजे ‘ब्रह्म हेच एकमेव सत्य असून अन्य सर्व मिथ्या आहे’, याचा भावार्थ जीवनात कसा लागू पडतो ?’, हे आपण आरशाच्या उदाहरणावरून समजून घेऊया.

१. आरशात पडलेल्या प्रतिबिंबामुळे आरशाच्या स्थितीवर कोणताही परिणाम न होणे

श्री. प्रकाश करंदीकर

आपल्याला आरशासमोरच्या प्रत्येक वस्तूचे प्रतिबिंब आरशात दिसत असते, उदा. जर ते प्रतिबिंब अग्नीचे असेल, तर अग्नीच्या प्रतिबिंबामुळे आरसा जळत नाही. प्रतिबिंब पाण्याचे असेल, तर त्यामुळे आरसा ओला होत नाही आणि फिरणार्‍या पंख्याचे प्रतिबिंब आरशात दिसत असेल, तर गतीने फिरणार्‍या पंख्याच्या प्रतिबिंबामुळे आरसा काही फिरत नाही. तो प्रत्येक स्थितीत स्थिरच असतो.

२. आपण डोळ्यांनी आजूबाजूचे जग पहात असतांना प्रत्यक्षात जगाचे केवळ प्रतिबिंबच पहात असतो !

आपण डोळ्यांनी एखाद्या व्यक्तीला पहातो, तेव्हा आपण त्या व्यक्तीचे आपल्या डोळ्यांच्या पडद्यावर उमटणारे प्रतिबिंबच पहात असतो. समजा, एखादी व्यक्ती काळोखात बसली असेल, तर तिचे प्रतिबिंब आपल्या डोळ्यांना न दिसल्याने ती व्यक्ती आपल्याला दिसू शकत नाही. ती व्यक्ती उजेडात बसली असेल, तरच ती आपल्या डोळ्यांना दिसू शकते. याचा अर्थ असा की, डोळ्यांतील बुबुळांमुळे डोळ्यांच्या पडद्यांवर जे प्रतिबिंब उमटते, तेच आपल्याला दिसत असते. वास्तविक पहाता प्रत्यक्षात कोणतीही वस्तू किंवा व्यक्ती यांचे दर्शन आपल्याला होत नसते, तर आपण त्या वस्तू किंवा व्यक्ती यांचे प्रतिबिंबच पहात असतो. अंध व्यक्तीसाठी रूप, रंग आणि आकार हे काहीच नसते; कारण तिला दृष्टीच नसते. थोडक्यात आपण आपल्या आजूबाजूच्या जगाचे केवळ प्रतिबिंबच पहात असतो.

३. आरशाप्रमाणे कशापासूनही प्रभावित न होता तटस्थ राहून स्वतःच्या मूळ स्वरूपाकडे जाणे, ही मनुष्याची साधना असणे

यावरून आपल्या लक्षात येईल की, कोणतेही प्रतिबिंब आरशाला प्रभावित करू शकत नाही. आरशाप्रमाणेच ‘कुणापासूनही प्रभावित न होणे’, हे मनुष्याचे खरे स्वरूप आहे. ‘प्रत्येक वस्तू किंवा व्यक्ती यांपासून प्रभावित होणे’, हा मानवाचा स्वभाव आहे. साधना करत असतांना आपल्याला आपला स्वभाव नष्ट करून स्वतःच्या मूळ स्वरूपाकडे जायचे असते. यासाठी आरशाप्रमाणे कशापासूनही प्रभावित न होता म्हणजेच आपण जे पहातो किंवा ऐकतो, त्याकडे तटस्थ दृष्टीने पाहून त्याचा आपल्यावर प्रभाव होऊ न देणे, ही आपली साधना आहे.

४. प्रतिबिंबाचे स्वरूप

४ अ. आरशात दिसणारे प्रतिबिंब म्हणजे ‘प्रवेशरहित प्रवेश’ असणे : एखाद्या वस्तूचे प्रतिबिंब आरशात पडत असतांना प्रत्यक्षात ती वस्तू आरशात प्रवेश करत नाही. आरशातील प्रतिबिंब हे इंग्लिशमध्ये असलेल्या एका म्हणीप्रमाणे आहे. ‘Image in the mirror is an entry without an entrance.’ (अर्थ : आरशातील प्रतिबिंब हे ‘प्रवेशरहित प्रवेश’ असल्याप्रमाणे आहे.); म्हणजेच आरशात दिसणारे प्रतिबिंब हे आरशामध्ये प्रवेश न करता दिसणारे प्रतिबिंब आहे.

४ आ. विश्वातील विषयांचे आपल्यावर पडणारे प्रतिबिंब हे आपल्यामध्ये प्रवेश न करता पडत असूनही ते आपण सत्य समजत असणे : आपण विश्वातील कोणत्याही वस्तूला प्रत्यक्षात न पहाता तिच्याकडून येणारे तिचे प्रतिबिंब पहात असतो. त्या वेळी विश्वातील हे विषय आपल्यात प्रवेश करत नसतात, तर त्या विषयांच प्रतिबिंब आपल्यात प्रवेश करत असते आणि यालाच आपण ‘सत्य’ मानत असतो. पुढील उदाहरणावरून हे लक्षात येईल. एक पक्षी आरशासमोर उभा असतो. त्याला वाटते, ‘माझ्यासारखा दुसरा कुणीतरी माझ्यासमोर उभा आहे’; म्हणून तो त्याच्याच प्रतिबिंबाला घालवण्यासाठी आरशावर चोच मारत रहातो; परंतु त्यामुळे प्रतिबिंबातील पक्षी उडून जात नाही. प्रतिबिंबातील पक्षीही त्या पक्षाला चोच मारत असल्यासारखे दिसते. असे काही वेळ चालू रहाते. तो पक्षी काही वेळाने हतबल होतो आणि ‘काय केले, तर प्रतिबिंबातील हा पक्षी नाहीसा होईल ?’, याचे चिंतन करू लागतो.

५. प्रतिबिंबात अडकणे, म्हणजेच मायेत अडकणे

आपल्या मनात जगाचे प्रतिबिंब पडलेले असते. आपण आरशातील प्रतिबिंब जाण्यासाठी आरसा कपड्याने पुसला, पाण्याने धुतला, तरीही प्रतिबिंब तसेच रहाते, तसेच आपल्या मनात जगाचे पडलेले प्रतिबिंब जाण्यासाठी आपण जप करतो (साधना करतो), तरीही ते प्रतिबिंब तसेच रहाते. हळूहळू जिवाला कळते की, आपण जरी जप, तप, साधना करत असलो, तरी आपण जगाच्या प्रतिबिंबात म्हणजे ‘मायेत’ अडकत आहोत.

६. मायेचा प्रभाव स्वत:वर होऊ न देता तिच्यातील ब्रह्म पहात आत्मस्वरूपाकडे जाण्याची जाणीव साधकात सतत असणे आवश्यक

आपल्यावर मायेचा सतत प्रभाव होत राहिल्यामुळे आपल्याला आपले मूळ स्वरूप लक्षात येत नाही. यासाठी आपण मायेच्या प्रभावाने प्रभावित न होता तिच्याकडे दुर्लक्ष करून तिच्यातील ब्रह्माचा शोध घ्यायला शिकले पाहिजे. जग कसेही असो, त्याचा मी करत असलेल्या साधनेवर परिणाम होऊ न देता ‘मला आत्मस्वरूपाकडे जायचे आहे’, याची जाणीव सतत असायला हवी.

७. स्थितप्रज्ञ रहाता येण्यासाठी साधना करणे आणि साधना होण्यासाठी गुरुकृपा होणे आवश्यक !

‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या ।’ म्हणजे ‘ब्रह्म हेच एकमेव सत्य असून अन्य सर्व मिथ्या आहे’, असे आद्य शंकराचार्यांनी म्हटले आहे. हे शिकण्यासाठी हिमालयात जाऊन साधना करण्याची आवश्यकता नाही. तर आपण जिथे रहातो, ज्या लोकांमध्ये वावरतो, त्यांच्या संदर्भात आजूबाजूला घडणारे प्रसंग किंवा घटना यांचा आपल्यावर परिणाम होऊ न देता स्थितप्रज्ञ व्हायचे, म्हणजे सर्वांत असूनही नसल्याची जाणीव ठेवायची. भगवान श्रीकृष्ण सर्वांमध्ये मिळून-मिसळून रहात असूनही कुणामुळे प्रभावित न होता स्थितप्रज्ञ असायचे. त्यामुळेच ते योग्य वेळी योग्य कृती करायचे. आपल्यालाही हेच शिकायचे आहे. हे शिकण्यासाठी साधनाच करावी लागते आिण साधना होण्यासाठी गुरुकृपा आवश्यक असते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच मला हे लिहिता आले, यासाठी कृतज्ञता !’

– श्री. प्रकाश वसंत करंदीकर (वय ६७ वर्षे), फोंडा, गोवा. (४.८.२०२२)