RSS Shatabdi 2025 : रा.स्व. संघ शताब्दी वर्ष साजरे करणार नाही ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

नागपूर – ज्या काही थोड्या गोष्टी केल्या आहेत, त्याविषयी संघ गाजावाजा करणार नाही. काही गोष्टी साध्य करण्यासाठी रा.स्व. संघाला १०० वर्षे लागली, हे पुष्कळ चिंताजनक आहे. या मंद गतीने पालट होण्याचे कारण २ सहस्र वर्षांपासून त्याला सामाजिक अधःपतनाच्या विरोधात द्यावा लागलेला लढा, हे आहे. वर्ष २०२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत.

या पार्श्‍वभूमीवर प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत याविषयी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात येथे बोलत होते. रा.स्व. संघ शताब्दी वर्ष साजरे करणार नाही, असेही ते या वेळी म्हणाले.

सौजन्य : yogras

समाजाच्या विजयाचे आकलन धनातून नव्हे, तर धर्मातून झाले पाहिजे !

वर्ष १९२५ मध्ये रा.स्व. संघाची स्थापना झाली. तेव्हा अतिशय कठीण स्थितीतून जावे लागले. कोणत्याही स्थितीत स्वयंसेवकांना त्यांचे काम करत राहिले पाहिजे. संघ अहंकार वाढवण्यासाठी हे करत नाही. १०० वर्षे पूर्ण झाली म्हणून उत्सव करण्यासाठी आणि काही उपक्रमांचा गाजावाजा करायला संघ आला नाही. संघ समाजात पालट करू इच्छितो आणि मानतो की, समाजाच्या विजयाचे आकलन धन मिळवण्याने नाही, तर धर्मातून झाले पाहिजे. हा आपल्या समाजाचा विजय अन्य समाजाला सशक्त बनवेल आणि अंतिमतः विश्‍वाला त्याचा लाभ हाईल. संघ अशा लोकांना सिद्ध करू इच्छितो, जे समाजात अशा प्रकारे सुधारणा (पालट) करतील.

आपण हिंदु आहोत, हे गर्वाने सांगितले पाहिजे !

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

ते पुढे म्हणाले की, परकियांच्या शिकवणीमुळे ‘आपण कोण आहोत ?’, हे विसरण्याची वाईट सवय आपल्याला लागली आहे. आपल्यावर अनेक वर्षे अनेक शासनकर्त्यानी राज्य केले. मागील दीड सहस्र वर्षांपासून आपण परकियांना सफलतापूर्वक तोंड दिले; पण आपण चुका आणि फितुरी यांमुळे परत परत आपल्याला गुलामीच्या चक्रात फसलो. या आजारातून बाहेर पडायला हवे, नाहीतर परत तेच होत राहील. गुलामीच्या परिणामामुळे स्पष्टपणे बोलणे आणि विचार करणे यात आपण न्यून पडतो. समाजाला एकसंध करणारी सूत्रे समाजात पेरायला हवीत. आपली ओळख पटवून घेऊन ती जगालाही सांगितली पाहिजे. ती ओळख म्हणजे हिंदु ही आहे. आपण हिंदु आहोत, हे आपण गर्वाने सांगितले पाहिजे. आक्रमणकर्त्यांना ठोस संदेश देण्यासाठी आपल्याला आपल्या मूलभूत चुकांवर उपाय करायला लागेल आणि हेच रा.स्व. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी केले होते.