कोल्हापूर – येथे जोतिबा देवाची सर्वांत मोठी चैत्र पौर्णिमेची यात्रा भरते. यासाठी गेल्या ४ दिवसांपासून बैलगाडी, खासगी वाहने, बस गाड्यांमधून लाखो भाविक त्यांच्या गावाच्या मानाच्या सासनकाठ्या घेऊन डोंगरावर आले होते.‘जोतिबाच्या नावानं चांगभलं चा गजर’, गगनचुंबी सासनकाठ्यांचा थाट, काठीचा तोल सांभाळत हलगीच्या कडकडाटावर रंगणारे तालबद्ध नृत्य, गुलाल खोबर्याची उधळण, मिरवणूक, पालखी सोहळा आणि लाखो भाविकांच्या अलोट गर्दीत वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री जोतिबाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. रणरणत्या उन्हाळ्यात आग ओकणार्या सूर्यालाही भक्तीपुढे हरवत भाविकांनी यात्रेचा आनंद द्विगुणीत केला !
सौजन्य Maharashtra Times
२३ एप्रिलला पहाटे श्रींचा अभिषेक झाल्यानंतर दरबारी पोशाखात सालंकृत पूजा बांधण्यात आली. दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते निनाम पाडळी येथील मानाच्या प्रथम क्रमांकाच्या सासनकाठीचे पूजन झाले. या वेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, आमदार सतेज पाटील, देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, बाळूमामा देवस्थानचे प्रशासक शिवराज नाईकवाडे आदी उपस्थित होते. निनाम पाडळीनंतर विहे गावाच्या दुसर्या क्रमांकाच्या काठीचे पूजन शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले.
यानंतर सासनकाठ्यांची मिरवणूक चालू झाली. दुपारी ४ वाजता तोफेच्या सलामीने श्री जोतिबा देवाच्या पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. शाही लव्याजम्यासह पालखी यमाईदेवीच्या मंदिराकडे आली. येथे यमाईदेवी आणि जमदग्नी ऋषींचा विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर रात्री ८ वाजता श्रींची पालखी पुन्हा मंदिराकडे परतली. रात्री १० नंतर पालखी सोहळा पूर्ण झाला.