हनुमान जयंतीच्या निमित्ताने सोलापूर, धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यांत १०५ ठिकाणी गदापूजन !

सहस्रो भक्तांनी घेतली रामराज्य स्थापनेची शपथ !

पू. (कु.) दीपाली मतकर यांच्या हस्ते दहिटणे (सोलापूर) येथे गदापूजन करण्यात आले.

सोलापूर – रामराज्य स्थापनेच्या कार्याला बळ मिळावे, तसेच हिंदूंमध्ये शौर्य जागृत व्हावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने श्री हनुमान जयंतीनिमित्त सोलापूर, धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यांत १०५ ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ करण्यात आले. या कार्यक्रमांना विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी यांच्यासह ३ सहस्रांहून अधिक हनुमानभक्त सहभागी झाले होते.

पू. (कु.) दीपाली मतकर यांच्या हस्ते दहिटणे (सोलापूर) येथे गदापूजन !

श्री संकटमोचन हनुमान मंदिर, कण्णीनगर, दहिटणे येथे सनातनच्या संत पू. (कु.) दीपाली मतकर यांच्या शुभहस्ते गदापूजन करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद रसाळ, श्री. प्रशांत वालीकर हेही उपस्थित होते.

सोलापूर येथील हनुमान मंदिरात नामजप करतांना उपस्थित धर्मप्रेमी

शंखनाद आणि सामूहिक प्रार्थनेने कार्यक्रमाला आरंभ करण्यात आला. ‘गदापूजन’ विधी, श्री हनुमानाची आरती, मारुतिस्तोत्र, श्री हनुमान चालीसा म्हणण्यात आली, तसेच ‘श्री हनुमते नम: ।’ हा सामूहिक नामजप करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’ घेण्यात आली. या कार्यक्रमांना विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, महिला आणि युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

विजापूर रोड (सोलापूर) येथील हनुमान मंदिरात प्रतिज्ञा करतांना उपस्थित धर्मप्रेमी

सांगोला (जिल्हा सोलापूर) येथे मेडशिंगी रोड येथील गुरुमूर्ती कोळेकर महाराज मठ, नवनाथ कावळे यांच्या शेतात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘गदापूजन’ करण्यात आले. या वेळी सर्वश्री नवनाथ कावळे, दुर्गेश कावळे, विकास गावडे, श्रेयश कावळे, गणपत पटेल, भारत पैलवान, प्रसाद पैलवान, संतोष पाटणे, शिवराज कावळे, पांडुरंग कावळे आदी उपस्थित होते.

सांगोला येथील गुरुमूर्ती कोळेकर महाराज मठ येथे गदापूजनाच्या प्रसंगी उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

१. निमगाव (जिल्हा सोलापूर) येथे २०० हून अधिक धर्मप्रेमी सहभागी झाले होते.

२. या उपाक्रमात युवती आणि महिला यांचा लक्षणीय सहभाग होता.

३. बालसंस्कारवर्गातील अनेक बालकही या उपक्रमांत सहभागी झाले होते.

४. अनेक ठिकाणी उपक्रमाला उपस्थित धर्मप्रेमींनी धर्मशिक्षणवर्ग आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग यांची मागणी केली.