धर्मराजा आणि सनातन संस्थेच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) मधुरा भोसले यांच्या विचारप्रक्रियेतील साम्य !

पू. गुरुनाथ दाभोळकर

‘६.३.२०२४ या दिवशी दैनिक सनातन प्रभात’ मध्ये ‘संस्कृत सुभाषित’ अंतर्गत ‘आचारधर्म सर्वश्रेष्ठ !’ या मथळ्याखाली एक चौकट प्रसिद्ध झाली होती. त्यात एक श्लोक लिहिला होता, तो असा..

आगमानां हि सर्वेषाम्
आचारः श्रेष्ठ उच्यते ।
आचारप्रभवो धर्मः धर्मात् आयुः विवर्धते ।।

अर्थ : सर्व शास्त्रांत आचार श्रेष्ठ सांगितला आहे. धर्म आचारातून निर्माण होतो. धर्माचरणाने आयुष्य वाढते.

सुश्री (कु.) मधुरा भोसले

कौरव-पांडव लहानपणी द्रोणाचार्यांच्या आश्रमात शिकायला गेले. पहिल्या दिवशी द्रोणाचार्यांनी पाठ दिला, ‘सत्यं वद ।’ म्हणजे ‘खरे बोलावे’ आणि सांगितले, ‘उद्या हे पाठ करून या.’ दुसर्‍या दिवशी सर्वांनी पाठ म्हणून दाखवले. कौरवांचे तर लगेचच पाठ झाले होते. एकटा धर्मराजा म्हणाला, ‘गुरुदेव, ‘सत्यं वद ।’ हे जोपर्यंत माझ्या आचरणात येत नाही, तोपर्यंत ते पाठ झाले, असे म्हणणे व्यर्थ नाही का ?’ धर्माची तत्त्वे आचरणात असावी लागतात.’

हे लिखाण वाचल्यावर मला सनातन संस्थेच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका कु. मधुरा भिकाजी भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४० वर्षे) यांच्या संदर्भात घडलेला एक प्रसंग आठवला.

एकदा सौ. अंजली गाडगीळ (आताच्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) यांनी सत्संगात साधकांना ‘भावजागृतीसाठी साधना’ हा ग्रंथ वाचून यायला सांगितला. नंतरच्या सत्संगात त्यांनी साधकांना विचारले, ‘‘ग्रंथ वाचला का ?’’ तेव्हा साधकांनी हात वर करून होकार दर्शवला; मात्र मधुराताईने हात वर केला नाही. ती शांत बसली होती. तेव्हा सौ. अंजली गाडगीळ यांनी मधुराताईला विचारले, ‘‘तुला ग्रंथ वाचायला वेळ मिळाला नाही का ?’’ त्यावर मधुराताई नम्रपणे म्हणाली, ‘‘मी ग्रंथातील ७ – ८ पानांवरील लिखाण वाचले आहे आणि त्यातील सूत्रे आचरणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्याकडून ग्रंथांतील लिखाण जेवढे आत्मसात् झाले, तेवढेच वाचन मी केले.’’

येथे मी कु. मधुराताईची धर्मराजाशी तुलना करत नाही, तर दोघांच्या विचारांत असलेले साम्य दर्शवत आहे. मी माझ्या लक्षात आलेल्या मधुराताईच्या प्रगल्भतेविषयी सांगत आहे. अशी ही मधुराताई सनातन संस्थेतील अनेक साधक रत्नांपैकी एक साधकरत्न आहे.

धन्य ती मधुराताई ! आणि धन्य ते असे साधक घडवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !’

– (पू.) श्री. गुरुनाथ दाभोलकर (सनातनचे ४० वे संत, वय ८४ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (११.३.२०२४)