दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : नातीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या सावत्र आजोबांना अटक !; पिंपरी (पुणे) येथे ट्रकमालकाला मारहाण करणार्‍या धर्मांधाला अटक !…

नातीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या सावत्र आजोबांना अटक !

नात्याला काळीमा फासणारी घटना !

मुंबई – मुंबईतील पश्चिम उपनगरातील कुरार पोलीस ठाणे परिसरात १९ वर्षांच्या मुलीवर तिच्या सावत्र आजोबांनी लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदवून आरोपी आजोबांना विरार येथून अटक करण्यात आली आहे.

आजोबा वर्ष २०१४ पासून मुलीचा लैंगिक छळ करत होते. या घटनेची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकीही आरोपीने दिली होती. पीडितेने आक्षेप घेतल्यास आजोबा तिला मारहाण करायचे.


पिंपरी (पुणे) येथे ट्रकमालकाला मारहाण करणार्‍या धर्मांधाला अटक !

पिंपरी (जिल्हा पुणे) – ट्रकवर बदली चालक म्हणून काम करणार्‍या इस्माईल डिंडवार याने ठरलेल्या रक्कमेपेक्षा अधिक पैसे मागत ट्रकमालक आकाश जायभाय यांना मारहाण केली. या प्रकरणी इस्माईल डिंडवार याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी आकाश यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.


नाशिक येथे दुचाकींच्या गोदामाला आग !

७० पेक्षा अधिक दुचाकी जळून खाक

नाशिक – येथील जुने नाशिक भागात २२ एप्रिलला दुचाकी वाहन खरेदी विक्री गोदाम आणि घरे यांना आग लागली. यात ७० पेक्षा अधिक दुचाकी जळून खाक झाल्या. अग्नीशमन दलाच्या १० बंबांनी आग आटोक्यात आणली. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही; मात्र आगीमागील कारण कळू शकलेले नाही.


चारचाकीच्या धडकेत दोन शाळकरी मुली गंभीर घायाळ !

मुंबई – येथे महालक्ष्मी परिसरातून भरधाव वेगाने जाणार्‍या चारचाकीने दिलेल्या धडकेत इयत्ता १० वीत शिकणार्‍या दोन शाळकरी मुली गंभीर घायाळ झाल्या आहेत. त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार चालू आहेत. या प्रकरणी अज्ञात चारचाकी चालकाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे; मात्र तो पसार झाला आहे.


६ वर्षांच्या मुलाचा खड्ड्यात पडून मृत्यू, तर काकाची लोकलखाली उडी घेऊन आत्महत्या !

मुंबई – मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून ६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. पुतण्याच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने काकाने लोकलखाली उडी घेऊन आत्महत्या केली. आयुष राजेश शेगोकार असे मुलाचे नाव असून शैलेश शेगोकार असे त्याच्या काकाचे नाव आहे.