रामनाथी, गोवा – सहजता, प्रेमभाव, क्षात्रवृत्ती, जिज्ञासा, शिकण्याची वृत्ती आणि सात्त्विकतेची ओढ असलेला फोंडा (गोवा) येथील चि. अनंत राकेश देशमाने (वय ३ वर्षे) याची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के असल्याची आनंदवार्ता श्रीरामनवमीच्या दिवशी घोषित करण्यात आली. १७ एप्रिल २०२४ या दिवशी श्रीरामनवमीच्या निमित्ताने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी काही दैवी बालके आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी घेतलेल्या सत्संगात ही आनंदवार्ता सर्वांना दिली. या वेळी चि. अनंतचे वडील आधुनिक वैद्य (डॉ.) राकेश देशमाने, आई आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. अमृता देशमाने, मोठा भाऊ कु. राघव देशमाने (वय ९ वर्षे) (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), मावशी सौ. अश्विनी सावंत (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), आजी सौ. अनुराधा निकम (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) आणि आजोबा श्री. हरिश्चंद्र निकम हे उपस्थित होते. त्यासह अन्य काही दैवी बालके आणि त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते.
१. काव्याद्वारे उलगडले अनंतच्या दैवीपणाचे रहस्य !
श्रीरामनवमी म्हणजे धरतीवर साक्षात् श्रीरामप्रभु अवतरल्याचा दिवस ! प्रभु श्रीराम सर्व गुणांनी संपन्न असल्याने त्याने रामराज्याची स्थापना केली. अशा रामराज्याची आताही कलियुगात स्थापना करण्यासाठी भगवंतच जन्मत: दैवी गुण असलेल्या दैवी बालकांना या पृथ्वीतलावर पाठवत आहे. श्रीरामस्वरूप गुरुदेवांनी अशा दैवी बालकांमधील दैवीपण उलगडले. हिंदु राष्ट्राची म्हणजे रामराज्याची भावी पिढी असलेल्या या दैवी बालकांच्या संवादातून, त्यांच्या बोलण्यातून त्यांच्यातील दैवीपणाची वैशिष्ट्ये कशी लक्षात येतात ? रामराज्यासाठी गुरुदेवांनी त्यांच्यामध्ये आधीपासूनच कशी पात्रता निर्माण केली आहे ? हे जाणून घेण्यासाठी श्रीरामनवमीच्या निमित्ताने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आश्रमातील काही दैवी बालक आणि त्यांचे कुटुंबीय यांची भेट घेतली. दैवी बालकांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यातील दिव्यत्व यांविषयी त्यांचे कुटुंबीय सांगत असतांना वातावरणात आनंदाचे तरंग उमटले होते. त्या आनंदांच्या तरंगांमध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी एक काव्य म्हटले,
भूतली या जन्म घेता, होते अनेक जिवांचे मीलन ।
परी शेवटी व्हायचे त्या अनंतात विलीन ।।
याचे भान देण्या जन्म घेती दैवी बालके अनेक ।
रत्नपारखी गुरुदेव शोधूनी तयांना, करिती रामराज्याचे पाईक ।।
त्यातीलच असे दैवी बालक एक, नाव त्याचे अनंत ।
जन्मत:च ६४ टक्के पातळी घेऊन आला, करण्या गुरुकीर्ती दिगंत ।।
या काव्यातून चि. अनंत महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के असल्याचे घोषित केले. त्यानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी चि. अनंत याला भेटवस्तू देऊन त्याचा सत्कार केला.
२. आध्यात्मिक पातळी घोषित केल्यानंतर चि. अनंत याच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेले मनोगत
२ अ. (डॉ.) सौ. अमृता देशमाने (चि. अनंत याची आई) : पुष्कळ कृतज्ञता वाटत आहे. त्याच्यात पुष्कळ गुण आहेत; पण माझ्याकडून त्याच्यातील गुण पाहिले जात नव्हते. त्याला दैवी बालक आणि त्याची पातळी घोषित केल्यावर मला त्याच्यातील दैवी गुणांची जाणीव झाली.
२ आ. डॉ. राकेश देशमाने (चि. अनंत याचे वडील) : अनंत हजरजबाबी आहे. त्याच्या शिक्षकांनी एकदा सांगितले होते की, तुम्ही काहीतरी सांगून त्याला फसवू शकत नाही. खरे काय ते त्याला कळते. त्याची प्रगल्भता आणि आकलनक्षमता पुष्कळ चांगली आहे.