प्रथम ‘रॅगिंग’ झाल्याची तक्रार मान्य; नंतर अमान्य
पुणे – बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील क्ष-किरणशास्त्र विभागात पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षामध्ये शिकणार्या विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’ झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. ही घटना मार्च महिन्यात घडली होती. २ दिवसांपूर्वी तक्रारदार विद्यार्थिनी आणि ‘रॅगिंग’ करणार्या विद्यार्थिनींसोबत त्यांच्या पालकांची बैठक अधिष्ठात्यांनी घेतल्याचे उघड झाले आहे. या बैठकीत दोषी विद्यार्थिनींना केवळ समज देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला गेला. बैठकीनंतर अधिष्ठात्यांनी ‘रॅगिंग’ झालेच नसल्याचा दावा केला आहे. प्रारंभी ‘रॅगिंग’ प्रकरणी तक्रार आल्याचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी मान्य केले होते. २ दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीनंतर डॉ. काळे यांनी ‘रॅगिंग’ झाले नसल्याचे सांगितले आहे.
‘रॅगिंग’ झालेली विद्यार्थिनी सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी असून ती पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. तिने तक्रार दिल्यानंतर या प्रकरणी ‘रॅगिंग प्रतिबंधक समिती’ने अन्वेषण करून स्वत:चा अहवाल वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडे सादर केला आहे. ‘रॅगिंग’ झालेल्या विद्यार्थिनीचे चुलते म्हणाले की, बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी आमच्यासमोर ‘रॅगिंग’ करणार्या विद्यार्थिनींना समज दिली. याचसह भविष्यात असा प्रकार घडणार नाही, असे आश्वासनही दिलेले आहे. यानंतर माझ्या पुतणीला होणारा त्रास थांबला आहे.