प्राचीन मंदिरांतील आश्चर्यजनक विज्ञान !

भारतात प्राचीन काळी प्रगत विज्ञान होते; पण पाश्चात्त्यांना भारताचा हा इतिहास पुढे येऊ द्यायचा नाही, हे अनेक उदाहरणांतून लक्षात येते. त्यामुळे त्यांच्या प्रभावाखाली असलेले कुणी आधुनिकतावादी याला ‘छद्म विज्ञान’ म्हणतील; परंतु या रहस्यांचा पूर्ण उलगडा जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत सर्वांसाठीही हे कोडेच आहे ! अर्थात् मंदिरांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पुरावे ठेवून गेलेल्या या वैज्ञानिक गोष्टींचा उलगडा काळाच्या ओघात होईल आणि प्राचीन भारतीय संस्कृतीची महानता पुन्हा एकदा उजागर होईल, यात शंका नाही !

मंदिर आणि मूर्ती निर्मात्यांना तंत्रज्ञान, तसेच अभियांत्रिकी ज्ञानाचा मोठा अनुभव असल्याशिवाय एवढी वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे बांधून होणे अशक्य आहे; किंबहुना काही ठिकाणची आश्चर्ये पाहिल्यावर असे लक्षात येते की, तेव्हाचे विज्ञान-तंत्रज्ञान आजच्या पेक्षाही प्रगत होते !

प्राचीन काळी यंत्रे अस्तित्वात होती, याचे पुरावे देणारे होयस्लेश्वर मंदिर !

कर्नाटकमधील होळीबेडू येथील होयस्लेश्वर मंदिर हे १२ व्या शतकात विष्णुवर्धन राजाच्या काळात बांधण्यात आले. होयसळ ही पूर्वी राजधानी होती. पौराणिक वास्तूकलेच्या अत्यंत आकर्षक संरचना या मंदिरात आहेत. या मंदिरात २५० देवता आहेत. या मंदिरातील खांबांवरील अत्यंत बारीक गोलाकार रेषा (कुंभाराच्या चाकावरील फिरत्या मडक्यावर असतात तशा) या त्यावर यंत्राशिवाय निर्माण होणे अशक्य आहेत !

येथील शिवाच्या मूर्तीवरील मुकुटावर साधारण १ इंचाच्या आकाराएवढ्या छोट्या  दगडाच्या (मानवी) कवट्यांची नक्षी आहे. विशेष म्हणजे या कवट्या आतून पोकळ आहेत. यात एक बारीक काठी जाऊ शकते. या कवटीच्या डोळ्यांतून जाणारा प्रकाश कान आणि तोंड यांच्या भोकांतून बाहेर पडतो. ‘अशा प्रकारे छोटी मानवी कवटीची नक्षी दगडात हाताने बनवणे कठीण आहे. ती यंत्राविना बनू शकत नाही’, असे तज्ञ सांगतात.

याचा अर्थ दगडावर काम करणारे अशा प्रकारचे यंत्र त्या काळी अस्तित्वात होते. काही मंदिरांमध्ये काही मूर्तींच्या हातात अशा प्रकारचे यंत्र आढळते की, जे सध्याच्या दगडाच्या कोरीव कामात वापरतात.

याचा अर्थ ‘प्राचीन काळी ही यंत्रे अस्तित्वात होती’, असा होतो. १४ व्या शतकाच्या आरंभी इस्लामी आक्रमकांनी हे मंदिर तोडले. होयसळ राजांनी दीड सहस्र मंदिरे बांधली होती.

डोळ्यांनी न दिसणारे नक्षत्रातील तार्‍यांच्या आकृत्या असणारे होयस्लेश्वर मंदिर !

होयस्लेश्वर मंदिरातील खांबांवरील नक्षीकाम

होयस्लेश्वर मंदिरात साध्या डोळ्यांनी नक्षत्रातील जे तारे दिसत नाहीत, त्यांच्या प्रतिकृती येथील दगडी कोरीव कामात आहेत. याचा अर्थ भारतीय पूर्वजांना या तार्‍यांविषयी ठाऊक होते. हे तारे दिसू शकणारी दुर्बिण त्यांच्याकडे होती. ५०० वर्षांपूर्वी या मंदिराचे पुनर्निर्माण करण्यात आले. भारतातील अनेक मंदिरांमध्ये दुर्बिणीतून आकाशात पहात असलेले स्त्री-पुरुष कोरलेले आहेत. याचा अर्थ दुर्बिण ही वस्तूही तेव्हा उपलब्ध होती.

अनेक अद्भुत आश्चर्यांनी युक्त तमिळनाडूतील बृहद्देश्वर मंदिर !

तमिळनाडू येथील तंजावरमधील बृहद्देश्वर शिवमंदिर हे चोल घराण्याचा पहिला राजा याने वर्ष १०३५ मध्ये बांधले. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे ५० कि.मी.च्या परिसरात आजूबाजूला कुठेच ग्रॅनाईट हा दगड मिळत नाही. त्यामुळे प्राचीन काळी ६० सहस्र टन वजनाचा दगड किती लांबून येथे आणला गेला असेल, हे लक्षात येते. या मंदिराच्या शिखरावर ८० सहस्र किलोचा दगड आहे. त्या काळात यंत्र उपलब्ध नसतांना एवढ्या प्रचंड मोठ्या वजनाचा दगड वर कुणी कसा ठेवला असेल ? असे म्हणतात की, मंदिराच्या कळसापर्यंत जाण्यासाठी ६ कि.मी. लांब उतरता रस्ता बनवण्यात आला आणि हत्ती, घोडे यांच्या आधारे हा कळसाचा दगड वरपर्यंत नेण्यात आला ! या मंदिराचा कळस जगातील कळसांपेक्षा सर्वांत उंच म्हणजे २१६ फूट इतका आहे. दगड एकमेकांत अडकवून (‘पझल टेक्निक’) हा कळस बनवला गेला आहे.

बृहद्देश्वर मंदिरातील खांबांवरील नक्षीकाम
बृहद्देश्वर मंदिरातील २५ टन वजनाच्या नंदीची मूर्ती

चोला स्थापत्यशास्त्रानुसार बांधलेल्या मंदिरात १०० गुप्त तळघरे असून ती राजवाडे किंवा अन्य महत्त्वाची ठिकाणे यांच्याशी जोडलेली आहेत. बृहद्देश्वर मंदिराच्या भिंतीवर एका युरोपीय माणसाची आकृतीही का निर्माण केली असावी ? हे अद्याप लक्षात आलेले नाही. मंदिराच्या कळसाची कुठेही सावली न पडणे, हे एक मोठे रहस्य आहे ! येथील गोपूरम्चा आकार श्रीयंत्रापेक्षा लहान का केला आहे ?, हेही एक कोडे आहे. येथील नक्षीकामात वापरलेले रंग अद्यापही चांगल्या स्थितीत आहेत. या मंदिराच्या बाहेरच्या बाजूने दगडांवर तत्कालीन जुन्या तमिळ भाषेत मोठ्या प्रमाणात लिखाण कोरलेले आहेत. १३ फूट उंच आणि १६ फूट लांब आकाराचा, २५ टन वजनाचा नंदी येथे आहे. हे मंदिर म्हणजे विज्ञान, गणित, भूमिती, वास्तूकला या सार्‍यांचा उत्तम नमुना आहे.