वास्तूशास्त्रावर आधारित भारतीय मंदिरांमध्ये धर्म, कला आणि विज्ञान यांचा एक आकर्षक मिलाप !

अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर

भारतीय मंदिरे धर्म, कला आणि विज्ञान यांचे एक आकर्षक मिश्रण आहेत. ती केवळ उपासनास्थळेच नाहीत, तर प्राचीन भारतातील विज्ञान आणि अभियांत्रिकीचे प्रगत ज्ञान दर्शवणारे उत्कृष्टे नमुने आहेत. मंदिरे मुद्दाम अशा ठिकाणी बांधतात, जिथे उत्तर/दक्षिण  दिशेने चुंबकीय आणि विद्युत लहरी वाहून सकारात्मक ऊर्जा मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. गोपुरम्मधून मंदिरात प्रवेश केल्यावर एक विशिष्ट कंपन किंवा सकारात्मकतेची भावना जाणवते. बांधकामापूर्वी मंदिरासाठी हे सर्व असणारी जागा शोधली जाते.

भारतीय मंदिरांच्या बांधकामामध्ये गणित, खगोलशास्त्र आणि अभियांत्रिकी यांचे सखोल ज्ञान आहे. वास्तूशास्त्रावर आधारित ‘शिल्पशास्त्र’ यांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये नमूद केलेल्या कठोर मार्गदर्शक सूचनांनुसार प्राचीन भारतातील मंदिरे बांधली गेली. या ग्रंथांमध्ये मंदिरांची नक्षी आणि बांधकाम यांविषयी तपशीलवार सूचना आहेत, ज्यात मंदिराच्या विविध भागांचे प्रमाण आणि मुख्य मंदिराच्या स्थानाविषयी दिशानिर्देशन आहे. वास्तूशास्त्र हिंदु विश्वाच्या अंगभूत तत्त्वांवर आधारित आहे आणि त्यामुळे बांधकामाच्या वातावरणात सुसंवाद आणि संतुलन राखले जाते. मंदिरे अशा प्रकारे बांधली गेली की,  मंदिराला योग्य प्रमाणात प्रकाश आणि हवा मिळावी, तसेच सूर्याचे प्रकाशकिरण योग्य प्रकारे मंदिरात प्रवेश करावेत. भारतीय मंदिरे त्यांचे गुंतागुंतीचे कोरीव काम आणि शिल्प यांसाठीही ओळखली जातात. स्थानिक पातळीवर उपलब्ध साहित्य, जसे की ग्रॅनाइट, सँडस्टोन आणि चुनखडी वापरून मंदिरे बांधली गेली आणि प्रगत साधने अन् तंत्र यांचा वापर करून शिल्पे सिद्ध केली गेली. शिल्पांमध्ये अत्यंत उच्च दर्जाची अचूकता असल्याचे लक्षात येते. त्यावरील गुंतागुंतीचा तपशील, म्हणजे कारागिरांच्या कौशल्याची आणि ज्ञानाची साक्ष आहे.  भारतीय मंदिरे ही केवळ साधनाक्रेंद्रेच नाहीत, तर प्राचीन भारतातील विज्ञान आणि अभियांत्रिकीचे प्रगत ज्ञान दर्शवणारे चमत्कार आहेत ! गणित, खगोलशास्त्र अभियांत्रिकी, ध्वनिकी येथपर्यंत, भारतीय मंदिरे ही परंपरेने विज्ञान आणि अध्यात्म यांचा मिलाप असून ते एकमेकांशी पूरक कसे असू शकते, याचेही एक उत्कृष्ट उदाहरण आहेत ! – उमंग गाला


भारतीय मंदिरांचा एक उल्लेखनीय पैलू म्हणजे त्यांची ‘ध्वनिकी !’ बर्‍याच मंदिरांमध्ये ‘सभा मंडपम्’ किंवा ‘नाडा मंडपम्’ नावाचे एक विशिष्ट सभागृह असते. यात मंदिराच्या घंटा आणि इतर संगीत साधनांचा आवाज अन् अनुनाद वाढवण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान वापरलेले असते. यामागील विज्ञान म्हणजे सभागृहाचा आकार आणि बांधकामात वापरले जाणारे विशिष्ट साहित्य आवाज वाढवण्यासाठी एकत्र काम करते !

– उमंग गाला (paraminnovation.org )