कळसदर्शन आणि कळसाचे महत्त्व !
‘देवालय म्हणजे भगवंताचे विश्वरूप दर्शन !’ हे आकाशसह घ्यावयाचे असते. आकाश हाही वास्तूनिर्मितीचाच एक अविभाज्य भाग असतो. खजुराहो येथील देवालये, भुवनेश्वरचे लिंगराज देवालय, तेजोमहालय (ताजमहाल) यांसारखी देवालये आकाशाच्या पार्श्वभूमीवरच पहायची असतात. ‘खं ब्रह्म’ याचा अर्थ ‘आकाश हे ब्रह्म आहे.’
कळसाचा आध्यात्मिक अर्थ !
१. कळसाचा ज्योतीर्मय स्वरूपाचा सर्वांत वरचा भाग
‘हिरण्यगर्भ’ नावाची तेजस्वी आत्मज्योत निर्माण झाली. ती कळसाच्या सर्वांत वरच्या भागातील ज्योतीर्मय रूपाने दाखवली जाते. आत्मा प्रकाशस्वरूप, ज्योतीर्मय स्वरूपाचा असल्यामुळे मंदिराचा कळस ज्योतीच्या आकाराचा आणि सुवर्णाचा असतो.
२. अष्टधा प्रकृतीचे प्रतीक असलेला ‘आमलक’ नावाचा भाग
त्या कळसाखाली ‘आमलक’ नावाचा भाग असतो. आमलक म्हणजे आवळा. मोरावळ्याचे नीट निरीक्षण केल्यास लक्षात येईल की, आवळा अखंड दिसत असला, तरी त्याला पाकळ्या असतात. त्या सुट्या करता येतात. तसेच आत्मज्योत-विश्वात्मक अहंकार अष्टधा प्रकृतीने युक्त असतो. आमलक हा त्या अष्टधा प्रकृतीचे प्रतीक होय. त्यानंतर स्थूल, भूत सृष्टी निर्माण होऊ लागते. भौतिक सृष्टीचा प्रारंभ आकाशापासून होतो.
३. आमलकाखाली आकाशाचे प्रतीक असणारा घुमट असतो.
४. घुमटाखालील चौकोनी गाभारा हा स्थिरतेचे, म्हणजे पृथ्वीचे प्रतीक आहे. अशा प्रकारे आत्मतत्त्वाचे पृथ्वीतत्त्वापर्यंत अवतरण होते.
– श्री. संजय मुळ्ये, रत्नागिरी
देवळाच्या कळसामध्ये दहाही दिशांतील लहरींना ग्रहण करण्याची क्षमता असते. देवळाचा कळस हा आकाशतत्त्वाशी संबंधित ब्रह्मांडातील देवतेच्या तत्त्वाच्या लहरी ग्रहण करून आवश्यकतेप्रमाणे सर्व दिशांना प्रक्षेपित करू शकतो. देवळाच्या कळसातून कारंज्यासारख्या प्रक्षेपित होणार्या सात्त्विक लहरींमुळे गावाभोवती संरक्षणकवच निर्माण होते, तसेच या लहरींमुळे दाही दिशांनी प्रवेश करणार्या वाईट शक्तींपासून गावाचे रक्षण होण्यास साहाय्य होते.
देवळाचा कळस हा ईश्वराकडून येणारे निर्गुण तत्त्व हे देवतेच्या मूर्तीतून प्रत्यक्ष सगुणातून कार्य करण्यासाठी प्रक्षेपित होणार्या लहरींत अधिक प्रमाणात पसरवतो. त्यामुळे या लहरींची व्याप्ती आणि परिणाम हा देवळाच्या क्षेत्रात जास्त वेळ टिकतो. या कारणास्तव काही मीटर अंतरावरूनच आपल्याला देवळातील जागृत देवतेकडून आणि कळसाकडून प्रक्षेपित होणार्या सात्त्विक लहरींचे अस्तित्व जाणवते. देवळाचा कळस मूर्तीपासून १५० फूट उंच असल्यास कळसाच्या या टोकाच्या केंद्रबिंदूशी ईश्वराच्या निर्गुण लहरींचे सगुण लहरींत रूपांतर होते. सोन्यात सात्त्विकता ग्रहण करण्याची क्षमता सर्वाधिक असल्याने शक्यतो कळस सोन्याचा असावा.
– एक विद्वान (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या ‘एक विद्वान’ यांच्या माध्यमातून लिखाण करतात.) २१.११.२००४, सकाळी १०.३२)
वीज दूर ढकलणार्या वृक्षाचे लाकूड कळसात बसवले जाणे !
मंदिराचे वीज पडण्यापासून रक्षण होण्यासाठी या तांब्याच्या कळसात ‘करुंगाळी’ नावाच्या विशिष्ट प्रकारच्या वनस्पतीचे लाकूड बसवले जाई. अत्यंत दुर्मिळ झालेला हा वृक्ष विजेला दूर ढकलणारा आहे. हा वृक्ष उंच पर्वतावरील जंगलात आढळतो. पूर्वी अशा कळसावर कुंभाभिषेक केला जाई.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, ईरोड, तमिळनाडू. (४.२.२०१६, सकाळी ९.१८)
मंदिरांची आदर्श रचना कशी हवी ?
‘एखाद्या मंदिराच्या गर्भगृहाचा मध्यबिंदू, सभागृहाचा मध्यबिंदू, मुखमंडपाचा मध्यबिंदू आणि वाहनमंडपाचा मध्यबिंदू हे सगळे एका रेषेत असतील आणि खालच्या शिखरापासून वरच्या शिखरापर्यंत, म्हणजे पातळापासून स्वर्गापर्यंत सगळे दर्शन होत असेल, तर तेथे प्रचंड प्रमाणात ऊर्जा असते. आज मंदिरांत हे आढळत नाही; कारण आजची मंदिरे लोकांना जमा करण्यासाठी हेतूतः उभारली जातात, म्हणजे तेथे सकामता आली. जेव्हा कर्म सकाम केले जाते, तेव्हा ते निष्फळ होते. इंद्र-वरुणाला आवाहन करून आणलेली मुख्य देवता अशा मंदिरांमध्ये असते का ?’
– पू. डॉ. रामचंद्र मोरवंचीकर, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहाससंशोधक, संभाजीनगर. (ऑगस्ट २०१४)
देवालयांच्या रचनेमागील अध्यात्मशास्त्र
‘देवालयाच्या रूपाने साक्षात् भगवंतच उभा असतो’, असे अग्निपुराणामध्ये म्हटलेले आहे. वास्तू आयताकार असेल, तर देवतेच्या चैतन्याच्या फलप्राप्तीच्या दृष्टीने सामान्यजनांना जास्त लाभ होतो.
शिल्पशास्त्रानुसार देवालयाच्या ३ शैली
१. नागर शैली : हे मंदिर चौकोनी असते.
२. द्राविड शैली : हे मंदिर अष्टकोनी असते.
३. वेसर शैली : हे मंदिर वर्तुळाकृती असते.
मंदिराचे मुख्य भाग
१. गर्भगृह : ‘मंदिराचा मुख्य भाग म्हणजे ‘गर्भगृह’ (निजमंदिर, प्रकोष्ठ). यात मुख्य देवता असते.
२. मंडप : गर्भगृहापुढे लंबचौकोनी असा ‘मंडप’ असतो.
३. अंतराळ : गर्भगृह आणि मंडप ज्या एका लहानशा भागाने जोडलेले असतात, त्याला ‘अंतराळ’ असे म्हणतात.
४. अर्धमंडप : मंडपाच्या पुढील भागात मुख्य मंडपात प्रवेश करण्यासाठी ‘अर्धमंडप’ असतो.
५. शिखर : गर्भगृहावर निमुळते होत गेलेले उंच शिखर असते.
६. प्रांगण : मंदिरासभोवती प्रांगण असते. त्यात मुख्य मंदिराव्यतिरिक्त इतरही काही छोटी छोटी मंदिरे चौथर्यावर उभारलेली असतात. मंदिराच्या इतर भागावरही शिखरे असतात; पण ती मुख्य शिखराहून अल्प उंचीची असतात.
७. कीर्तीमुख : मंदिरात गाभार्याच्या द्वारावर, देवाच्या प्रभावळीत, उंबर्यावर अथवा शिखरापाशी एक विक्राळ सिंहमुख कोरलेले असते, त्याला ‘कीर्तीमुख’ असे म्हणतात.
८. गोमुख : ‘मंदिरातील देवाच्या अभिषेकाचे पाणी पन्हाळी बांधून बाहेर आणून तिच्या तोंडाला गायीच्या मुखाचा आकार देण्याची पद्धत आहे. याला ‘गोमुख’ म्हणतात. गोमुखातून प्रवाही होणारे तीर्थ प्राशन केल्यामुळे जिवाच्या शरिरातील पंचप्राणांचे कार्य वाढते.
प्रवेशद्वारावरील व्याघ्रमुखाचे कार्य
प्रवेशद्वाराच्या कमानीचे टोक हे देवळाच्या शिखराला समांतर असल्याने देवळाच्या कळसातून प्रक्षेपित होणार्या रजोगुणी मारक लहरी या प्रवेशद्वाराच्या कमानीच्या मध्यभागी बसवलेल्या व्याघ्रमुखाकडे आकर्षिल्या जातात आणि आवश्यकतेनुसार वातावरणात प्रक्षेपित केल्या जातात. व्याघ्रमुख हे देवतेच्या मारक रूपाचे प्रतीक आहे. प्रवेशद्वारी व्याघ्रमुख, तर देवळाच्या पाठीमागे गोमुख असते. गोमुख हे देवतेच्या तारक रूपाशी संबंधित आहे. देवतेच्या मूर्तीकडून प्रक्षेपित होणार्या मारक लहरी व्याघ्रमुखाकडे आणि तारक लहरी गोमुखाकडे आकर्षिल्या जातात अन् मुखांच्या चिंचोळ्या पोकळीत धरून ठेवल्या जातात आणि आवश्यकतेनुसार वातावरणात प्रक्षेपित केल्या जातात. व्याघ्रमुखामुळे देवळाच्या आवारात वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाहीत. त्यामुळे देवालयाच्या आवारातील तारक लहरींचा दर्शनार्थी जिवांना अधिकाधिक मिळण्यास साहाय्य होते.
घंटा : घंटेच्या नादातून निर्माण झालेल्या नादलहरींमुळे घुमटात घनीभूत झालेल्या देवतेच्या लहरी कार्यरत होण्यास साहाय्य होते. सभामंडपात किंवा सभागारात घुमटाकृती छताला टांगलेली एकच पितळी घंटा असावी. अधिक घंटांनी सूक्ष्म उष्णलहरी निर्माण होऊन सात्त्विकता न्यून होते.
चौथरा : चौथर्यावरून देवालयाला प्रदक्षिणा घातल्याने वायू आणि आकाश या स्तरांवर देवालयाच्या घुमटाकार रचनेच्या टोकातून प्रक्षेपित होणार्या चैतन्याचा लाभ होतो.
धर्मध्वजाचे महत्त्व !
धर्मध्वजमंदिराच्या कळसाच्या जवळ लावलेल्या धर्मध्वजातून धर्मशक्ती आणि ज्ञानशक्ती यांचा मिलाप झालेली दिव्य शक्ती वातावरणात प्रक्षेपित होते. मंदिरावर कळसाच्या जवळ लावलेल्या धर्मध्वजामध्ये कळसातून प्रक्षेपित होणार्या सूक्ष्मतर स्तरावरील देवतेच्या तत्त्वलहरी आकृष्ट होत असतात आणि त्या धर्मध्वाजाच्या टोकातून तेजतत्त्वाच्या स्तरावर सूक्ष्म स्तरावर वातावरणात प्रक्षेपित होतात.
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१.२०२२)
घुमटाची रचना विशिष्ट का असते ?
घुमटाच्या ८ रेषा अष्टदिशांचे प्रतिनिधित्व करतात. देवतेकडून प्रक्षेपित होणार्या चैतन्ययुक्त लहरी गाभार्याच्या उंच आयताकारातून वेग घेऊन घुमटात प्रवेश करून व्यापक स्तरावर घुमटात स्थित झाल्याने त्यांतील रजोगुण अल्प होतो आणि त्याचे रूपांतर सगुणातून निर्गुणात होते. या लहरी घुमटाच्या मध्यबिंदू्त घनीभूत होतात आणि कारंज्याप्रमाणे आवश्यक त्या प्रमाणात मध्यबिंदूतून अधो किंवा ऊर्ध्व दिशेने प्रक्षेपित होतात किंवा घुमटाच्या पाकळ्यांतील रेषेतून वेगाने ८ दिशांना निर्गुण चैतन्याचे सगुणात रूपांतर करतात.
गाभारा कसा असावा ?
१. गाभारा : गाभार्याची रचना आयताकार असावी. या आयताचे प्रमाण ५ : १० असे असावे. वरच्या बाजूला घुमटाकार छत्रीसारखी असावी. तिची उंची १५ या प्रमाणात असावी. गोलाकार गाभारा हा देवाच्या अप्रकट शक्तीचे प्रतीक आहे. गर्भागाराची रचना अष्टकोनी असावी. ते ८ दिशांतून कार्यरत असणार्या ज्ञानशक्तीचे प्रतीक आहे. देवतेमध्ये आठही दिशांतून प्रक्षेपित होणार्या लहरींवर नियंत्रण ठेवण्याची आणि त्यांचे योग्य संतुलन राखण्याची क्षमता असते.
देवालयात तेजतत्त्वाशी संबंधित स्तरावर देवतेच्या चैतन्याचा लाभ होतो. देवालयाच्या अंतर्कक्षात सगुण-निर्गुण, तर बाहेर निर्गुण-सगुण स्तरावर भाविकाला चैतन्याची प्राप्ती होते.
अ. देवळी : गाभार्यात भिंतीमध्ये देवतेच्या मागे दोन्ही बाजूंना दिवे ठेवण्यासाठी असणार्या छोट्या कमानी या देवतेच्या चंद्र आणि सूर्य या नाड्यांचे प्रतीक आहेत.
आ. नंदादीप : सतत तेवणारा नंदादीप हा आत्मशक्तीच्या बळावर अविरत चालू असणार्या ईश्वराच्या कार्यरत ऊर्जेचे प्रतीक आहे. यामुळे जिवाला आत्मानंदाची अनुभूती येते. मन शांत, स्थिर होते. इ. समई : समईच्या ज्योतीतून प्रक्षेपित होणार्या लहरी गर्भागारात येऊन जिवाच्या भावाप्रमाणे कार्य करतात. गाभार्यातील या लहरींचे जिवाभोवती वेगवान मारक संरक्षककवच निर्माण होते. लहरींच्या प्रभावामुळे जिवाची आत्मशक्ती जागृत झाल्याने जिवाच्या प्राणदेहाची, तसेच सूक्ष्मदेहाची एकाच वेळी शुद्धी होते.
– एक विद्वान (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या ‘एक विद्वान’ या नावाने लिखाण करतात.)
देवळात कासवाचे प्रतीक का असते ?
सर्व प्राणिमात्रांचे पोषण आणि वर्धन त्याची जननी भक्षपदार्थ देऊन करत असते. कासवाचे मात्र असे नाही. कासवी तिच्या पिल्लाला खाद्यपदार्थ देऊ शकत नसल्याने ती आपल्या पिल्लाकडे केवळ वात्सल्यदृष्टीने पहाण्यानेच त्याचे पोषण आणि वर्धन होते. ‘देवाने आपल्याकडे वात्सल्याने पहावे अन् आमचे हितवर्धन करावे’, यासाठी मंदिरात कासवाची स्थापना केलेली असते. – श्री. नारायण मोरेश्वर जोशी (‘संस्कार संपदा’)
मूर्तीसमोरील कासवाचे महत्त्व
१. मूर्तीसमोरील कासवाच्या ओळीत कुणी बसू नये, म्हणजे समोरच्या दिशेने येणार्या प्रखर शक्तीचा त्रास होत नाही.
२. प्रतीकात्मक : कासव जसे शरिराच्या आत पाय घेऊन बसते, तसे आपणही षड्रिपू शरिराच्या बाहेर येऊ देऊ नयेत.
नंदी किंवा कासव यांचे स्थान
गर्भागाराच्या मध्यभागी समई ठेवतात आणि समई अन् गाभार्याचा उंबरा यांचा मध्य साधून नंदी किंवा कासव असते.
– एक विद्वान (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या ‘एक विद्वान’ या नावाने लिखाण करतात.)
मूर्तीवर पडणार्या सूर्यकिरणांमागील शास्त्र !
पूर्वीच्या काळी देवालयाच्या शिखरांमध्ये असलेले सूक्ष्म छिद्ररूपी झरोके हे वायूमंडलातील सूर्यमंडलाच्या कार्यकारी भावातून स्रवणार्या तेजोमय लहरींशी संबंधित असून ते त्या त्या काळी काळाच्या भानातून भूमंडलाकडे येणार्या सूर्यलहरींना त्या त्या वेळी स्वतःत सामावून घेऊन मूर्तीमध्ये काळाला पूरक प्रमाणात कार्य करणार्या तेजलहरींना घनीभूत करणारे असे होते. म्हणून काळाला पूरक अशाच पद्धतीने देवता भूमंडलातूनच भक्तांच्या कल्याणासाठी कार्य करू शकत होत्या.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
सूर्यकिरणांनुसार रचना
वेदांत, योगशास्त्र यांखेरीज भौतिकशास्त्राचाही देवालयाच्या वास्तूनिर्मितीत विचार केलेला आढळतो. काही देवालयांमध्ये उत्कृष्ट दिक्-बंधन (देवालयातील मूर्तीवर एका ठराविक दिवशीच सूर्याेदयाची पहिली किरणे पडतील, अशी वास्तूरचना करणे) केलेले दिसते. काही देवालयांसमोर लहान लहान झरोके असे आहेत की, कोणत्याही ऋतूत सूर्याची पहिली किरणे मूर्तीवर पडतात. पुण्याजवळील यवतजवळच्या टेकडीवर असे शिवमंदिर आहे.
– श्री. संजय मुळ्ये, रत्नागिरी
मंदिरे पूर्व-पश्चिम असण्याची कारणे
सूर्यकिरण मूर्तीवर पडावेत; म्हणून मंदिरे नेहमी पूर्व-पश्चिम असतात; कारण सूर्यप्रकाशात पवित्रके जास्त प्रमाणात असतात. गोव्यात दुपारी आरशाने सूर्यकिरण मूर्तीवर टाकण्याची पद्धत आहे; म्हणून पूर्व किनार्यावरील मंदिरे पूर्वाभिमुख, तर पश्चिम किनार्यावरील मंदिरे पश्चिमाभिमुख असतात.
– श्री. संजय मुळ्ये, रत्नागिरी
देवळांची रचना आणि देवळात नियमित जाण्याने होणारे लाभ !
एका अधिवेशनात डॉ. गोपालकृष्णन् ‘इंडियन काऊन्सिल ऑफ साइंटिफिक रिसर्च’, तसेच आय.एस्.आर्.ओ. भाग्यनगर (हैद्राबाद) या संस्थेचे डॉ. शशीकुमार आणि अनुजन भट्टाथीरीपाद यांनी पुढील निष्कर्ष स्पष्ट केले. देवळांचे महत्त्व समजण्यासाठी भारतातील देवळांविषयी ‘इंडियन काऊन्सिल ऑफ सायन्स रिसर्च’ या संस्थेने काढलेले निष्कर्ष येथे थोडक्यात देत आहोत.
१. चुंबकीय लहरींमुळे चांगली शक्ती निर्माण झालेल्या भागात वैदिक मंदिरे बांधली जात असणे : सर्व मंदिरांची बांधणी वैदिक पद्धतीने असतेच, असे नाही. सर्वसाधारणतः पृथ्वीच्या ज्या भागातून चुंबकीय लहरी जातात, त्या भागात वैदिक मंदिरे बांधली गेली आहेत. थोडक्यात सांगायचे झाल्यास उत्तर-दक्षिण ध्रुवांमध्ये निर्माण झालेल्या चुंबकीय लहरींमुळे ज्या ठिकाणी चांगली शक्ती पुष्कळ प्रमाणात आढळते, त्या ठिकाणी मंदिरे बांधली जातात.
२. चुंबकीय लहरींचा लाभ होणे : देवळाच्या मध्यभागी चुंबकीय लहरी (values) अधिक प्रमाणात असल्यामुळे तेथे मुख्य मूर्तीची स्थापना केली जाते. वैदिक अक्षरे कोरलेली तांब्याची पट्टी मुख्य मूर्तीच्या खाली पुरली जाते. या जागेला ‘गर्भगृह’ किंवा ‘मूळ स्थान’ असे म्हणतात. ही तांब्याची पट्टी पृथ्वीतील चुंबकीय लहरी आकृष्ट करते आणि वातावरणात प्रक्षेपित करते. घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने मूर्तीला प्रदक्षिणा घालणार्या व्यक्तीला आपोआपच या चुंबकीय लहरींचा लाभ होतो. त्यामुळे मंदिरामध्ये नियमित जाणार्या व्यक्तीला याचा अधिकाधिक लाभ होतो.
३. चांगल्या शक्तीचा लाभ होणे : देवळातील गर्भगृह तिन्ही बाजूंनी पूर्णतः बंद असल्यामुळे इथे सर्व प्रकारच्या शक्तींचे (स्पंदनांचे) प्रमाण सर्वाधिक असते. गर्भगृहामध्ये तेवणारे दिवे प्रकाश आणि उष्णता प्रक्षेपित करतात. घंटानाद आणि मंत्रोच्चार केल्याने नादशक्ती निर्माण होते. देवाला वाहिलेल्या फुलांचा सुगंध, तसेच कापूर आणि उदबत्ती लावणे यांमुळे रासायनिक शक्ती निर्माण होते. मूर्तीतून प्रक्षेपित होणार्या चांगल्या शक्तीमुळे या सर्व प्रकारच्या शक्ती कार्यरत होतात. जेव्हा लोक दीपाराधनेसाठी (आरतीसाठी) देवळात जातात आणि गर्भगृहाचे द्वार उघडले जाते, तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या भाविकांवर चांगल्या शक्तीचा वर्षाव होतो.