भारतात अनादी काळापासून सूर्याेपासना होत होती. आपल्या पूर्वजांना ठाऊक होते की, ऊर्जा सूर्यापासून मिळते. दिवस, रात्र आणि ऋतू यांचे पालटही सूर्यामुळे होतात. यजुर्वेदात ‘७/४२’ या क्रमांकाचे ‘सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च ।’ हे सूक्त आहे. अर्थात् ‘सूर्य सर्व स्थावर जंगम पदार्थांचा आत्मा आहे.’ शुक्ल यजुर्वेदात ‘सूर्य सूक्त’ किंवा ‘मैत्र सूक्त’ या नावाने १७ श्लोक आहेत. ऋग्वेदाच्या पहिल्या मंडळात ५८७ ते ५९९ ही सूक्ते सूर्याचे वर्णन करणारी आहेत. यात ‘सूर्याचे सप्तरंगी किरण असतात’, असा स्पष्ट उल्लेख आहे. (हे अलीकडच्या काळात विज्ञानाने शोधले आहे.) भारतात जी प्राचीन सूर्यमंदिरे आहेत, त्यात वैज्ञानिक प्रमाणे ठासून भरलेली आहेत. त्यांतील काही आपल्याला उलगडता (‘डी-कोड’ करता) आलेली आहेत, तर बरीचशी अजूनही न सुटणार्या कोड्यासारखी आपल्यासमोर आहेत…!
पूर्वीच्या विशाल एकसंघ आणि अखंड अशा भारतात सूर्यदेवाची अनेक मंदिरे होती. कालांतराने इस्लामी आक्रमकांच्या ‘बुतशिकन’ (मूर्तीभंजन) वृत्तीमुळे त्यांनी अनेक मंदिरे ध्वस्त केली. यांतील काहींचेच पुनर्निर्माण झाले.
काश्यपूरचे प्राचीन सूर्यमंदिर !
किमान ५ सहस्र वर्षे जुने ‘आदित्य सूर्यमंदिर’ आज पाकिस्तानातील मुलतानमध्ये (म्हणजे पूर्वीचे ‘काश्यपूर’ येथे) आहे. इ.स.पूर्व वर्ष ५१५ मध्ये येथे आलेला ग्रीक सेनानी ॲडमिरल स्कायलेक्स याने या सूर्यमंदिराचा उल्लेख केला. चिनी प्रवासी ह्युएन त्सांग याने वर्ष ६४१ मध्ये या मंदिराला भेट दिली. त्याने म्हटले, ‘‘हे आदित्य मंदिर अतिशय भव्य आणि विपुलतेने सजलेले आहे. यात सूर्यदेवतेची प्रतिमा सोन्याने मढवलेली असून ती मौल्यवान आणि दुर्मिळ रत्नांनी अलंकृत आहे.’’ वर्ष ७१२ मध्ये महंमद बिन कासिम याने राजा दाहीर याला युद्धात परास्त (पराभूत) केले; पण उत्पन्नाचे मोठे साधन असल्याने सूर्यमंदिर पाडले नाही; उलट आजूबाजूचे हिंदु राजे मुलतानवर आक्रमण करून मुसलमान आक्रमकांना पळवून लावायला यायचे, तेव्हा तो त्यांना धमकवायचा, ‘‘मुलतानवर चालून आलात, तर मी आदित्य सूर्यमंदिर ध्वस्त करीन.’’ एका अर्थाने त्या आदित्य मंदिराला ओलीस ठेवून महंमद बिन कासिम याने बरीच वर्षे युद्धाविना काढली ! वर्ष १०२६ मध्ये महमंद गझनीने हे मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त केले. असे म्हणतात की, या मंदिरात सूर्यासंबंधीची बरीच गूढ माहिती ही विविध मूर्ती आणि विशिष्ट रचना यांद्वारे दर्शवली होती. सांब पुराणात या मंदिराचा उल्लेख आहे.
मध्यप्रदेशातील सूर्यमंदिर !
पूर्वजांचे विज्ञान आजही आपल्याला नीटसे उमगलेले नाही. एक उदाहरण देतो – मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यात रहेली सुनार-देहार या नद्यांच्या संगमावर, एक लहानसे आणि उपेक्षित असे प्राचीन सूर्यमंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे कर्कवृत्तावर असलेले हे मंदिर, मोढेरा आणि कोणार्क या सूर्यमंदिरांच्या बरोबर मध्ये आहे. अक्षांश-रेखांश यांना बघून आपल्याला हे समजू शकेल. मोढेरा आणि कोणार्क यांतील ‘वायू अंतरा’च्या (air distance) अगदी अचूकतेने मधोमध हे रहेलीचे उपेक्षित असे लहानसे सूर्यमंदिर येते. याचा अर्थ सहस्र वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांजवळ, पृथ्वीच्या मोजमापाची अशी अचूक पद्धत होती की, ते या सूर्यमंदिरांची अशी रचना करू शकले !
आपल्या पूर्वजांचे खगोलशास्त्रातील एवढे प्रचंड आणि सखोल ज्ञान आपल्याला अचंबित केल्याविना रहात नाही. त्यांनी ते मंदिरे, मूर्ती आदींच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडले आहे; आपण मात्र आधुनिकतेचा टेंभा मिरवत ते ज्ञान अर्थात् आपले संचित नीट समजू शकलेलो नाही !
कर्नाटकमधील विद्याशंकर मंदिर !
वर्ष १३३० मध्ये विद्याशंकर ऋषींनी विद्याशंकर मंदिर बांधले ! खरेतर याच्या वैशिष्ट्यानुसार याला सूर्यमंदिरच म्हटले पाहिजे. या मंदिराच्या सभोवताली १२ मासांचे १२ खांब आहेत. त्या त्या मासात सूर्यकिरण त्या मासाच्या खांबावर पडतात आणि मास पालटला की, पुढच्या खांबावर पडतात !
सूर्यमंदिरांचा त्रिकोण !
भारताच्या पूर्वेला ओडिशातील कोणार्क सूर्यमंदिर, उत्तरेत जम्मू-काश्मीरमधील मार्तंड सूर्यमंदिर आणि पश्चिमेला गुजरातमधील मोढेराचे सूर्यमंदिर, ही ३ मंदिरे एक त्रिकोण निर्माण करतात.
जम्मू-काश्मीरचे मार्तंड सूर्यमंदिर !
जम्मू-काश्मीरमध्ये अनंतनागजवळचे ‘मार्तंड सूर्यमंदिर’ हे ८ व्या शतकात म्हणजे वर्ष ७६४ मध्ये बांधलेले आहे. कार्कोट वंशाचा चंडप्रतापी राजा ललितादित्य मुक्तापीड याने हे मंदिर उभारले. येथील पठारावरून पूर्ण खोरे नीट दिसते. अत्यंत भव्य अशा या सूर्यमंदिरात अनेक खगोलशास्त्रीय तथ्ये कोरलेली होती. १५ व्या शतकाच्या आरंभी सिकंदर शाह मिरी या क्रूरकर्मा अफगाण शासकाने हे मंदिर ध्वस्त केले. त्यामुळे येथील ज्ञान आणि इतिहास मंदिराच्या अवशेषांमध्ये लुप्त झाला.
गुजरातचे मोढेरा सूर्यमंदिर !
गुजरातच्या मोढेराचे सूर्यमंदिर वर्ष १०२६-२७ मध्ये चालुक्य राजवंशाच्या भीम (पहिला) या राजाने बांधले. कदाचित त्याने मूळ मंदिराचे भव्य पुनर्निर्माण केले असावे. त्या काळात पुष्पावती नदीच्या काठावर खगोलशास्त्रासाठी योग्य म्हणून या जागेची निवड करण्यात आली होती. गूढ मंडप, सभा मंडप आणि मध्यभागी असलेले कुंड अशी या मंदिराची रचना असून हे पूर्वाभिमुख आहे.
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर अतिशय अचूक आणि नेमकेपणाने पृथ्वीच्या कर्करेषेवर उभारण्यात आले आहे. या मंदिराचे अक्षांश-रेखांश आहेत – २३’’, ५८’’, ७२’’ आणि १३’’. आजपासून १ सहस्र वर्षांपूर्वी त्या काळच्या मंदिर निर्मात्यांनी नेमकेपणाने कर्करेषेवर मंदिर उभारले, यातून ‘त्यांची वैज्ञानिक जाण किती असू शकते’, हे लक्षात येते. या मंदिराच्या गर्भगृहाची रचना अशी आहे की, दिवस आणि रात्र समान असणार्या दिवशी, अर्थात् २१ मार्च आणि २३ सप्टेंबर या दिवशी जेव्हा सूर्य विषुववृत्त ओलांडतो, तेव्हा सूर्याची पहिली किरणे आतील सूर्याच्या प्रतिमेला आणि गर्भगृहाला उजळवतात. तसेच वर्षातील सर्र्वांत मोठा दिवस आणि रात्र असलेल्या दिवशी या मंदिराची सावली पडत नाही. मंदिरावर अनेक प्रकारच्या मूर्ती आणि आकृत्या कोरलेल्या आहेत. यात सूर्यमालिका आणि पंचमहाभूते (वायू, पृथ्वी, आकाश, अग्नि, जल) यांचा संबंध दाखवला आहे. वर्षाच्या ५२ आठवड्यांचे प्रतिनिधित्व करणार्या ५२ स्तंभांवर हे मंदिर उभे आहे.
ओडिशाचे कोणार्क सूर्यमंदिर !
ओडिशाच्या कोणार्क सूर्यमंदिराच्या संदर्भात ९ व्या शतकातील उल्लेख सापडतात. नंतर ते भव्य स्वरूपात बांधले गेले असावे. पूर्ब गांग (रुर्ध गांग किंवा प्राच्य गांग) नरसिंहदेव (प्रथम) या राजाने वर्ष १२५० मध्ये समुद्राच्या काठावर कोणार्कचे हे सूर्यमंदिर बांधून पूर्ण केले. कोणार्कचे पूर्वीचे नाव ‘कैनपारा’ होते. हे ७ व्या आणि ८ व्या शतकापर्यंत पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचे भारताचे प्रमुख बंदर होते. भारतातील सूर्यमंदिराच्या त्रिकोणातील हा एक कोन (अँगल) + सूर्य म्हणजे अर्क, म्हणजे ‘सूर्यमंदिरामुळे निर्माण झालेला कोन’ म्हणून हे ‘कोणार्क’ आहे !
‘७ घोड्यांच्या रथात भगवान सूर्यदेव बसलेले आहेत’, असे मंदिराचे स्वरूप किंवा आकार आहे. दोन्ही बाजूंना १२ अशी २४ मोठी चाके रथाला म्हणजेच मंदिराला जोडली आहेत. अग्रभागी ७ अश्व सूर्यातील ७ रंगांचे किंवा आठवड्यातील ७ दिवसांचे प्रतीक आहेत. मंदिराची वास्तूकला हा मोठा आणि स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. संपूर्ण मंदिर केवळ दगडांनी बांधलेले आहे. यात कुठेही चुना, गारा वगैरे वापरण्यात आलेले नाही. मंदिरात अनेक भूमितीय आकार आणि आकृत्या आहेत. खगोलशास्त्र, भूमिती आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम या मंदिरात आहे.
वर्ष १२५० मध्ये हे मंदिर बांधून पूर्ण झाले. १२०० कारागिरांनी हे मंदिर १२ वर्षांत बांधले. १२ एकर भूमीवर येथे ५ मंदिरे आहेत. त्या काळात यावर ४० कोटी सुवर्णमुद्रा एवढा खर्च केला गेला. सर्वांत विशेष म्हणजे शेजारी उभ्या असलेल्या माणसाची सावली पडते; पण मंदिराची सावली पडत नाही.
अचूक वेळ दर्शवणारी आणि ज्ञानाचा खजिना असलेली चाके !
मंदिराची म्हणजे रथाची २४ मोठी चाके ही वैशिष्ट्यपूर्ण आणि गूढ अर्थ, तसेच ज्योतिष, खगोलशास्त्र आदींच्या वैज्ञानिक माहितीने भरलेली आहेत. ही चाके म्हणजे ‘सूर्य घड्याळ’ आहे. (जगातील आणि भारतातील अन्य सर्व सूर्य घड्याळे ही आडवी आहेत.) मंदिराच्या रथाची चाके सावलीवरून अचूक वेळ दाखवतात. प्रत्येक चाकाला दिवसाचे ८ प्रहर दर्शवणारे ८ ‘आरे’ आहेत. १ प्रहर ३ घंट्यांचा असतो. या ८ मोठ्या आर्यांच्या मधोमध, प्रत्येकी १ बारीक आरा आहे. हे एका प्रहराचे २ भाग केलेले असून प्रत्येक भाग दीड घंट्याचा, म्हणजे ९० मिनिटांचा आहे. ८ बारीक आर्यांवर ३० मणी समान अंतरांवर लावलेले आहेत. ९० मिनिटे भागिले ३० केले, तर एका मण्याची किंमत येते ३ मिनिटे. या मण्यांची रचना अशी आहे की, त्यावर पडणार्या सावलीप्रमाणे त्यांचे ३ भाग होतात. या सूर्य घड्याळ्याचा, कालमापनाचा सर्वांत छोटा घटक झाला, १ मिनिट. या चाकाच्या अक्षावर बारीक छडी ठेवली, तर तिच्या सावलीवरून दिवसाची अचूक वेळ काढता येते. ही वेळ घड्याळ्याच्या काट्याच्या उलट दिशेने पुढे पुढे जाते. सूर्याचा प्रवास ६ महिने उत्तरायण आणि ६ महिने दक्षिणायन असा असल्याने रथरूपी मंदिराच्या दोन्ही बाजूंना चाके आहेत. उत्तरायणात एका बाजूच्या चाकावरून वेळ बघायची, तर दक्षिणायनात दुसर्या बाजूच्या चाकावर ! किती अद्भुत आहे !
रथाच्या चाकांमध्ये ‘चंद्र घड्याळ’ही आहे. त्यामुळे रात्रीची वेळ अचूकतेने काढता येते. सूर्य घड्याळासाठी रथाची २ चाके पुरतात. दुर्दैवाने ‘चंद्र घड्याळा’चे कोडे आपल्याला अजूनही उलगडलेले नाही. ते अद्याप गूढच आहे.
२२ चाकांवरील कलाकुसर वेगवेगळी आहे. दिवस, रात्री यांच्या त्या त्या प्रहरात लोकांची दिनचर्या कशी असते, ते यावर कोरलेले आहे. सकाळी योग करण्यापासून ही दिनचर्या चालू होते.
पावणेआठशे वर्षांपूर्वी पूर्वजांनी कुशलतेने या सूर्यघड्याळाची रचना केली की, जणू आजच्या काळातील भिंतीवरच्या घड्याळावर आपण वेळ बघत आहोत ! ‘आपले पूर्वज हे अचूकतेचा ध्यास घेतलेले परिपूर्णवादी होते’, याचा अजून कुठला पुरावा हवा ?
कोरीव दगडी चाकांतून वेळ कळते, हेही अगदी अलीकडच्या काळात समजले. काही वर्षांपूर्वी एक साधू बारीक काठी घेऊन त्या चाकांवर पडणार्या सावलीतून काहीतरी बघत होता. त्यावरून लोकांना समजले की, सूर्यप्रकाश असतांना यातून वेळ बघता येते !
– श्री. प्रशांत पोळ, राष्ट्रचिंतक, अभियंता आणि लेखक, जबलपूर, मध्यप्रदेश. (१०.३.२०२४) (फेसबुकवरून साभार)
कोणार्क मंदिराचा आत्मा असलेला कळसावरील चुंबक आक्रमकांनी काढणे !कोणार्क मंदिराच्या कळसावर ५१ मेट्रिक टन एवढ्या मोठ्या वजनाचा चुंबक होता. या चुंबकाच्या प्रभावामुळे काही अंतरावर असलेल्या समुद्रातील (शत्रूची) जहाजे जवळ येऊ शकत नसत. ती इकडे तिकडे भरकटत असत. (त्यांचे दिशादर्शक कंपास काम करत नसे.) शत्रूपासून मंदिरातून रक्षण होणारी किती शास्त्रशुद्ध आणि अचंबित करणारी ही रचना आहे ! मुख्य मंदिर मिळून आजूबाजूच्या ५ मंदिरांत दगडांमध्ये लोखंडाच्या पट्ट्या बसवल्या आहेत. त्यामुळे दोन मोठे दगड एकमेकांना बांधून रहातात. या पट्ट्या चुंबकाकडे आकर्षित होत असल्याने ही मंदिरे घट्ट उभी होती. चुंबक काढल्याने या मंदिराचा आत्माच हरपला ! या चुंबकाचे तुकडे करून समुद्रात टाकले, असेही म्हटले जाते. असे म्हणतात की, येथील सूर्यमूर्तीही अधांतरी होती. ‘प्रतिदिन पहाटेचा पहिला किरण सूर्यमूर्तीच्या मुकुटावर पडे’, हे तिचे वैशिष्ट्य होते. कदाचित या चुंबकाच्या प्रभावाचे तंत्रज्ञानही त्यामागे असू शकते. वास्को-द-गामाची जहाजे येण्यास अडचण होत असल्याने त्याने हा चुंबक काढल्याने सूर्यमंदिर तुटले ! आमच्या संस्कृतीची महानता प्रतीत करणार्या प्राचीन मंदिराचा आत्मा काढून घेणार्या वास्को द गामाचा उदोउदो पाश्चात्त्यप्रेमी नेहरूंच्या काँग्रेसमुळे आमच्या पाठ्यक्रमात आताआतापर्यंत केला गेला, हे लक्षात घ्या ! येथील एका रात्रीत बनवलेला नाट्यमंडप, तसेच जगमोहन मंदिर आणि सूर्यमंदिर मोगलांनी तोडले, तर इंग्रजांनी १९ व्या शतकाच्या आरंभी सूर्यमूर्ती चोरून ब्रिटीश म्युझियममध्ये ठेवली ! कोणार्क मंदिराची अन्य वैशिष्ट्ये !‘सूर्यमंदिर कमळावर बनवले आहे. मंदिराच्या खालच्या बाजूला लहान मुलांनी बघाव्यात, अशा नक्षी आणि कलाकृती कोरलेल्या आहेत. मध्यभागी तरुणांनी पहाव्यात अशा शृंगारिक कलाकृती आहेत आणि अगदी वरच्या बाजूला वृद्धांनी पहाव्यात अशा देवतांच्या कलाकृती आहेत’, असे येथील मंदिरदर्शन करवणारे मार्गदर्शक सांगतात. – सौ. रूपाली वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. |