नवी देहली – एखाद्याने त्यांच्या व्हॉट्सअॅपच्या इनबॉक्सवर केवळ अश्लील व्हिडिओ प्राप्त करणे, हा गुन्हा नाही; परंतु तुम्ही तो पाहिल्यास आणि अन्य व्यक्तींना पाठवल्यास, ते माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याच्या कलम १५ चे उल्लंघन आहे, असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका आव्हान याचिकेवर सुनावणी करतांना म्हटले. मद्रास उच्च न्यायालयाने ११ जानेवारी २०२४ या दिवशी एका खटल्याची सुनावणी करतांना ‘पॉक्सो कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायदा यांनुसार बालकांशी संबंधित अश्लील व्हिडिओ डाऊनलोड करणे आणि पहाणे गुन्हा नाही’, असा निर्णय दिला होता. यासमवेतच आरोपींवरील फौजदारी खटलाही रहित करण्यात आला. याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. यावर सुनावणी करतांना सरन्यायाधिशांनी वरील वरील विधान केले.
सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी पूर्ण झाली असून निकाल प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी केंद्र सरकारचे मतही मागवले आहे. २ स्वयंसेवी संस्थांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.