महाराष्ट्रातील ५ जागांवर मतदान !

दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४४.१२ टक्के मतदान !

नागपूर – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांना १९ एप्रिलपासून प्रारंभ झाला. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील राज्यातील ५ मतदारसंघांत सकाळी ७ वाजल्यापासून मतदान चालू झाले. यात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४४.१२ टक्के मतदान झाले होते.

पूर्व विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या ५ मतदारसंघात पहिल्या टप्प्यांतर्गत मतदान झाले. यासाठी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. मतदान केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. नक्षलग्रस्त भागात पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा यांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. या टप्प्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेत्यांचे राजकीय भवितव्य ई.व्ही.एम्. बंद झाले आहे.

गडचिरोली

नक्षलग्रस्त आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया दुपारी ३ वाजेपर्यंत पार पडली. सध्याचा उन्हाचा वाढता पारा पहाता मतदारांनी सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. गडचिरोली प्रशासनाने निवडक नवमतदार, वृद्ध आणि दिव्यांग मतदार यांची रथावरून वाजतगाजत मिरवणूक काढून मतदान केंद्रापर्यंत पोचवले होते. येथील पाचही मतदारसंघांतील मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून येत होता.

 मतदान यंत्र १५ मिनिटांसाठी पडले बंद !

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील अतिशय संवेदनशील असलेल्या परमडोली येथील २७१ बूथ क्रमांकावर मतदान यंत्र बंद पडले. यामुळे मतदान कर्मचार्‍यांची तारांबळ उडाली. वेळीच तंत्र साहाय्यक आल्याने १५ मिनिटांत ते यंत्र चालू झाले.


सिरोंचा (गडचिरोली) येथील मतदान केंद्रावरील ई.व्ही.एम्.यंत्रात बिघाड झाल्यामुळे मतदान प्रक्रिया खोळंबली !

हेलिकॉप्टरने तात्काळ ई.व्ही.एम्.यंत्र रवाना !

गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यातील तेलंगाणा सीमेलगतच्या सिरोंचा येथील मतदान केंद्रावर १९ एप्रिल या दिवशी ‘ई.व्ही.एम्.’मध्ये बिघाड झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला; पण प्रशासनाने वेळीच पाऊले उचलत अहेरी येथून हेलिकॉप्टरच्या साहाय्याने तातडीने ३ ई.व्ही.एम्. सिरोंचा येथे पोचवल्या. यामुळे येथील मतदान प्रक्रियेला पुन्हा एकदा प्रारंभ झाला.

चंद्रपूरमध्ये ६ ई.व्ही.एम्. यंत्रांमध्ये बिघाड

चंद्रपूर – येथे ६ ई.व्ही.एम्. यंत्रांत बिघाड झाला. ही यंत्रे तातडीने पालटण्यात आली आहेत. निवडणूक अधिकार्‍यांनी ही माहिती दिली.

गडचिरोलीसाठी ९ हेलिकॉप्टर्स तैनात !

गडचिरोली पोलीस दलाकडे सध्या २ हेलिकॉप्टर्स उपलब्ध आहेत. याशिवाय निवडणूक काळात अतीदुर्गम भागात मतदान पथके, ई.व्ही.एम् आणि इतर सामग्री पोचवण्यासाठी येथे आणखी ७ हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रियेत ऐन वेळी काही अडथळा निर्माण झाला किंवा ‘ई.व्ही.एम्’ यंत्रामध्ये तांत्रिक बिघाड झाला, तर या हेलिकॉप्टर्सच्या साहाय्याने तात्काळ संबंधित मतदान केंद्रावर नवीन ई.व्ही.एम्. यंत्र पोचवले जाते.